एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

०२ डिसेंबर २०२५

जीवन जगण्याची सकारात्मकता देणारी कादंबरी : ऊन सावलीच्या शोधात

 जीवन जगण्याची सकारात्मकता देणारी कादंबरी : ऊन सावलीच्या शोधात 


१९७२ चा दुष्काळ सर्वांनाच परिचयाचा आहे.त्यातल्या त्यात १९७२ चा दुष्काळ मराठवाड्यात भीषण होता. त्या दुष्काळी दिवसाचे एकंदरीत चित्रण 'ऊन सावलीच्या शोधात' या कादंबरीत आलेले आहे.आधीच मराठवाडा निजामाच्या वर्चस्वाखाली असल्याने, मराठवाड्यात पाहिजे तशी कशाचीच मुबलकता,अबादी आबादपणा नव्हता.निजामाच्या या सुलतानी तावडीतून मराठवाडा मुक्त झाला आणि त्यानंतर लगेचच १९७२ यावर्षी दुष्काळ पडला.त्या दुष्काळाचे ग्रामीण जीवनावर खूप गंभीर परिणाम झाले.त्या गंभीर परिस्थितीतही लोक मात्र आपल्यातली माणुसकी विसरले नव्हते.हे या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी दिसून येते.वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक फार जिव्हाळ्याने,आनंदाने एकत्र नांदत होते.हा जिव्हाळाच भीषण दुष्काळातही सर्वांना प्रेमाचा गारवा देणारा होता.त्या प्रेमाच्या गारव्याने दुष्काळाच्या झळाही सर्वांना सुसह्य झाल्या आणि त्या दुष्काळातही माणसं त्यामुळे जगली,टिकली.

      'ऊन सावलीच्या शोधा' या कादंबरीच्या शीर्षकाचा जर विचार केला,तर शेतकरी,शेतमजूर आणि एकंदरीतच ग्रामीण भागात जीवन व्यतीत करणाऱ्या कोणाचाही विचार केला तर ऊन जसे कायम जळणारे,होरपळणारे , जीवाची तगमग करणारे असते. त्याच पद्धतीने शेतकरी, शेतमजुराचे जीवनही, त्या उन्हाच्या सारखेच दुसऱ्यासाठी जळणारे,कष्टणारे, धडपडणारे आहे. ऊन्हाला जसा कधीच सावलीचा शोध लागणार नाही;की सावली कधी भेटणारही नाही.त्याच पद्धतीने शेतकरी, मजूर यांनाही त्या उन्हाला जशी सावली भेटणे शक्य नाही अगदी त्याच पध्दतीने शेतकरी,कष्टकरी,मजूर यांनाही कितीही कष्ट केले,मेहनत घेतली तरीही सुख,समाधान,आनंद कधीच मिळेल शक्य वाटत नाही,कारण कष्टकऱ्यांच्या जीवनात कधी निसर्ग साथ देत नाही, तर कधी व्यापारी,कधी शासन त्याला साथ देत नाही.एकतर शेती पिकत नाही आणि पिकली तर त्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे उन्हाने सावलीचा कितीही शोध घेतला, तरी त्या उन्हाला सावली कधीच भेटणे शक्य नाही.अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्याला,कष्टकऱ्यांनाही कधीच सुखाचा शोध लागणार नाही.ज्या दिवशी कष्टकऱ्याला सुखाचे,आनंदाचे दिवस येतील. तो दिवस खरोखरच सर्वांच्यासाठी आनंदाचा,भाग्याचा असणार आहे. 

      काळासोबत चालत नाही त्याला काळ कधीच माफ करत नाही आणि काळासोबत न चालणारी माणसं कुठेतरी मागे पडतात,म्हणून बा.बा.कोटंबे यांनी काळासोबत चालणं आवश्यकच आहे हे लक्षात घेतलेले आहे.  काळा सोबत चालून रहाणेही शक्य नाही ,म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता काळासोबत धावणाऱ्यांना ही कादंबरी अर्पण केलेली आहे. 

