एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२४ सप्टेंबर २०२३

माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता

 माणसाला माणुसकीच्या 'घामाची ओल धरून' ठेवायला शिकणारी कविता 



कवी आबासाहेब पाटील यांनी कवितासंग्रहाला 'घामाची ओल धरून' हे शीर्षक देऊन शेतकरी,कष्टकरी यांच्या श्रमाचा खरा सन्मानच केलेला आहे.शेतकरी शेतात कष्ट करतात,शेत पिकवतात.तेव्हाच माणूस आनंदाने जगू शकतो.शेतकऱ्याच्या कष्टाने,त्याच्या घामाच्या धारांनी शेतात पिक फुलून येते.प्रत्येकाच्या ताटात खायला पुरेसं अन्न मिळते.घामाची ओल धरूनच हे सगळे काही पिकलेले असते. शेतात जसे पीक उगवून यायला पाण्याचा ओलावा असावा लागतो.त्या ओलाव्या शिवाय पीक जगू शकत नाही.हे जरी खरे असले तरी त्या पिकाच्या ओलाव्यासोबतच कष्टणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाची ओल असल्याशिवाय शेतात पीक उगवून येऊ शकत नाही.

     आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डची सक्ती केल्या जाते.जे आधार कार्ड आपल्या प्रत्येक गोष्टीला ऑनलाईनपणे जोडल्या गेलेले आहे.जसे की बँकेचे व्यवहार त्यासोबतच इतर ठिकाणी.त्यावरून एखाद्या माणसाचा व्यवहार कसा आहे‌हे त्या माणसाच्या सीबील वरून ठरवल्या जाते,पण शेतकरी माणसाला सत्वशील जगणे माहीत असते. कष्ट न करता.तो कोणाचा एक रुपयाही घेत नाही.इमानदारीने जगणे एवढेच शेतकऱ्याला माहीत असते.माणुसकीचा धर्म पाळणे हेच शेतकऱ्याला माहीत असते.शेतकरी माणसासाठी कष्ट करतोच,पण त्यासोबतच तो मुक्या जनावरांची, पक्षांची काळजी घेतो.त्याच्यातलं माणूसपण जपत असतो.हे माणूस पण सांगताना ते म्हणतात.

' माणूस या एका क्यूआरकोडवर सापडत होता काळजातल्या ओलाव्याचा तळ

     (पृ.१३२)


दुसऱ्याबद्दल असलेला हा काळजातला ओलावा आता चुकूनही पाहायला मिळत नाही.आज लोक बेगडी वर्तन करून दुसऱ्याबद्दल असलेली आपुलकी दाखवतात. काही तर बोल बच्चन करून काम कमी आणि जाहिरात जास्त करतात. आजच्या काळात अशांची चलती आहे.हे सांगताना आबासाहेब पाटील म्हणतात.

'एरंड्याही खपतात गव्हाच्या दारात फक्त विकणारा ब्रॅण्डेड पाहिजे 

अन् त्याच्या शब्दांवर 

चोवीस कॅरेटचा होलमार्क

       (पृ.४६)

आशा या स्वार्थी जगात शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवन विषयक वेगळे तत्त्वज्ञान ठरलेले असते.त्यांचे त्यांचे वेगळे समजूतशास्त्र असते.कष्टकरी माणूस आपल्यामुळे कोणाला त्रास नको,म्हणून पोटाला चिमटा देत,आहे त्या परिस्थितीत दुःखातही दुःखाची जाहिरात न करता आपल्या वाट्याला आलेले दुःख.तो निमुटपणे सहन करत आनंदाने जगत असतो. त्याच्यासारखीच त्याला खंबीर साथ देणारी त्याची पत्नीही आहे त्या परिस्थितीत कुरकुर न करता शेतकऱ्याचा संसार सुखाचा करून दाखवते.कारण त्यांच्यामध्ये एक वेगळी समाज आलेली असते. त्याबद्दल ते म्हणतात.

'कितीही चांगलं खाल्लं तरी 

पोटात होत नाही सोनं

हे या लोकांचं समजूतशास्त्र 

जे सोपं करतं अवघड जिणं'

      ( पृ.९२ )


आणि ज्यांचे घर पैशाने भरलेले आहेत.ते व्यापारी,कृषी केंद्रवाले लोक निष्ठेने शेती करणाऱ्या,आपल्या कृषीकेंद्रात विश्वासाने येणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करून शेतकऱ्याला हिणकस,दर्जाहीन बियाणे आणि औषधांची विक्री करतात.जेव्हा शेतकरी त्याला जगणे असह्य होते.तेव्हा औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला समजते,की कृषीकेंद्रात आता विश्वासघात असा मोफत मिळतो.

या संग्रहातली नातं ही प्रश्नोत्तराच्या संदर्भातली कविता मला खूप आवडली.आजच्या व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला लागला,तर त्याचं काय होतं. प्रश्न विचारणाराला कशा कशा पद्धतीने थांबवता येईल किंवा तो प्रश्न विचारणारा प्रश्न विचारायला जिवंतच राहिला नाही पाहिजे.अशा पद्धतीची व्यवस्था असते. सर्वसामान्याला वाटते,आपण व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे आणि व्यवस्थेने त्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले पाहिजे,पण व्यवस्थेला हे मान्य नसते.म्हणून व्यवस्था काय करते हे ती पुढील शब्द सांगतात.

'प्रश्नांच्या नाकात ओवतात व्यसन व्यसनीला बांधतात दावं 

जेणेकरून प्रश्न निमूट थांबतात उत्तराच्या दावणीला'

        ( पृ.९९)


प्रश्न विचारणारालाच, प्रश्नालाच जर उत्तरांच्या दावणीला असे बांधले तर प्रश्न विचारणारा तयारच होणार नाही आणि मग उत्तरे तोऱ्यात आनंदाने राहू शकतात‌.असा हा सध्याचा काळ आहे.     

      कविता कुठून,कशी जन्मते.सत्वशील जगण्याची कविता कशी होत असते.हे ते त्यांच्या 'माझं लक्ष आहे तुझ्याकडे' (पृ. ८५),कविता आहे ती (पृ.११५), समजव एकदा अक्षरांना (पृ.११०,१११) या कवितांमधून खूप छान पद्धतीने सांगतात.ते त्यांच्या 'कुठून येते कविता' या कवितेत म्हणतात.

'कुठून येते कविता? फुलातून... कळ्यातून 

की वेदनेच्या मळ्यातून ? भरलेल्या डोळ्यातून की दाटलेल्या गळ्यातून ?'

     ( पृ.९३)


खरंच कविता कुठून येत असेल, तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाला जीवन जगत असताना जे जे सलतं,टोचतं काहीतरी वेगळं दिसतं तिथून तिथून कविता जन्माला येत असते.त्यासाठी असावे लागते फक्त संवेदनशील मन.या कवितासंग्रहात तुकाराम,विठ्ठल, ज्ञानेश्वर,पांडुरंग, यशोदा यांच्या संदर्भानेही कविता आलेल्या आहेत. कवी आपल्या लाडक्या विठ्ठलाला लडिवाळपणे हक्काने भांडतो. त्याला विटेवर उभा राहून तू काय पराक्रम केला आहेस.असे विचारतो.इथे शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने दिनरात कष्ट करून.मुलांचे शिक्षण,लग्न अशा अनेक समस्यांना सामोरे जातो आणि विठ्ठला तू फक्त कमरेवर हात ठेवून उभा आहेस. शेतकऱ्यांसारखं जीवन जर तू जगून दाखवलेस.तर विठ्ठला मी तुझे टाळ कुटीन असे आबासाहेब पाटील विठ्ठलाला पुढील शब्दात सांगतात.

'जमवून दाव 

अशी उलाढाल 

तेव्हा तुझा टाळ 

कुटेन मी '

   ( पृ.१३८)


या संग्रहातील कवितांमधून अनेक प्रतिमा,प्रतीक आलेले आहेत.जसे की,भात झाकण सारून नजर टाकतो (पृ.२५), पंकचर झालेली रसिकता ( पृ. ६४), दावी कापून सोडून दिलेल्या इच्छा, आकांक्षाचं प्रेत (पृ. ८९), श्वासाचे आटलेले तळे ( पृ.७०)


  एकंदरीतच माणसाला माणुसकीच्या, माणुसपणाच्या घामाची ओल धरून ठेवायला ही कविता शिकवते‌.



कवितासंग्रह -

घामाची ओल धरून


कवी- आबासाहेब पाटील


प्रकाशक- 

शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा,जि.सोलापूर


मूल्य-२०० ₹


पृष्ठ -१४४


प्रथम आवृत्ती- २ एप्रिल २०२२


    शरद ठाकर 

  सेलू जि परभणी

 ८२७५३३६६७५

न जिंकलेल्या पैजेतला मित्र

 काल पोळ्याच्या निमित्ताने माझ्या माले टाकळी ता.सेलू जि. परभणी या गावी डाॅ. काशिनाथ पल्लेवाड सर,दगडोबा माघाडे सर, नवनाथ गवलवाड सर या मित्रांसह गावाकडे गेलो होतो.माझ्या शेतकरी बापाला, बळीराजाला सुखावणारा पोळा हा सण काल गावात पाऊस पडला म्हणून आनंदात साजरा झाला.
  मला जिथे तिथे मी चहा वगैरे काही घेत नाही म्हणावे लागते. तेव्हा कोणीतरी दैनिक सकाळच्या गुड मॉर्निंग सदरात आलेल्या 'न जिंकलेली पैज' या लेखाची आठवण करून देतो किंवा मला तरी माझ्या चहा न घेणाऱ्या मित्राबद्दल सांगावे लागते.काल गावाकडे गेल्यानंतर माझे मित्र न जिंकलेल्या पैजेतल्या मित्राच्या भेट घेण्याबद्दल बोलले.तेव्हा मला आमचे बालपण आठवले माझा मित्र बंडू बापूराव पांचाळ जो,की आज त्याचा पारंपरिक सुतारकीचा व्यवसाय करतो आणि मी शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करतो.माझे वडील टेलरिंगचे काम करायचे. आम्हाला शेती नव्हती, म्हणजे आम्ही भूमीहीन होतो,म्हणून लहानपणी कोणाच्यातरी शेतात मुगाच्या शेंगा तोडायच्या निमित्ताने खायलाही मिळतात,म्हणून मी आणि माझा मित्र बंडू पांचाळ मी इयत्ता तिसऱ्या वर्गात आणि तो सातव्या वर्गात असताना म्हणजे १९९२-९३ यावर्षी जवळपास ३० वर्षांपूर्वी आम्ही चहा न पिण्याची पाच रुपयांची पैज लावली.आम्ही इतरही खूप अभ्यासाच्या,शुध्दलेखन लिहिण्याच्या,पाढे पाठांतराच्या वगैरे शर्यती लावायचो जिंकायचो हरायचो,पण ३० वर्षांपूर्वी चहा न पिण्याची लावलेली शर्यत आम्ही दोघांपैकी आज पर्यंत जिंकलो किंवा हरलेलो नाहीत.ते फक्त आमच्या एकमेकांच्या मैत्रीवर असलेल्या अपार विश्वासामुळे.माझ्या गावात त्या काळात फक्त इयत्ता चौथी पर्यंत शाळा होती,म्हणून मला इयत्ता पाचवीपासून मामासोबत कल्याण जि.ठाणे कधी आजोळी शेलगाव जि. जालना त्यानंतर सेलू आणि पुढे डी.एड साठी बुलढाणा,नोकरीच्या निमित्ताने कोकणात दापोली आणि पुन्हा स्वजिल्ह्यात सेलू येथे भटकंती करावी लागली. मी असा पाचव्या वर्गापासून शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर दूर रहात गेलो,पण मी किंवा माझ्या मित्राने आपल्या मैत्रीवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही.मी माझ्या पद्धतीने ठाम राहिलो आणि तो त्याच्या पद्धतीने ठाम राहिला.मी अनेक रंगा रूपाच्या मित्रांसोबत राहिलो.महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कारणाने फिरलो,पण माझ्या मित्रांनीही मला कधीही शर्यत तोडायला भाग पाडले नाही.त्यांनीही माझी मैत्री टिकावी,पैज टिकावी म्हणून नेहमी सहकार्यच केले.मला माझे कधी कौतुक वाटले नाही.कारण मी शिक्षक आहे मला नोकरी आहे. मला चहा न घेता सावलीत अध्यापनाचे काम करायचे आहे,पण माझा मित्र त्याचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय करतो.म्हणजे त्याला ते काम करत असताना थकवा आल्यानंतर चहा घ्यायला पाहिजे असे कोणालाही वाटते,पण त्यांने कधीही मी कितीही दूर गेलो तरीही मैत्री वरचा विश्वास टिकवण्यासाठी चहा घेतला नाही‌.मला माहित आहे मला जसा कधीही थकवा,कंटाळा येत नाही.त्याच पद्धतीने त्यालाही कधीच थकवा किंवा कंटाळा जाणवत नसणार आहे.उलट आम्हाला दोघांनाही आमची अतूट मैत्री, आमचा एकमेकांवरचा विश्वास दृढ करणारी शक्ती आम्हाला सतत उत्साही,उल्हासित ठेवायला मदत करते. गेल्या ३० वर्षात आमच्या पैकी कोणी हरला किंवा जिंकला नाही.आम्ही हारण्या जिंकण्यापेक्षा किंवा आपल्याला पाहणारा कोणी नाही याचा विचार न करता.मैत्राने आणि मी दोघांनीही नैतिकता, विश्वास नावाची जी गोष्ट असते‌.ती कायम कोणाला न सांगता,तिचे प्रदर्शन न करता जपली.
   शरीराने जरी आम्ही ३० वर्षांपासून दूर दूर असलो,तरी मनाने आणि विचाराने कायम सोबतच आहेत.आता ही 'न जिंकलेली पैज', 'कायम न जिंकलेलीच राहणार आहे.' एखाद्याला हरवायचे त्याला कमी ठरवायचे, म्हणून आपण ठामपणे  राहायचे हा विचार आमच्या मनाला कधीही शिवला नाही आणि शिवणारही नाही.अजाणत्या वयात दिलेला एखादा शब्द पाळणे काय असते.हे मला आणि माझ्या मित्राला चांगलेच माहीत आहे.माझ्या मित्रावर आणि माझ्यावर आमच्या मायबापाने केलेले संस्कार इतके पक्के आहेत.ते कोणी कितीही प्रयत्न केलेले तरी कधी ढळणार नाहीत.मित्राला दिलेला एखादा शब्द आम्ही इतक्या सहजपणाने जपत असू,तर आयुष्यात जेव्हा केव्हा आमच्यावर विश्वास ठेवून कोणी आम्हाला एखादी जबाबदारी देईल ती जबाबदारी तितक्याच विश्वासाने नक्कीच पार पाडू.

     शरद ठाकर
   सेलू जि परभणी
  ८२७५३३६६७५

अंधारलेल्या भोवतालात उगवतीची दिशा दाखवणारी कविता 'जळताना भुई पायतळी'

अंधारलेल्या भोवतालात उगवतीची दिशा दाखवणारी कविता 'जळताना भुई पायतळी'

अलीकडेच मराठी साहित्यात गावाकडून, शेता- शिवरातून आलेले अनेक तरुण कवी, जागतिकीकरणानंतर बदलेल्या ग्रामीण जीवनाचे आणि कृषीक्षेत्राचे वास्तववादी चित्रण करणारी समकालीन कविता लिहीत आहेत.
तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांची 'जळताना भुई पायतळी' या कविता संग्रहातील कविताही ह्याच प्रकारची आहे.

'जळताना भुई पायतळी' ह्या  तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या कविता संग्रहातील कविता चार भागात विभागलेल्या आहेत. पायाखालची सरकणारी जमीन, ही कोणती वावटळ आली?,घामाची बारमाही नदी, निरूत्तर झाली माती असे चार भाग पाडून त्यात त्या त्या विषयाच्या अनुषंगाने कवितांची मांडणी केलेली आहे. त्यामुळे कविता वाचत असताना तो विषय आणखी खोल खोल आपल्या मनात उतरत जातो. एकंदरीतच ही कविता शेतीमाती, ग्रामीण जीवनातील नातेसंबंध व जागतिकीकरणामुळे झालेले जगण्यातील आणि कृषी जीवन संस्कृतीतील बदल.त्या बदलामुळे बदलत गेलेला माणूस.संपत चाललेला नात्यातील ओलावा आणि त्यामुळे माणसाच्या मनात आलेली तुटलेपणाची जाणीव करून देणारी, माणसाला जगण्याचे, वागण्याचे नवे भान देणारी ही कविता तान्हाजी बोऱ्हाडे यांनी लिहिलेली आहे.
      नव्या पिढीतल्या कोणत्याच तरुणाला आता गाव खेड्यात राहून शेतीत काम करावे असे वाटत नाही.आपल्या शेतात मालक म्हणून काम करायची लाज वाटते,पण तोच तरुण शहरात जाऊन दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लाजत नाही.ही चुकीची मानसिकता तरुणांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे थोडेफार शिक्षण झाले,की प्रत्येक तरुण आपला गाव सोडून शहराकडे धाव घेत आहे.त्यामुळे आपली हक्काची शेती पडीक राहत आहे. भविष्यात गावाकडे राहून शेती कोण  करणार ? आणि जगाला अन्नधान्य कोण पुरवणार ? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तरुणांच्या या शहरांकडे धावणाऱ्या लोंढ्यां बद्दल ते म्हणतात.
'पुढल्या पिढीला | शेतीचा उपास शहरांची कास | भाळणारी'
         (पृ.५२)

आजचा तरुण शहरी झगमगटाला तेव्हाच भाळतो आणि गावापासून आपल्या माणसा पासून तो नकळतपणे दूर दूर जातो.शेतकरी राजा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे दुःख काय आहे ? हे कवी तान्हाजी बोराडे यांनी त्यांच्या अनेक कवितांमधून विषद केले आहे.  'अकरावी ओळ' या कवितेत ते म्हणतात. 'शाळेतल्या परीक्षेत प्रश्न आलेला 
दहा ओळी निबंध लिहा 
विषय शेतकऱ्याचे मनोगत '
      (पृ.३९)
शेतकऱ्याचे मनोगत, त्याचे दुःख खरच त्या दहा ओळीत बसणारे आहे काय? तर नक्कीच नाही. शेतकऱ्याच्या आयुष्याची  झालेली ही परवड अतिशय प्रत्ययकारी शब्दात कवीने मांडली आहे.शहरात राहणाऱ्या भावाने गावाकडे अवकाळी पाऊस झाला,म्हणून किंवा पाऊस पडला नाही म्हणून फोनवर बोलून नुसतीच हळहळ व्यक्त करून काहीच उपयोग होत नाही.हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झालेल्या शेतकऱ्याचे सांत्वन हे कोरडे शब्द करू शकत नाहीत. याबद्दल ते म्हणतात.
'टीव्हीवरल्या बातम्या पाहताना चहाच्या कपात विरघळणारी वांझोटी हळहळ  ठरू शकत नाहीये बुडत्या माणसांना काडीचा आधार'
            (पृ.३३)
शेतकऱ्याचे दुःख फार मोठे आहे. शेतकरी जगाच्या भरण पोषणासाठी बेभरोसी निसर्गावर विश्वास ठेवून शेतकरी काळ्या आईची कर्ज काढून  विश्वासाने ओटी भरतो हिंमतीने आलेल्या परिस्थितीला सामोरा जातो,परंतु त्याला हे दुःख जेव्हा पेलणेच शक्य होत नाही. तेव्हा त्याच्या मनाची तगमग होते.त्याला स्वाभिमानीपणाने जगणे अवघड होते. तेव्हा तो आत्महत्येसारखी नको ती कृती करतो.  शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कवीने समर्पक शब्दात भाष्य केले आहे.  शेतकरी आत्महत्येची चौकशी करणाऱ्या प्रशासनाला शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचे दुःख सांगताना म्हणतो तुम्ही फक्त पंचनामा आणि पोस्टमार्टम करून त्याला आज मृत घोषित केले. 'माझा बाप तर याआधीच मेलेला होता फक्त आजवर त्यांनी आपला मृत्यू जाहीर केला नव्हता'
              (पृ.२२)
   शेतकरी कशाकशाने मरत जातो याबद्दल ते म्हणतात.
'दुष्काळान होरपळून अवकाळीने झोडपून कर्जाच्या डोंगराखाली जीव गुदमरून 
दलालाच्या लूटमारीत कंगाल होऊन कोसळणाऱ्या बाजारभावात भुईसपाट होऊन वरीलपैकी कशानेही अथवा यापैकी प्रत्येक कारणाने तो मरत जातो हळूहळू आटत चाललेल्या झाऱ्या सारखा'     
            (पृ.८३)