           १९७२ चा मार्च महिना नुकताच उजाडलेला अशी कादंबरीची सुरुवात होते आणि १९७२ च्या भीषण दुष्काळाचे भयान चित्रण कादंबरी वाचत जाताना आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि आपणही त्या दुष्काळी होरपळीत होरपळून जातो.हा दुष्काळ एवढा भयानक होता,की कितीही श्रीमंत घरातल्या बाया माणसांनाही शासनाने दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम मिळावे,ते उपाशी राहू नयेत;म्हणून सुरू केलेल्या नाला बल्डिंग,रस्ते आणि इतर कामावर काम करावे लागले. शेतात पीक-पाणी नाही.कोणाच्याही घरात मुबलक अन्नधान्य नाही.त्यामुळे चिवळ, बरबडा अशा कधीही अन्न म्हणून न खाल्लेल्या गोष्टी दुष्काळामध्ये लोकांना खाव्या लागल्या.गवताबरोबर उगवणाऱ्या रानभाज्या तांदूळगा, कुर्डू, तरोटा,फांजची भाजी अशा काही रानभाज्या मिळायच्या. त्यामध्ये मीठ-मिरची लावून खाव्या लागायच्या.त्या जर जास्त खाल्ल्या तर त्यामुळे संडासही लागायची.शेर अर्धा शेर ज्वारी मिळाली,तर तीन हिस्से भाजी आणि पाव हिस्सा पीठ घेऊन भाकरी बनवायच्या आणि त्याच खायच्या अशी कठीण परिस्थिती दुष्काळामुळे निर्माण झालेली होती.

स्वतःची गुरं ढोरं सांभाळणे खूप अवघड झाले होते.गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून पडत होते.पिंपळगावच्या वैजनाथरावाकडे नगरच्या संपतरावांनी पंधरा-वीस जनावर सांभाळण्यासाठी पाठवले होते. वैजनाथरावांना  त्यांचीच गुरं ढोरं  सांभाळणे अवघड झालेला असताना आपल्या विश्वासावर पाठवलेली ढोरं ठेवून घेऊन ते सांभाळणं म्हणजे खूपच कठीण काम.आपल्यावरच्या विश्वासामुळे वैजनाथरावांनी दुष्काळी परिस्थितीत आपल्या गुरांसोबत जशी जगवता येतील तसे तशी गुरं जगवणे ही मोठ्या मनाची गोष्ट आहे.

        दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब मिळेल ते काम करत होते.व्यंकू असाच विहीर खोदताना बार उडवतांना पळताना पाय अडकून पडला आणि त्याच्या पायावर विहिरीतील बाराचा भला मोठा दगड पडून अपंग झाला, त्यामुळे त्याला कुठे काम करता येत नव्हते; पण त्याची बायको संगीता हिम्मतवान होती पतीच्या अशा अवघडलेल्या परिस्थितीत सडकेच काम चालू होतं तिथे कामाला जाते. गरीब परिस्थिती आणि नाडलेली संगीता या गोष्टीचा फायदा घेत कारकून संगीताला बळजबरी करून त्रास देतो.संगीता पहिल्याच दिवशी त्या कारकुनाची वाईट नजर ओळखते, पण परिस्थिती कठीण असल्याने तिथे काम करणे आवश्यक असते आणि शेवटी तो कारकून जे करायचे नाही तेच करतो.संगीता गलित गात्र होऊन पडते.उठल्यावर तिच्या बाजूला वीस रुपयाची नोट दिसते.ती त्या नोटीचे तुकडे- तुकडे करून त्या नोटेवर थुंकते यावरून संगीताचा स्वाभिमान दिसून येतो.. 