शेतकरी आनंदाने जीवन जगत असल्याचे तो आनंदात सुखी असल्याचे नाटक शेतकऱ्याला करावे लागते कारण शेतकरी आनंदात, सुखात राहावा यासाठी कधीच कोणी प्रयत्न करत नाही.याउलट शेतकऱ्याचे जिथे तिथे शोषण कशा प्रकारे करता येईल. याचाच विचार जो तो करत असतो. निसर्ग, शासन,प्रशासन , व्यापारी, दलाल असे अनेक जण शेतकऱ्यांचे शोषण करायला टपलेलेच असतात या सर्वांच्या कचाट्यातून कसाबसा सुटलाच तर शेतकऱ्याला कसेबसे जीवन जगता येते. आपण दुःखी राहिलो तरी चालेल पण आपल्यामुळे आपले घर दुखी राहू नये म्हणून शेतकरी आपल्या घरच्यांसमोर दुःखात असला तरी सुखात असल्याचे नाटक करून जगत असतो याबद्दल हे वास्तव कवितेतून मांडताना कवी तान्हाजी बोऱ्हाडे म्हणतात. 'उपाशी पोटांनेच करतो आहे तो पोटभर जेवल्याचा अस्सल अभिनय आपल्या तोंडाकडे पाहत जेवणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून' 
      ( पृ.६६)
      अशाप्रकारे शेतकरी बाप स्वतः दुःख भोगून दुसऱ्याला नेहमी सुख देण्याचे काम करत असतो. शेतात काम करायच्या उमेदीच्या वयात तरुणांना राजकीय फडात सामील करून घेतले जाते आणि ती मुलंही हातात कुदळ, फावडं घेऊन शेतात कष्ट करायचे सोडून नको त्याचे रंगीबेरंगी झेंडे घेऊन मिरवतात.कोणत्या रंगाचा,कोणत्या तत्त्वाचा झेंडा आपण हातात घेतला पाहिजे हे त्यांना काही कळत नाही.कार्यकर्तेच काय जेव्हा नेतेच जर सकाळी एका तर संध्याकाळी दुसऱ्या झेंड्या खाली जात असतील,तर या तरुण पोरांचे काय भविष्य असणार आहे?, पण त्यांचे राहणीमान,गाड्या, भाषणबाजी हे सगळं पाहून हुरळून जाऊन, त्या झगमगाटामागे लागलेल्या पोरांना आणि माणसांनाही समजत नाही की, राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आपला वापर करून फेकत आहेत.त्यांच्या बोलण्यावर वांझोट्या घोषणावर विश्वास ठेवून निष्ठेने नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे तरुण कार्यकर्तेच जेव्हा फसले जातात.आणि ते फसले गेल्याची  जाणीव जेव्हा होते तेव्हा ते म्हणतात.
'आम्ही भाळत आलो आजवर त्यांच्या मोठमोठ्या भाषणांवर आणि विश्वास ठेवला त्यांनी दिलेल्या घोषणांवर'
                 (पृ.८५)
आजवर कोणत्याच राज्यकर्त्यांनी शेतकरी सुखी व्हावा म्हणून त्याच्या शेतमालाला  योग्य हमीभाव दिला नाही, की शेतकऱ्याची लूट करणाऱ्यांना वठणीवर आणले नाही. शेतकऱ्यांच्या मनात वाहणाऱ्या चिरंतन दुःखाच्या नदीवर आज पर्यंत कोणालाच धरण बांधता आले नाही आणि कोणी बांधणारही नाही याबद्दल ते म्हणतात 'दुःखाची चिरंतन नदी वाहतेच आहे आमच्या पापण्याआडून अजून तरी  कोणत्याच व्यवस्थेला त्या नदीवर बांधता आले नाही धरण' (पृ.९८)

असे असले तरी याही परिस्थितीत शेतकरी जगासाठी अन्न पिकवतो,ताटातल्या घासासाठी मातीत बियाणे पेरतो,मातीत कष्ट करून वरूण राजाला विनवणी करतो. प्रत्येक जीवासाठी शेतकरी निसर्गाकडे दान मागतो,पण त्यातला काही भाग स्वतःचा वाटा म्हणून काढून घ्यायचेही तो विसरतो एवढी मोठी दातृत्वशीलता त्या शेतकऱ्याच्या मध्ये असते ही दातृत्वशीलता ते पुढील शब्दात मांडतात.
'मागणीचा आणि देणगीचा नाही कधी अभिमान माझ्यासाठी राखण्याचेही मी विसरतो भान'
 (पृ.६३)

निसर्ग चित्र (पृ.२८) व सावली (पृ.३०) या दोन्ही कवितेतून कवी पर्यावरण ऱ्हासाबद्दल बोलतात.निसर्ग चित्र काढा म्हटले,की कोणीही सहजपणे डोंगर,नदी, चार दोन झाडं,झोपडी,होडी असे चित्र काढतो,परंतु प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे भविष्यात मुलांना हे सगळं बघायलाच मिळाले नाही,तर मग मुलं कुठली आणि कसली निसर्ग चित्र काढतील ?हा प्रश्न त्यांना पडतो.
  कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांनी काही कवितांमधून आजच्या काळाचे चित्र आणि पूर्वीच्या काळाचे चित्र तुलनात्मक दृष्टीने आपल्या कवितेमधून प्रभावीपणे रेखाटलेले आहे. ज्यातून पूर्वीच्या काळाची परिस्थिती त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे वर्तन आणि आजच्या काळातील आजच्या माणसाचे वर्तन अधोरेखित केलेले आहे.भिंत कवितेमध्ये आई तिच्या अपराजित हातांनी भिंत सारवते तर मुलगा मोबाईलच्या दुकानात स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी उभा आहे. तर लोड शेडिंग (पृ.२०) कवितेत, शेतीच्या पिक पाण्याच्या प्रश्नामुळे झोप न लागलेला बाप भल्या पहाटे लाईट जाण्यापूर्वी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जातो,तर मुलगा झोपेतून उठून मोबाईलचा चार्जर शोधतोय,
चिमण्या  (पृ.४३) या कवितेतून कवी खूप छान पद्धतीने माणसाला पर्यावरण संवर्धनासह लेक वाचवण्याचा, वाढवण्याचा संदेश देतो. त्या कवितेत पूर्वीच्या काळी आई धान्य पाखडत असताना,चिमण्या तिच्या जवळ यायच्या आणि चिव चिव करत त्यांचा वाटा घेऊन जायच्या, 
परंतु आता आधुनिक काळात बायको ही चिमण्यांना दाणे टाकायचे काम करते,पण चिमण्या दाणे खायला येत नाहीत,कारण अनेक प्रकारचे तणनाशके  आली त्यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.त्या चिमण्या जशा कमी झाल्या त्याच पद्धतीने स्त्रीभ्रूणहत्येमुळे मुलीचे प्रमाण खूप कमी झाले आहे हे सांगताना ते म्हणतात
'कोणता आधुनिक आजार झाला आहे पटापट मारताहेत चिमण्या आणि माणूस ही जन्माला घालत नाहीये चिमण्या' 
       ( पृ.४३)
अशाच काहीशा आशयाच्या कविता महापूर ( पृ.२३), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५,२६),पाऊस (पृ.३२)माणसा माणसा दार उघड (पृ.३४),पायवाट ( पृ४८)
या कवितासंग्रहात आलेल्या आहेत.त्यासोबतच माय,बाप,आजी, आजोबा,बहिण अशा विविध नात्यातील कविता आलेल्या आहेत. भिंत (पृ.१९), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५),लोड शेडिंग (पृ.२०),हरळी (पृ.५८),आभाळातल्या थेंबा संगे (पृ ५९ ),एकनाथ   (पृ.३७ ) ,पुसूनही टाकता येत नाहीत (पृ.६४,६५),एकपात्री नाटक (पृ. ६६), भीती (पृ.७३),जखम (पृ.९०),रुक्ष भूमी (पृ.९२) या कवितांमधून कष्टकरी मायबापाच्या जीवनानुभवांची मांडणी कवीने केली आहे. 

नोंदी (पृ.२१), महापूर (पृ.२३), पायवाट (पृ.४८), जखम (पृ.८९) या कवितेमधून आजोबांचा काळ आणि आजचा बदललेला काळ खूप प्रभावी पद्धतीने मांडलेला आहे. 
संग्रहाच्या सुरुवातीलाच कवी निसर्गाला प्रार्थना करतो,की 
'चकोराच्या वाट्याचे चांदणे 
त्याचे त्याला लाभो चातकाच्या व्याकुळ कंठासाठी 
जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस'
             (पृ.१४)
तर पुढे एका कवितेत
'रिकाम्या ओंजळीत दोन घास ठेवणारी माणसं शिल्लक आहेत अजून गावात त्यांची ओळ वाढो दिवसें दिवस 

झाडांना पाणी घालणारी दोन मुलं दिसतायेत शाळेच्या प्रांगणात 
त्या मुकल्या हातांना अनेकांची साथ लाभो
(पृ.३६)
अशी प्रार्थना ते निसर्गाकडे करतात. 

या संग्रहात मोबाईल,लोड शेडिंग,चार्जर,बॅटरी, लाईट, स्क्रीन गार्ड, टाईम टेबल,इमेजेस, डिलीट,स्मायली, फ्लॅट अशा इंग्रजी शब्दांचा उल्लेख आलेला आहे. अलीकडच्या काळातील भाषेतील ही समिश्रता तितक्याच सहजपणे कवितेत आलेली दिसते.
उगवतीची दिशा (पृ.१०२) या कवितेतून कवी तान्हाजी बोऱ्हाडे
यांच्या बापाने त्यांना उगवतीच्या दिशेने चालायला सांगितले आहे.
'बापानं हातात नांगर देण्याऐवजी पाटी पुस्तक दिलं आणि म्हणाला उगवतीच्या दिशेनं चालत जा...'( पृष्ठ १०२)
हे सांगणे फक्त त्यांच्या एकट्या पुरते न राहता समस्त मानवजातीने आणि विशेषत: शेतकऱ्याच्या मुलांनी उगवतीच्या दिशेने चालत जायला ही कविता सांगते आहे. उगवतीची दिशा म्हणजे सुशिक्षित होण्याची,शिकण्याची, आत्मभान जागृत करण्याची दिशा आहे. म्हणून कुणब्याच्या पोराने उगवतीच्या दिशेने जावे असे प्रत्येक शेतकरी बापाला वाटते. कारण शेतकऱ्याचा शेवट काय आणि कसा होतो.हे प्रत्येक शेतकरी जवळून पाहतो.आपला मुलगा उगवतीच्या दिशेने गेला तरच त्याची प्रगती होईल,नाहीतर काय होते? हे ते पुढील शब्दात सांगतात.
'हातात नांगर असलेला 
कुणबी कुठंही गेला तरी मावळतीच्या डोहाजवळच पोहोचतात त्याची अभागी पावलं'
         (पृ.१०२)
दर्शन मांजरे यांनी कुणब्याचा श्वास असलेली भुई, शेतकऱ्याला हिंमतीने जगायला शिकवणारी,त्याची साथ करणारी औताची बैलजोडी.यांची समर्पक मांडणी करुन आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे. समीक्षक दा.गो. काळे यांच्यासारख्या जेष्ठ समीक्षकांची  पाठराखण या संग्रहाला लाभलेली आहे.

जास्त काही सांगण्यापेक्षा ज्याचे जळते त्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळते, कळत असते. जसे ज्या बोटाचे दुःख त्या बोटाला भोगावे लागते.तशी ज्या शेतकरी बांधवांना प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करावे लागतात. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना काय काय दुःख भोगावे लागते हे त्यांनाच ठाऊक असते. कवी तान्हाजी बोऱ्हाडे हे स्वतः एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले शेतकऱ्यांचे दुःखद वास्तव अतीशय प्रभावी शब्दात चित्रित केले आहे .शहरात राहून कधीही शेती न पाहिलेल्या फक्त नावावर शेती आहे, म्हणून शेतकऱ्याची लेकर म्हणवणाऱ्या उपऱ्या शेतकऱ्यांना अन् त्या उपऱ्या पोरांना शेतकरी बापाची होणारी ही व्यथा काय समजणार  ? ते दुःख जो भोगतो त्या शेतकरी माय-बापालाच आणि त्यांच्या च्या मुलाबाळांनाच माहीत 'जळताना भुई पायतळी' काय होते ? ते...

कवी - तान्हाजी रामदास बोऱ्हाडे


कवितासंग्रह : 'जळताना भुई पायतळी' 


प्रकाशन -
काव्यग्रह प्रकाशन, वाशिम

मूल्य १५० रुपये 
पृष्ठ १०४

    शरद ठाकर 
सेलू जि. परभणी
८२७५३३६६७५

२५ जून २०२३

उपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवणारी नदीष्ट

 

"उपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवणारी नदीष्ट"

     

 मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या j'अक्षर भेट' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांची लेखनामागील भूमिका आणि साहित्यकृतीवर चर्चा घडवून आणल्या जाते. त्या कार्यक्रमात नदीष्ट ह्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्वतः मनोज बोरगावकर उलगडून दाखवणार होते.

कोरोना काळात अनेक ऑनलाईन कार्यक्रम ऐकले परंतु नदीष्ट विषयी मनोज बोरगावकर बोलत असताना नित्यनेमाने नदीच्या परिसरात घडणाऱ्या अनेक घटना,घडामोडी स्वतः जगणारा उपेक्षित जीवन जगणाऱ्यांना आपलस करून बोलत करणारा हा माणूस अफलातूनच वाटला.निर्मितीप्रक्रिया सांगताना ते स्वतः जगलेल सांगत होते म्हणून  तो आभासी संवादही जिवंत वाटत होता आणि म्हणून मला नदीष्ट मूळातून वाचण्याचीmm उbत्सुकता लागून राहिली होती.मी नदीष्ट मागवली आणि झपाटून गेल्यासारखी वाचून काढली.

  ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली नदीष्टची ही तिसरी आवृत्ती असून नयन बाराहाते यांनी नदीष्टला साजेसे मुखपृष्ठ आणि मधे मधे सुंदर रेखाटनं केलेली आहेत.

    नदी जशी कुठलीही अपेक्षा न ठेवता वाहत राहते.तशाच पद्धतीने नदीष्ट मध्ये आपल्याला समाजाने उपेक्षित ठरवलेले, उपेक्षित जीवन जगणारे बामनवाडा,सकिनाबी, कालू भैय्या,सगुणा,मालाडी, दादाराव,भिकाजी ही माणसं भेटत राहतात.उपेक्षित असूनही माणसाने माणसांशी कस माणसासारखं वागल पाहिजे.हेच त्यांच्या वागण्या-बोलण्यातून शिकवून जातात.

  सकीना भिकारीन असूनही नदीवर झालेल्या जुजबी भेटीमुळे रेल्वे स्टेशनवर ओळखीशी इमान राखून लेखकाला चोरांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा भिकारीन असूनही तिच्यातल्या माणुसकीच्या दर्शनाने ती खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरते.

  नदीकिनारी चिंचेच्या झाडाखाली हरणाच्या कळपाला माकडे फांद्या हलवून चिंच आणि पाला खाऊ घालत होते.अर्थात त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच करत होते आणि ही परोपकाराची ही भावना त्यांच्याकडूनच आपल्यात वाहत आली असावी असे म्हणत असतानाच. माणूस किती स्वार्थी वृत्तीने वागतो आहे हे सांगताना ते म्हणतात.

" दाटून येणाऱ्या अंधारातही माकडांनी हरणावर केलेल्या परोपकाराच्या उजेडाचा तुकडा सोबत घेऊन मी अंधार तुडवत मंदिराकडे निघालो घाटावरच्या ट्यूबच्या तीव्र प्रकाशात तो खालून आणलेला उजेडाचा तुकडा केव्हा हरवून गेला हे कळलेच नाही."अशा प्रकारे परोपकाराची वृती माणसाने सहज हरवून टाकलेली आहे. 

  नदीवर मासे पकडून कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा पुरभाजी बामनवाड त्याच्यासमोर नदीवर टवाळखोर पोर जेव्हा आंघोळ करणाऱ्या बाईवर अत्याचार करतात.तेव्हा तो काही करू शकत नाही.प्रतिकार करावा तर त्याचा जीव घेणारी पोर पाहून गप्प बसणारा बामनवाड दोन महिने नदीकडे फिरकला सुद्धा नाही. त्या बाईची अवस्था पाहून तो म्हणतो, "त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पान्या परीस,नदीचं पाणी मला कमजोर वाटलं" स्वत:च्या जीवाला खाणा-या बामनवाडने

दोन महिने त्याचे कुटुंब कसे चालवले असेल तर असो, पण बाईला मन मोकळं करण्यासाठी असं कोणतंच हक्काचं ठिकाण भेटत नाही.जिथ हक्काने विश्वासाने आपल्या मनातलं दुःख ती सांगू शकेल,असे हक्काचे विश्वासाचे खांदे तयार व्हावेत.असे लेखकाला वाटते आणि ते होणे आवश्यक आहे.

   नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान पाहून कालू भैय्या नदीला उद्देशून म्हणतो,"आपने माँ ये नाम को बट्टा लगाया उसने!" तेव्हा दादाराव कालु भैय्याला सांगतो ते जसं काही नदीच्या मनातल्या भावना तो बोलून दाखवतो.नदीचा महापूर म्हणजे तिची भडास आहे असं सांगतो माणसाला जसं कोणासमोर तरी हक्काच्या ठिकाणी मन मोकळ करायच असत तसच नदी महापुराच्या रूपाने आपलं मन मोकळं करत असते.अगदी आडदांड मुलाच्या कानफटात मारतानाही त्याला इजा होण्यापेक्षा तो सुधारावा अशी भावना असते, अगदी तशीच भावना महापूरातल्या नदीची असते.तिला जीवन उद्ध्वस्त करायचे नसते तर पुनरुज्जीवन करायचे असते. नदी वाहती राहिली तरच सर्व जीवन वाहते राहील,नदी स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर माणसाच्या अस्तित्वासाठी झगडत आहे.हे ध्यानात आणून देणारा दादाराव पुराने सर्वस्व धुवून नेल असल तरी आपल्या जवळ असलेल नाण नदीत टाकून कृतज्ञ होणारा दादाराव.जगाला सकारात्मक पद्धतीने नदीकडे पाहण्याची दृष्टी देणारा दादाराव महत्त्वाचा वाटतो.वृक्षतोड,वाळू,

मातीचा उपसा याद्वारे नदीची लूट करणाऱ्या मतलबी माणसाला दादाराव नदीकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला भाग पाडतो.

     नदीष्ट मध्ये आणखी एक व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेते आणि विचार करायला भाग पाडते.ती म्हणजे भिकाजी. मांजरा बद्दल मनात प्रचंड राग असलेल्या भिकाजी कडून अनावधानाने दारूच्या नशेत मांजर समजून स्वतःच्या मुलीलाच फेकून भिंतीवर मारल्यामुळे भिका-याच जीवन जगावे लागत असलेला भिकाजी.नक्कीच स्वतःची मुलगी मारण्या एवढा क्रुर नाही,परंतु नकळतपणे घडलेल्या त्या क्रुर घटनेमुळे तो भोगत असलेल दुःख हे जगाला सांगू शकत नाही;परंतु लेखक नदीचा तळ

शोधण्यात जसे पारंगत आहेत त्याच पद्धतीने भिकार्‍याच जीवन जगणार्‍या भिकाजीच्या मनाचा ठाव घेण निश्चितच एवढं सोपं नाही.त्यासाठी लेखक स्वतः भिकाजीच्या डब्यातील पदार्थ खातात आणि स्वतःचा डबा भिकाजीला देतात अशा एक ना अनेक प्रसंगातून लेखकाच वंचित समजल्या जाणाऱ्या माणसांना आपलस करण त्या अबोल लोकांना मन मोकळं करायला हक्काची जागा देऊन.वंचितां मध्ये असलेल संवेदनशील मन दाखवून दिलेले आहे. वंचितांच्या मनातला संवेदनशीलपणा, चांगुलपणा, प्रेम प्रदर्शित करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. 