त्यानंतर संगीता बरेच दिवस घडलेल्या परिस्थितीबद्दल अपराधाची भावना मनात ठेवून खिन्न मनाने कामावर जाते.तिचा पती व्यंकुही सोबत लंगडत लंगडत कामावर येतो आणि जोराच्या पावसामुळे व्यंकूची जी फजिती होते.त्या अडचणीच्या वेळी सलीम,रोहिदास,तुकाराम व त्याची बायको,वामन,दामू हे सगळेजण दिव्यांग व्यंकुला त्याच्या लेकरवाळ्या पत्नी संगीताला मदत करतात.यावरून या सर्व माणसांना परिस्थितीने कितीही गांजले तरी त्यांच्या मनाची जी श्रीमंती आहे.ती कुठेच कमी नाही.हे या प्रसंगातून दिसून येते.दिवस कितीही खराब आले तरी एकमेकांच्या सहकार्याने केवढाही दुष्काळ अन् केवढेही संकटं हे सुखकर होतात.हे पिंपळगावच्या लोकांच्या वागण्यातून दिसून येते.पावसाळ्यात ओढ्याला आलेल्या पावसात अडकून पडलेल्या व्यंकू आणि संगीताला तुकाराम आणि त्याची बायको गाडग्यात रेशनच्या वाटी-दीड वाटी तांदूळ असताना रात्री उशिरा शिजवून खाऊ घालते. त्यासोबतच हायब्रीडच्या काढणीनंतर आलुतेदार बलुतेदारांना तुकारामने सढळ हाताने बलुतं देणे.हे परिस्थितीने गरीब असणाऱ्या;पण मनाने प्रचंड श्रीमंत असणाऱ्या तुकारामच्या कुटुंबाचे दर्शन त्या निमित्ताने घडते. 

         दुष्काळी परिस्थितीत मदत करणारे जसे होते, तसे काही त्या परिस्थितीचा गैरफायदाही घेणारे लोक कादंबरीतून दिसून येतात. दौलतराव सारखा सावकार आव्वाच्या सव्वा भावाने पैसे,धान्य देऊन लोकांना लुबाडण्याचे काम त्या टापूतल्या दहा-पंधरा गावात करत होता.शेवटी त्याचे कसे हाल झाले हे कादंबरीत मुळातून वाचावे.अशी माणसं त्याच काळात होती असे नाही तर आजही बऱ्याचदा दुष्काळ पडला पाहिजे असे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना वाटते.कारण त्या परिस्थितीचा फायदा कसा उचलायचा हे त्यांना चांगले माहीत असते.त्यामुळे सुकाळा ऐवजी दुष्काळ अशा लोकांना खूप आवडत असतो.  

             १९७२ च्या दुष्काळात माणसे जशी पोटाची आग भागवण्यासाठी बेजार होते.तशीच शिकारी प्राणीही मानवी वस्तीत घुसून शेळ्या,मेंढ्या,कुत्रे यांना खाऊन जीव जगवण्याचा प्रयत्न करत होते.शेवटी पोटाची आग माणूस असो,की जनावर कोणाला सहन होत नाही आणि जो तो आपल्या पोटासाठी आक्रमक होऊन अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. भूक हे अंतिम सत्य आहे. 

           वडार समाजाच्या मुलीला रात्री पालावर साप चावतो. तेव्हा तुकाराम आणि सलीम मदतीला धावून जातात. दवाखान्यात नेऊन मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात.मुलीला दवाखान्यात काही प्रयत्न करून होत नाही. तेव्हा अंगारे धुपारे करूनही काही उपयोग होणार नाही.हे माहीत असून सलीम आणि तुकाराम मुलीच्या आईच्या समाधानासाठी तोही प्रयत्न करतात. काम करायला आलेले कुठले,कोण लोक पण त्याही दुष्काळी परिस्थितीत तुकाराम,सलीम,वामन,रोहिदास, दामू मुलीची मूठमाती केल्यानंतर भाजी-भाकरी घेऊन येऊन त्या कुटुंबाला जेवू घालतात.कारण हातावर पोट असणाऱ्यांना दुःख उगाळत बसता येत नाही.आलेल्या परिस्थितीला तोंड देत पुढे चालावे लागते.आडी नडीला आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याची दानत या भयानक दुष्काळातही लोक विसरलेले नव्हते हे विशेष. 

ह्या कादंबरीतील माणसेही मनाने खूप खंबीर आणि हिम्मतवान असल्याचे दिसते.आडी नडीला धावून जाणारी माणसं या कादंबरीत जसे भेटतात.तसेच जात धर्म विसरून हिंदू,मुस्लिम,बौद्ध,वडार असा कोणताही भेद न करता आपण सर्व माणूस आहेत.या भावनेने सगळे जीवन जगताना आपल्याला दिसून येतात. 