 भिकाजीचाच विचार केला तर वरडोळे माशांना रोज लंगर मधील भाकरी कुसकरून टाकणं. स्वतः भीक मागून जमवलेले पैसेही जुजबी ओळख असलेल्या गब्दुल्या कॉन्ट्रॅक्टरला 275 पैकी फक्त पाच रुपये ठेवून 270 रुपये देणे. किडनी फेल झालेल्या मुलाच्या बापाने किडनी द्यायची विचारणा केली की लगेच किडनीही द्यायला तयार होणं,

दारूचा वास येईल म्हणून मुलीचा पापा न घेणारा माणूस कसा असंवेदनशील असू शकतो हे वाचकालाही पटायला लागतं.

   नदीष्ट वाचत असताना सगुणा हे तृतीयपंथी पात्र मेंदूला झिणझिण्या आणणारा प्रश्न करत.

"नजरे चुरानेवाले तुम..और हिजडे हम.. वारे व्वा.. सच्ची बता,आँख मे आँख डालके देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ नारे !"

   नदीष्ट वाचत राहताना हा प्रश्न मनातून काही जात नाही.तो आपल्याला निरूत्तर करतो,परंतु सगुणा तृतीयपंथी जरी असली तरी मनाने कशी संवेदनशील आहे.तिच्या वाट्याला हे कशा पद्धतीने आलं.हे नदीष्ट वाचत राहताना आपल्याला तृतीयपंथीयांच जीवन उलगडत रहात.आपण जगत असलेल्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का न लागू देता सगुणा कशी वागते.याच वाचकाला अप्रूप वाटायला लागत.

  लेखकाला नदीच एवढ आकर्षण का आहे.हे सांगता येत नाही पण त्यांचे एक तत्वज्ञान आहे. ते म्हणजे जन्माच्या आधी आपण आईच्या गर्भात पाण्यातच होतो ना!आईच्या गर्भाशी नदीला जोडणारे मनोज बोरगावकर पुढे म्हणतात "आपल्याला असलेल्या नदीच्या अनादी आकर्षणाचे कारण आईच्या गर्भाशी तर निगडीत नसेल ना? नदी म्हणजे विस्तारत गेलेले गर्भाशय" काळ,वेळ प्रसंग याचे कुठलेही भान नसलेले मनोज बोरगावकर यांना कालू भैय्या जेव्हा जपून पोहायला सांगतो. तेव्हा ते म्हणतात."ये नदी की कितनी आदत हो गई है ना,माँ की गोद की तरह, बोलो तुम्हीच कालू भैय्या, माँ की गोद मे कुछ धोका हो सकता है क्या?" एवढ नदीशी एकरूप झालेले मनोज बोरगावकर नदीष्ट कसे आहेत हे आपल्याला समजायला लागत.

   नदीष्ट मधील पात्र ही कुठल्यातरी दुःखाने भरून वाहणारी आहेत.त्यांच्या दुखऱ्या आयुष्याकडे कोणीही निकोपदृष्टीने पाहत नाही परंतु लेखक या वंचित माणसाकडे निकोपदृष्टीने पाहून त्यांना आपलंसं करून त्यांच्यातलाच तो जिवाभावाचा होतो म्हणून,एखादी जखम जशी भळभळा वहायला लागते. त्या पद्धतीने ही वंचित माणसं लेखका जवळ आपल दुःख भडभडा बोलून मोकळे होतात.लेखक त्यांना व्यक्त होण्यासाठी हवी असणारी हक्काची जागा निर्माण करून देतो.त्यांना आपला जवळचा वाटतो म्हणून ह्या कादंबरीतील दुखरी,वंचित माणसं मोकळेपणाने बोलायला लागतात.

   एखाद्या माणसाला कशाचा नाद,छंद असल्यास आपण जसे नादीष्ट माणूस आहे म्हणतो, तसे मनोज बोरगावकर हे नदीष्ट माणूस आहेत.एखाद्या जखमेतील दु:ख जोपर्यंत बाहेर पडत नाही. तोपर्यंत ती जशी ठसठसत रहाते,ती ठसठस,तो त्रास मनोज बोरगावकर यांना नदी किनारी भेटणा-या दु:खी माणसाला बोलतं करे पर्यंत त्यांना चैन पडत नाही.त्यांना बोलत करे पर्यंत ते बेचैन असतात.जेव्हा त्या दु:खी माणसाला आपलस करून त्यांचे दु:खाने ठसठसणारे मन हळुवारपणे बोलत करून त्याला दु:ख मुक्त करतात.तेव्हाच मनोज बोरगावकर यांना चैन पडते.हे नादीष्टपण आणि नदीष्टपण त्यांच्यात कायम रहावो.ते तुमच्यात माझ्यात येवो आणि ही माणुसकीची नदी अखंड अशीच वहाती रहावो.

   नदी किनार्‍याने अनेक संस्कृतीचा विकास झाला.अनेक नगर,नागरी वस्ती, वसाहती नदीच्या प्रदेशात वाढत राहिल्या नदी अनादि काळापासून अखंड स्वतः दुःख भोगत आपल्याला समृद्ध करत वाहत आहे.अनेक बाया माणस अशी आहेत ज्यांना दुःख हलकं करण्यासाठी नदी आपली वाटते आणि अगदी तसेच मनोज बोरगावकर यांनी स्वतःनदी होऊन नदीष्ट मधील काळजी घेणारा कालू भैय्या,बामनवाड,दादाराव,पुजारी, प्रसाद,सकिनाबी, मालाडी,मीनासाब,सगुणा,भिकाजी या वंचित माणसांना बोलतं करण्यासाठी समाजाचा विचार न करता मन मोकळं करायला हक्काची जागा उपलब्ध करून दिली.नदीष्ट मध्ये ख-या अर्थाने अपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवण्याच काम नदीष्टच्या माध्यमातून केलेलं आहे.नदी जशी वाहत राहिली की, तिच पाणी शुद्ध होत जात तशाच पद्धतीने माणसांनी आपल्यातले राग,लोभ, अहंकार,मत्सर विसरून अहंकाराच ओझ डोक्यावरून उतरवल तर नक्कीच आनंद वाटणारी आनंदाची ही नदी वहाती राहील यासाठी आपणही नदीष्ट होवू या. 

         नामवंत अनुवादक चंद्रकांत पोकळे यांनी   

नदीष्टचा कन्नड भाषेत अनुवाद केला आहे.नदीष्ट अशीच अनेक भाषांमधून जगभर वाहत राहो याच शुभेच्छा.


कादंबरी- नदीष्ट

लेखक- मनोज बोरगावकर 

प्रकाशन - ग्रंथाली, मुंबई 

मूल्य- दोनशे रुपये


  शरद ठाकर 

सेलू जि.परभणी

८२७५३३६६७५


१३ जून २०२३

संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता


"संवेदनशीलतेचा उजेड पेरणाऱ्या काळोखाच्या कविता"

 

'काळोखाच्या कविताहा कवी नामदेव कोळी यांचा वर्णमुद्रा प्रकाशन,शेगाव यांनी प्रकाशित केलेला कवितासंग्रह असून,मुखपृष्ठ राजू बाविस्कर यांचे तर आतील बोलकी रेखाटने जितेंद्र साळुंखे यांचे आहेत.डॉ.भरतसिंग पाटील यांच्या प्रदीर्घ प्रस्ताविकेतून कवितासंग्रहाचा परिचय होतो.

        साधूचे कूळ आणि नदीचे मूळ पुसू नये असे म्हणतात त्याप्रमाणे कवी त्यापुढे जाऊन काळोखाचे गूढ पुसू नये असे म्हणतो.हा दुःखाचा वेदनेचा काळोख सर्वांच्याच वाटेला आलेला असतो. दुःखाच्या काळोखाची सल मनात असते म्हणूनच कवितेचा अर्थात 'काळोखाच्या कवितेचाजन्म होतो.आणि या कवितेच्या माध्यमातून कवी उजेडाची तिरीप होऊन जातो. 

 "अस्वस्थता पोखरते माझं सबंध शरीर 

मन मेंदू पेशीपेशी 

एक उजेड चालत येतो माझ्या दिशेने विलीन होतो माझ्यात 

मी उजेडाची एक तिरीप"

   ( उजेडाची एक तिरीप पृ.१६) 

     दुःखाचा हा काळोख सरावा म्हणून जो तो प्रयत्न करत असतोपण काही लोक अडचणीच्या दुःखाच्या काळात आपल्या म्हणवणाऱ्यां सोबत राहतात आणि उजेडाची तिरीप येताच सर्वांना सोडून भूतकाळ विसरून पुढे जातात.परंतु या काळोखाच्या कवितांमधून आपल्याला खऱ्या अर्थाने कवी आपल्या कवितेतून त्यांच्या माय बापा विषयी कसे संवेदनशील आहेत हे प्रकर्षाने जाणवते आणि या कविता काळोखाच्या जरी असल्या तरी वाचकाच्या मनात त्या हळुवारपणे संवेदनशीलतेचा उजेड पेरण्याचे काम करतात.

    काळोखाच्या कविता हा कवितासंग्रह कवीच्या काळोख्या आयुष्यात चैतन्याचा उजेड पेरणाऱ्या वासंतीताई आणि बाबांना अर्पण केलेला आहे. प्रिय वासंतीताईस ह्या  कवितेतून  ताई म्हणजे जणू आईचे दुसरे रूपच.आईची जशी लेकरावर माया असते त्याच प्रमाणे ताईही आपल्या भावासाठी पडेल ती काम करतेकष्ट करते कठीण परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून भावाच शिक्षण पूर्ण झालं पाहिजे,भाऊ शिकला पाहिजे त्याच्या आयुष्यातील काळोख कमी झाला पाहिजे. ही तिची भावना असते. प्रिय वासंतीताईस या कवितेत मला माझ्यासाठी शिक्षण अर्धवट सोडणारी माझी ताई मला दिसते. भावाच्या  आयुष्यात उजेड पेरण्यासाठी उन्हातान्हात खपून मेहनतीची काम करूनगुरंढोरं सांभाळणारी गवताचे भारे कापणारी,खुरपणाच्या तासाला सगळ्यात पुढे असणारी बहिण-भावाला प्रेमाचा सल्ला पुढील शब्दात देते.

 "गह्यरा मोठ्ठा मानूस बनजो

आपल्याले कमी लेखनारांच्या

नाकातले केसं बाय्जो

गरिबाले हलकी वडांग समजनारांले दाखोई देजो 

एक ढोरक्याचा पो-याबी शिकी सवरीसन घरदार पुढे नेवू शक्तो

   (प्रिय वासंतीताईस,पृ.५४ )

पण दुःखाची गोष्ट हीच की,काळोखाचे दिवस पालटलेले असतांना हे सुख पाहायला काळोख दूर सारणारी उजेड पेरणारी ताई आज नाही.

     अभावग्रस्त वातावरणातही माय कशी परिस्थितीशी दोन हात करते.नेटाने जगण्याची अन् कुटुंब जगवण्याची लढाई कशी हिंमतीने लढते हे सांगताना कवी म्हणतात.

"कित्येक पावसाळे गेले

 पण 

थेंबांशी झुंजणारी माय

मात्र कधी थकली नाही"

   ( अथक,पृ.२१)

 थकनं कुढणं हे मायीला माहीतच नाहीसकाळी उठल्यापासून हात चलताच असतो.रामपहारी उठली की सडा-सारवण करणं,गोठ्यातील शेण काढणं,स्वयंपाक करणं,धुणीभांडी करणं,शेतात जाणंशेतातून आलं की पुन्हा चुलीला लागायचं  स्वयंपाक करायचा,चिल्यापिल्यांना खाऊ घालायचं,खरकटी भांडीकुंडी करून उद्याची चिंता करत झोपायचं.ही नित्याची लढाई माय कशी लढते हे पुढील शब्दात सांगितले आहे.

"तिन्ही सांजेची लढाई  

चुलीतल्या निख-याशी

जन्मभराची टक्कर

दुनियेच्या पसा-याशी"

(जीव खोल खोल डोह,पृ.२५)

  या काळोखी दुनियेशी टक्कर देत असताना माय जुने लोकसंकेत,श्रद्धा-अंधश्रद्धा सर्व बाजूला सारून अमावसेच्या दिवशी लेकराला आवडणारी उडदाची डाळ शिजवते.परिस्थितीशी दोन हात करते,परंतु मुलगा जेव्हा शहरात जायला निघतो.तेव्हा ती हळवी होते.

निघालो तेव्हा घर रिकामं रिकामं धुरानं माखलेलं

तिच्या डोळ्यात आभाळ भरून आलेलं

     (आभाळ पृ.२८)

     ज्यांनी शिक्षण नोकरीच्या निमित्ताने घर सोडलेलं असतं त्यांनी हे आभाळ भरून येणं अनुभवलेलं असतं.

   'मायनं कविता केली असती तरह्या कवितेत मायन कविता कशावर केली नसती हे कवितेतून मांडतानाच तिला नियतिवर कविता लिहायची असेल असे म्हणतात.निश्चितच मायने रडत कुढत बसणारी,दु:ख सांगणारी  कविता लिहिली नसती तर मायने नियतीवर कविता लिहिली असती आणि नियतीला ही ठणकावून सांगितले असते तू कितीही निष्ठूरपणे वाग मी तुझ्यावर विजय मिळवणारच.

      माय,अथक,सुखाचं मरण,गवरीची राखजीव खोल खोल डोह,आभाळ,नजरा नजर,चिमणी,मायन कविता केली असती तर ह्या कवितांमधून माय कशी आहे.हे आपल्याला समजून येते.    

        माय जितकी सोशिक नियतीवर विजय मिळवणारी तेवढाच बापही संसाराला हातभार लावणारा आयुष्याच्या शेवटच्या काळातही गुरं ढोरं राखून,   लोकाची रानं बटईन करून कष्ट करणारा.बाप सालभरचा दाळदाना धकावा  याच्यासाठी लोकांच्या वावरात राबतो प्रसंगी स्वतःची जमीन पडीक पडू देतो पण दुस-यांची शेत नेटाने मनलावून बटईने करतो.बटाईने केलेल्या शेतात फायदा होईल,की तोटा हे निसर्ग,बाजार या बेभरवशाच्या जीवावर तो एक प्रकारे शेती बटाईने करून जुगारच खेळत असतो.

 “शेती हा जुगार आहे

 कितीदा अनुभवूनही

बाप घालत असतो उखळात डोकं"

  (बटाई पृ.३३ ) 

कितीही कष्ट झाले तरी काळ्या आईची ओटी भरणे.हे कर्तव्य समजणारा  बाप बेभरवशाची शेती आनंदाने करत राहतो. गुरं ढोरं राखून लोकांची रानं बटईन करूनगुराढोरांना सर्वस्व समजणाऱ्या बापाला जेव्हा ढोरांच्या वाड्यात सुने खुंटे  दिसतात.तेव्हा थकलेला बाप अस्वस्थ होतो.घरात जेव्हा बाप असतो तेव्हा बाप कधी कोणाला रागं रागं बोलत नसला तरी  त्याच्या असण्याचा नैतिक धाक असतो.त्यामुळे घरात आई,सुन डोक्यावरचा पदर सारखा सावरत असतात.त्या सोबतच बापाच्या धाकाने  घरात सर्व काही ठीकठाक असतं परंतु बाप गेल्यानंतर घरातला धाकही संपून जातो.ह्या पोरकेपणाचा घरच्यां शिवाय बाकी कोणाला फरक पडणार नसला तरी बाप गेल्यानंतर काय झालं आहे. ते पुढील शब्दात सांगतात. 

"सुनी पडली नदीची वाट

पोरकी झालीत गावातील गुरं-ढोरं  

दिसली नाही दिवटी लव्हाळीच्या नागफणांची

दिवाईची गाणीकितीतरी लोककथा

सोबत घेवून गेला बाप 

याचा कुणालाच नाही पडला फरक"

  ( धाक पृ.६६)

 

        ढोरांशी बनलय बापाचं नातं,

पडीक,बटाई,पोरकंपण,ठिबक,सुने खुंटे,बेलगाम,धाक ह्या कवितांमधून नामदेव कोळी यांनी शेतकरी कष्टकरी बाप उभा केला आहे. 

       पुढे माय-बापाच्या दोघांच्या कविता आहेत.'लवकरच पाऊस येईल म्हणून 'या कवितेतून दुस-यांच्या आनंदात आनंद शोधणारे माय बाप भेटतात.पखांचे मुंगळे दिसले की माय सुखावते कारण मायीला माहित आहे. पखांचे मुंगळे निघाले म्हणजे आता लवकरच पाऊस पडणार आणि सगळीकडे समृद्धी येणार म्हणून आनंदून जाणारी माय अन् शेतात गायी वासरांच उड्या मारणंचिमण्यांची धुळांघोळ,मोरांचा नाच पाहून बापही आनंदी होतो.दुस-याच्या आनंदात आनंद पाहिला की घरही आनंदून जाते.

  थकलेल्या मायबापाची कविता मध्ये बाप सकाळ पासून फाटक्या कपड्यानिशी ढोरं घेऊन रानात जातो आणि माय अनवाणी पावलांनी दूरवरच्या रानात जाते दोघंही कष्ट करतात,बाप सांधेदुखी घेऊन तर माय पायांत कुरपं घेऊन परतते अन् कवी शहरातल्या मुलांना थकलेल्या माय बापाची कविता शिकवून परततो.या कवीते मधून  कवीची आपल्या माय-बापाला म्हातारपणी कष्ट करावे लागतात या बद्दल अपराधीपणाची भावना दिसून येते.माय बापाला शेतात मदत करावी की शहरात काम कराव ह्या प्रश्नांच मोहळ सारखं कवीच्या डोक्यात असतं. प्रगती करायची तर गाव सोडावं लागत,शहरात जावं लागत,तिथेही प्रयत्न करत राहून मेहनत करावी लागते,पण पैसा,प्रगती,प्रतिष्ठा यासाठी हे सगळं करावच लागत.

"माय माती माणसं

ओढून नेतात गावात

पैसा प्रगती प्रतिष्ठा

झुलवत ठेवते शहरात"

   (प्रश्नांच मोहळ पृ.१५)

     'ही कुठली दहशत?' या कवितेतून शेतमजूरांना उन्हातान्हात कष्ट करून कामाचे दाम मागायला शेत मालकाला घाबरत घाबरत पैसे मागावे

लागतात.शेतमजूरांच्या मनातली शेतमालका बद्दल ची दहशत या कवितेतून दिसून येते.बाप जेव्हा पोरग शिकावं म्हणून पाटलाची खंडीभर ढोरं फुकट सांभाळतो. मास्तरान पोराला चांगलं शिकवावं म्हणून माय मास्तराला दाळदाना देते अन् शेवटी पोरग शिकून पाटलाचा आणि मास्तराचा त्यांच्याकडे किती पैसा शिल्लक राहिला हा हिशोब माय बापाला सांगतो.तेव्हा आपल शोषण झालं,पण लेकरू शिकल्यामुळे आता त्याचं कोणीही शोषण करू शकणार नाही.याचा आनंद पुढील ओळीत व्यक्त केला आहे.

 “अक्षर शून्य माय बापाला

हिशोबातल कवडी इतकंही कळत नाही

पण पोराला हिशोब येतो 

याचा आनंद आभाळात मावत नाही"

      (हिशोब पृ.४५)

   ज्या विळ्याच्या जोरावर बापाने ह्या काळोखाला चिरलं त्या विळ्याशी जन्मभराच नातं आहे.कारण विळ्याच्याच मदतीने मायने लेकरांच्या नाळी कापल्या,आपल्या गुरांसाठी चारा कापला,जनावरांची शिंग साळली प्रत्येक ठिकाणी मदतीला येणाऱ्या विळ्याला

बापानं धार लावली अनेक काम घेऊन हातावेगळी केली.जगण्याची लढाई लढली परंतु आता विळ्यासह घराला धार लावणारे आणि काळोखाला चिरणारे बाबा नसल्याने मायीचेही हात बोथट झाले आहेत.

अशाप्रकारे थकलेल्या माय बापाची कविता,ही कुठली दहशत,हिशोब,विळासमुद्र न पाहिलेला माणूस,सलाईनससा रे ससा,गणगोत या कवितांमधून माय बापाचे  दर्शन होते .

     शेतमजूर या कवितेतून शेतमजूरांचे हाल मांडतानाच तत्रैव ही कविता शेतमजुरांचे मन पिळवटून टाकणारे प्रश्न आपल्या समोर अधोरेखित करते. 