परिस्थितीने गांजलेली संगीता कशी खंबीर आहे. हे

व्यंकू मरणाचा विषय काढतो तेव्हा संगिताच्या पुढील बोलण्यावरून लक्षात येते ती म्हणते "आता जरा दिवस बरे न्हाईत, हेबी काय घर करून राहणार न्हाईत.पुन्हा नका करू मरणा धरणाच्या गोष्टी" या वाक्यावरून तसेच 

दिव्यांग व्यंकू कामावर जायचं म्हणतो तेव्हा संगीता त्याला म्हणते "माझे हात पाय आणखी शाबूतयत ,दोन लेकरं न् तुम्हाला पोसायची ताकत अजून हाय माझ्यात" यावरून संगीता किती खंबीर आणि कणखर मनाने आपला संसार नेटाने करते हे दिसून येते. 

   दुष्काळाने सगळं चित्रच बदलून टाकलं होत.माणूस असो की प्राणी शेवटी आशेवर जगत असतो.त्याही परिस्थितीत माणसाची जगण्याची धडपड चालू होती. माणसं असंख्य अडचणीवर मात करत जगत होती. संगीताच्या मनातली जीवन जगण्याबद्दलची सकारात्मकता.पहा संगीता एके ठिकाणी म्हणते.

"हा दुष्काळ काही घर करून राहणार नाही, महिना पंधरा दिवसाला पाऊस पडेल नंतर होईल पहिल्यासारखं" यावरून संगीताचा जीवनाकडे,जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. 

       " ऊन सावलीच्या शोधा"  या कादंबरीत बुडत्याला काडीचा आधार,काम नाही तर दाम नाही,तोंड दाबून बुक्क्यांचा मार,रात गयी,बात गयी, नाकी नऊ येणे, आले सरकारच्या मना तिथे कोणाचे काही  चालेना, दुधाची तहान ताकावर,दुष्काळात तेरावा महिना,एक घाव दोन तुकडे,पोळा न् पाऊस झाला भोळा,उटावून शेळ्या हाकणे,सांगायला गेले तर टांगायला चाललेत,कावळा उडायला आणि फांदी मोडायला एकच वेळ आली,वाघाची शेळी करणे अशा प्रकारच्या मराठवाडी बोलीत बोलल्या जाणाऱ्या म्हणीचा आणि मराठवाडी बोलीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येते.

         कादंबरीत शेवटी दुष्काळानंतर खेडेगावातील प्रत्येकाची मुलं शिकून शहरात जातात आणि त्यामुळे सलीम,रोहिदास,वामनही त्यांच्या मुलांकडे शहरात जातात.शहरात फुकट कोण खाऊ घालणार,म्हणून इथेही त्यांना वाॅचमन सारखे काम करायला लागते; म्हणून तुकाराम म्हणतो गावात राजासारखे राहणारे हे आपले मित्र तिथं काम करताना पाहून वाईट वाटते.गावाचा लळा, गावातली शेती याबद्दलची आत्मीयता जुन्या पिढीला आहे. ती आत्मियता आताच्या पिढीला नाही हेही खर आहे. कारण आता शेतात काम करण्यापेक्षा कंपनीत काम करणे प्रत्येकाला आवडायला लागत आहे. 

   'ऊन सावलीच्या शोधात ' या कादंबरीतून कठीण परिस्थितीतही जीवनाकडे सकारात्मकपणे पाहणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात ही सकारात्मकता निश्चितच आनंदाने जीवन जगण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांची पाठ राखण कादंबरीचे मर्म सांगणारी आहे.सरदार जाधव यांचे समर्पक मुखपृष्ठ आणि रेखाटने कादंबरीच्या आशयाला आणखीनच धारदार बनवणारी आहेत. 


कादंबरी - ऊन सावलीच्या शोधात

कादंबरीकार - बा.बा.कोटंबे 

प्रकाशक-

सुनिताराजे पवार ,

संस्कृती प्रकाशन ,पुणे 

प्रथम आवृत्ती :१५ ऑगस्ट २०२५ 

मूल्य : २५०

पृष्ठ:१४४

    

    

                            शरद ठाकर 

                           सेलू जि परभणी 

                           ८२७५३३६६७५