घरोबा,मजबूरी,शेतमजुराच्या पोरी या कवितांमधून शेतमजुरांचे शोषण त्यांची होणारी कुचंबना दिसून येते. त्यांच्या वाट्याला आलेले हे परंपरेने आले आहे. म्हणून ते त्याच मार्गाने चालत राहतात त्यामुळे शेतमजुरांच शोषण होतच राहते त्यांना सर्वकाही सहन करावं लागतं. परिस्थितीमुळे ते स्वीकारावं लागतं.हे पुढील ओळीत मांडलेले आहे

"शेतमजुराच्या पोरी गरीब गायी

बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा

स्विकारतात आपल्या वाटेचा भोगवटा

रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप"

    (शेतमजुराच्या पोरी पृ.५१)

   शेतकरी शेतमजुरांचं हे अख्ख गावच सरकारी दवाखान्यात वेगवेगळ्या समस्यांनी भरती झाला आहे.गावातल्या प्रत्येकालाच कुठलं तरी दुखन झालेलं आहे.

"गरिबाला आजाराला नापिकीला कंटाळून

मरून पडलंय अवघं गाव शवागारात

शहरातल्या सरकारी दवाखान्यात"

      (सरकारी दवाखाना पृ.५६)

     अशा शब्दात गावाचं दुःख मांडलेल आहे.त्यापेक्षा शहरात जाऊन पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गाव सोडून लोक चालली आहेत.

खेड्यापाड्यात टी.व्ही.,मोबाइल पोहोचला पण भुकेचा प्रश्न सुटला नाही.म्हणून बरेच लोक गाव सोडून निघून चालले आहेतपण काही अंधश्रद्धाळू लोक गाव ओसाड झालं तर लक्ष्मी कोपेल म्हणून गाव सोडायला तयार नाहीत.जुन्या वाड्याच्या भिंतीवर पिंपळाचे झाड वाढावं तसं मोठ्या उमेदीने शेतात राबून कष्ट करणाऱ्या शेतकरी,शेतमजुरांमुळेच गावाला गावपण टिकून आहे.हे पुढील ओळीतून स्पष्ट होते. "कित्येक पिढ्यांपासून

गावाला चिकटलीयत ही माणसं

कराडीवर मुळ्या रोवत

उमेदीन वाढणाऱ्या झाडांसारखी

  (भंगतीचा पाय पृ.६८)

    एकंदरीतच काळोखाच्या कविता मधून माय,बाप,माय-बाप,शेतकरी शेतमजूर,गाव,गावकरी अन् शहरातील कष्टप्रद जगण्यातूनही जगण्याकडे सकारात्मकपणे पहायला मिळते.

 

कवितासंग्रह - काळोखाच्या कविता

कवी-नामदेव कोळी

प्रकाशन- वर्णमुद्रा प्रकाशनशेगाव.

मूल्य -२५० 

 

  शरद ठाकर 

८२७५३३६६७५

सेलू जि परभणी

 


१० जून २०२३

प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'

 प्रेमासह सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या 'कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या'



'कविता विशीतल्या आणि मिशीतल्या ' हा मधुकर जाधव यांचा कवितासंग्रह शीर्षकापासूनच आकर्षणाचा विषय वाटतो. या संग्रहात एकूण ७१ कविता असून, या कविता दोन भागात विभागलेल्या आहेत.पहिल्या भागात शीर्षका प्रमाणेच विशीतल्या कविता आहेत. काव्यलेखनाची सुरुवात बहुतेक करून तारुण्याच्या काळात होते आणि त्या तारुण्याच्या काळात कवीचे आकलन, त्याचे रुचीचे विषय यानुसार कविता लेखन व कवितेचे विषय त्या कवितेतून येत असतात, पण तारुण्यात काव्य लेखन करणारे बहुतेक कवी प्रेम कवितेपासून काव्यलेखन करतात. विशीतला काळ हा कोणावर तरी प्रेम करण्याचा, झुरण्याचा असतो. त्याप्रमाणे मधुकर जाधव यांनी पहिल्या भागात प्रेमकविता घेतलेल्या आहेत. कवीही माणूस असतो. माणूस म्हटला की तोही कोणावर तरी प्रेम करतो. परंतु कोण काय म्हणेल म्हणून बरेच कवी प्रेम कवितेला आपल्या कवितासंग्रहात जागा देत नाहीत. परंतु मधुकर जाधव यांनी प्रेम कवितांचाच एक विभाग केलेला आहे. प्रेम म्हणजे वासना, विकार न ठरता प्रेम ही एक निकोप, निरागस भावना असली पाहिजे. प्रेम फक्त प्रियकर प्रेयसीचेच असते अशातली गोष्ट नाही. तर जीवनात प्रेम करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. ज्यावर आपण प्रेम करावे, पण तसे होताना दिसत नाही. उगाचच कुणावर एकतर्फी प्रेम करणे चुकीचेच आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे.

प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असू शकते, म्हणून मला जे आवडते. ते प्रत्येकालाच आवडेल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.त्यातून अपेक्षाभंग होऊन नको ते घडते. प्रेमाच्या, विरहाच्या, रुसण्याच्या, फुगण्याच्या, स्वप्नाच्या अनेक कविता विशीतल्या कवितेत आहेत.


            मिशीतल्या कविता या भागातील कविता ह्या प्रेमाच्या रंगीबेरंगी स्वप्निल दुनियेतून बाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जगणे आणि जीवन काय आहे याचे भान आल्यानंतर, जीवनातले टक्के-टोम्पे खाल्ल्यानंतर जगण्याचे प्रगल्भभान आल्यानंतरच्या कविता ह्या भागात आलेल्या आहेत.आपल्याला कविता बदलली असे वाटत असले, तरी कविता तीच असते.फक्त आपल्या जगण्याचे संदर्भ बदललेले असतात. तारुण्यात प्रेम, प्रौढत्व आले, की घर संसार आणि त्यासोबतच अनेक समस्या अशा बदलामुळे आपल्याला कविता बदललेली वाटते, परंतु कविता तीच असते फक्त त्या कवितेचे विषय आणि आशय मात्र बदललेले असतात. याबद्दल ते म्हणतात.


' कविता कविताच असते

विविध अर्थछटा मांडणारी

आयुष्याचे दुवे सांधणारी

बदलत जातात शब्द, अर्थ

फार तर कवितेचे विषय'


        लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना, स्वार्थी राजकारणाला आणि त्या स्वार्थी राजकारण्यांच्या आश्वासनांना भुलणाऱ्या मतदारांना ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम करतात. कारण कुठलाही पक्ष सत्तेत येईपर्यंत जनतेच्या सोबत असतो. त्याला सर्वसामान्यांबद्दल कळवळा असतो आणि तेच जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा त्यांना कोणाबद्दलही आस्था वाटत नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे नित्याचे प्रश्न त्यांना सोडवावे वाटत नाहीत, की शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा वाटत नाही. गरीबी, बेरोजगारी, खून, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे थांबवावे असे कोणालाही वाटत नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ता पाहिजे असते आणि ती मिळवण्यासाठी ते नैतिकता, नितीमत्ता, निष्ठा या सर्व गोष्टी गौण ठरवून राजकारणी लोक आपला स्वार्थ साधून घेत असतात, तर सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नीतिमत्ता, निष्ठेच्या नावाने नको त्या माणसांमागे लागून आपले कामकाज सोडून त्यांच्या मागे भटकत असतात. आपल्या मतलबापुरता गोड बोलणारा, कौतुक करणारा आपला माणूस जेव्हा त्याचा स्वार्थ साधला की बदलतो. तेव्हा सर्वसामान्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी जागरूकपणे विचार करून निस्वार्थपणे चांगले काम करणाराला मतदान केले पाहिजे. तरच आपली लोकशाही टिकून राहिल हे ते पुढील शब्दात सांगतात.


'मतदारांनो जागरूक राहा 

नका पडू बळी भूलथापांना 

मतदानाचा हक्क बजावून 

वाचवा प्राण लोकशाहीचे'


     या कवितासंग्रहात आई-वडील,आजी यांच्यासह देश प्रेमावरच्याही कविता आहेत. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या मायबापाने आपल्यासाठी काय करून ठेवले आहे असे विचारत असतात, परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नसते, की हा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण मुलगा म्हणून आपल्या माय बापासाठी काय केले आहे. 'जावे त्याच्या वंशा' या कवितेतून बापाचे कठोर वागणे काय आणि कसे असते, त्यांच्या वागण्यातल्या कठोरपणाही का महत्त्वाचा असतो आणि त्या कठोर वागण्यातही आपले हीत कसे आहे हे ते सांगतात. मायबापाने माझ्यासाठी काय केले हे समाजातले लोक विचारत असतील, पण कवी मधुकर जाधव यांना हा प्रश्न विचारणे सयुक्तिक वाटत नाही. कारण समाजातला प्रत्येक मुलगा आदर्श पुत्र म्हणून वागला पाहिजे असे त्यांना वाटते म्हणून ते म्हणतात.


'आज जरी समाज निष्ठूर आहे 

अनैतिकतेचे जिथे काहूर आहे 

दुर्जनांच्या भरलेल्या मैफिलीत 

सज्जन म्हणून जगायचे आहे'


          अशा पध्दतीने प्रत्येकाने स्वत:हून सज्जनासारखे वागायचे ठरवले, तर समाजात वृध्दाश्रम चालवायची वेळ येणार नाही.


        आज आपण दुसऱ्याच्या नावाने खडे फोडतो. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीच केले नाही म्हणतो, पण आपण याही गोष्टीचा कधीतरी विचार केला पाहिजे, की माझ्याही कामगिरीचे मूल्यमापन माझ्यानंतर येणारी पिढी करेल तेव्हा मलाही त्यांना उत्तर द्यावे लागेल. या गोष्टीची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले तर सर्वांनाच चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही, म्हणून जल, जंगल, जमीन, नैसर्गिक पर्यावरण यांचा व्यवस्थित वापर करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तरच येणारी पिढी आपल्याला माफ करेल, एवढेच नाहीतर मानवतेचे,

संस्कारशीलतेचे, प्रेमाचे, आपलेपणाचे, आपुलकीचे जे विविध जाती धर्मातील एकोप्याचे नातेसंबंध आहेत. त्याचा वसा आणि वारसा आपण पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे. ज्या पद्धतीने बिजाचे अंकुरात, अंकुराचे रोपात, रोपाचे महावृक्षात रुपांतर होते आणि तो वृक्ष फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन आणि बरेच काही माणसाला देतो. ही त्या झाडामधील देण्याची वृत्ती, दातृत्वशीलता माणसात उतरावी ही अपेक्षा कवी मधुकर जाधव यांनी केली आहे. ही अपेक्षा म्हणजे जणू आधुनिक पसायदानच म्हणावे लागेल ते म्हणतात.


'बीज, अंकुर, रोपटं, महावृक्ष 

असे निसर्गनियम अबाधित राहो 

ही अपेक्षा आता पिढीजात व्हायला हवी 

सावली देण्याची अंगभूत काला 

माणसालाही अवगत व्हायला हवी'


        माणसाला वरवर सुंदर होण्यासाठी, दिसण्यासाठी ब्युटीपार्लर आहेत. ज्यामध्ये माणसाचे वरवरचे सौंदर्य वाढवता येते. वरवरच्या सौंदर्यापेक्षा माणूस मनातून सुंदर, निरोगी असला पाहिजे यासाठी समाजात ब्युटी पार्लर सारखे माणसाला विचारशील, सुसंस्कारित करणारे 'थॉट पार्लर' निर्माण व्हावेत असे त्यांना वाटते. जागतिकीकरणाच्या झपाट्यात माणूसही बदलत चालला आहे. सोशल मीडियामुळे तर तो अधिकच संकुचित होतो आहे. समोरासमोर भेटणाऱ्या माणसाला बोलायला वेळ नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांबद्दल उगाचच आपलेपणा दाखवला जात आहे. 'युज अँड थ्रो' च्या जमान्यात माणसाचा वापरही 'युज अँड थ्रो' सारखा करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे त्यांना वाटते.


शेतकरी, मराठी भाषा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीचा विचार, तरुणाई, विविध प्रवृत्ती, मन अशा काही विषयांवरच्या कविता अभंग छंदातून कवी मधुकर जाधव यांनी उत्तमपणे मांडलेल्या आहेत. मधुकर जाधव अभंग छंद उत्तम प्रकारे हाताळू शकतात.

एकंदरीतच विशीतल्या आणि मिशीतल्या ह्या कविता माणसाला प्रेमाच्या दुनियेची सफर करत सामाजिक आणि नैतिक भान देणाऱ्या कविता आहेत. कवितासंग्रहास

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांची नेटकी पाठराखण लाभलेली असून, चित्रकार अरविंद शेलार यांचे मुखपृष्ठ असून प्रा.प्रशांतकुमार डोंगरदिवे यांची कल्पक रेखाटने आहेत. अशा या सर्वांग सुंदर संग्रहास खूप खूप शुभेच्छा!



कवितासंग्रह - कविता : विशीतल्या आणि मिशीतल्या

कवी - मधुकर बालासाहेब जाधव

प्रकाशन - परिस पब्लिकेशन,सासवड.

पृष्ठ -१२०, मूल्य -१७० ₹


समीक्षक

शरद ठाकर

सेलू, जि.परभणी

८२७५३३६६७५

०६ जून २०२३

मिरगाच्या कविता

 चला साहित्य पंढरीचे वारकरी होऊयात



      सात जून मृग नक्षत्राचे बरसणे....हा भारतीय संस्कृतीचा कणा असलेल्या बळीराजाचा सोहळा....मृग नक्षत्र बरसले तरच शेती चांगल्या पद्धतीने पिकू शकते.मृगाच्या धारा जोपर्यंत बरसत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आपल्या शेतात पेरणी करू शकत नाही.

बळीराजा म्हणवला जाणारा शेतकरी सुखी राहावा,आनंदात जगावा यासाठी शेतकऱ्याला कोणाच्या,कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही. त्याला फक्त मृगाचा आरंभ चांगला व्हावा वाटतो‌‌.म्हणूनच शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी शाखा सेलू व अक्षर प्रतिष्ठान सेलूच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ' कविता मिरगाच्या ' हा कार्यक्रम सेलू येथे आयोजित केला जातो.

मराठी साहित्याची आवड असणारे,मराठी साहित्यात काही तरी करू वाटणारे,काही मित्र एकत्र येऊन स्वतः पदर मोड करून,कुठल्याही राजकीय व्यक्तीकडून आर्थिक मदत न घेता गेल्या आठ वर्षापासून साहित्यिक,सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात ' कविता मिरगाच्या' हा साहित्यिक उपक्रम निखळ,निर्पेक्ष हेतूने आयोजित करतात.

    शब्दसह्याद्री प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या मार्गदर्शनात व सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू यांच्या सहकार्याने ह्या  नऊ वर्षांच्या नऊ पायऱ्या चढणे सहजशक्य झाले.

        या बहारदार काव्य मैफिलीत आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कवी,कवयित्रींनी हजेरी लावलेली आहे.ज्यामध्ये अभ्यासक्रमातील कवी शंकर कसबे,हनुमंत चांदगुडे,गीतकार डॉ. विनायक पवार, चित्रकार विष्णू थोरे,नारायण पुरी, अविनाश भारती, संजीवनी तडेगावकर, अण्णा जगताप, प्रा. कल्याण कदम,अमृत तेलंग, जितेंद्र लाड, श्रीनिवास म्हस्के, अलका तालनकर, अरविंद सगर,भाग्यश्री केसकर,रवींद्र केसकर, डॉ.मुकुंद राजपंखे, सारिका बकवाड, योगिराज माने,नामदेव कोळी, महेश देशमुख, राजेश रेवले,विठ्ठल चव्हाण,हरीष हातवटे, आत्माराम कुटे,जयश्री सोन्नेकर,शैलजा वसेकर,संतोष नारायणकर, शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणीचे सचिव कवी केशव खटींग असे अनेक मान्यवर कवी 

' कविता मिरगाच्या ' या काव्य मैफलीत सहभागी झाले आहेत.

    शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे.निर्पेक्षपणे चाललेल्या या साहित्य सोहळ्यास न चुकता मृगाच्या सरीही बरसत असतातच.या  सोहळ्यास रसिक श्रोत्यांनी नक्कीच उपस्थित रहावे.

यावर्षी ई टी.व्ही.  हास्यदरबारसह अनेक टी.व्ही.चॅनल गाजवणारे   कवी,विडंबनकार प्रभाकर साळेगावकर, समाधान इंगळे,संजय बोरूडे,आशा डांगे यांची बहारदार काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.     

       आयोजकांची कुठलीही लूडबुड नसलेला एखादा उत्तम कार्यक्रम कसा असू शकतो.याचे उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे.

     एक साहित्यिक, शिक्षक,डॉक्टर, इंजिनियर,वकील, व्यावसायिक,राजकारणी म्हणून नाही.तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी,सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते त्या महाराष्ट्राच्या शिल्पकार, साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे सामान्य श्रोता म्हणून अशा साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने हजेरी लावली पाहिजे.

    'कविता मिरगाच्या' या कार्यक्रमातील आपली उपस्थिती स्वतः ला नक्कीच सर्वार्थाने समृद्ध करणारी असणार आहे .

      सात जूनची आतुरतेने वाट पाहणारे अनेक श्रोते सेलूत तयार झालेले आहेत.चला या साहित्य दिंडीत  सहभागी होऊन,या साहित्य पंढरीचे आपणही वारकरी होऊयात.

           

         शरद ठाकर

       ८२७५३३६६७५      

        सेलू जि.परभणी

२८ मे २०२३

"माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता"

 "माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता"


        "एक होती सारा" अर्थात सारा शगुफ्ता एक पाकिस्तानी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यामुळे सर्वांना माहीत झाली.बाई म्हणून,कवयित्री म्हणून तिचा जो पाकिस्तान मध्ये छळ होत होता.त्याबद्दल सारा शगुफ्ता अमृता प्रीतम यांना पत्र पाठवते. त्या पत्रां मधून त्यातल्या मजकूरांमधून, कवितांमधून अमृता प्रीतम त्या पत्रांच्या कवितांच्या तुकड्या-तुकड्या मधून साराच्या कवितेची ताकद,तिचे दुःख समजून घेते.तिला जगण्याची उमेद देतात आणि त्या दोघी एकमेकींच्या सख्या होऊन जातात.दोघींना एकमेकीं बद्दल पत्राच्या माध्यमातून संवाद साधल्या शिवाय चैन पडत नाही.
'आशयघन'अंकाच्या स्त्री विश्व विशेषांकाचे संपादन  करताना संपादक तथा कवयित्री संजीवनी तडेगावकर यांना
"मोर आपले पाय बघून रडतो,
मी माझी माणसं बघून रडते"

     ह्या सारा शगुफ्ताच्या ओळी वाचायला मिळतात.तिच्या बद्दल अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेने संजीवनी तडेगावकर सारा बद्दल अधिक माहिती मिळवतात आणि त्यातूनच मराठी वाचकांसाठी 'एक थी सारा' हे   सारा शगुफ्ताचे अमृता प्रीतम यांनी लिहिलेले जीवन चरित्र आपल्याला मराठीत अनुवादित रूपात 'एक होती सारा' वाचायला मिळत आहे.
      मोर आपले पाय बघून रडतो असे  लिहिणारी सारा हे ठिक आहे,पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्या बद्दल जाणून घेताना.साराचे दुःख काय आहे हे खरोखर तिचे 'एक होती सारा'मुळातून वाचल्याशिवाय समजणार नाही. एक स्त्री म्हणून स्त्रीवर माणूस किती बंधने टाकत असतो, तिला एक वस्तू म्हणून तिचा वापर करतो. तिच्या मनाचा,मताचा कसलाही विचार न करता.तिला फक्त स्वतःसाठी राबवून घेणे एवढेच माणसाला माहीत असते. गपगुमान राबवून घेणारा नवरा,घराच्या बाहेर पडायचे बंधन, लिहायचे,वाचायचे बंधन, बाप मेल्यावर बापाच्या अंत्ययात्रेला जायचं बंधन,नव-याच्या वाईट वागण्यामुळे सारा घटस्फोट घेते. न्यायालयातून पोटगी मिळवते आणि मुलांना स्वत:कडे ठेवण्यासाठी न्यायालयात उभे राहून नव-याचे सर्व खोटे आरोप काळजावर दगड ठेवून,मान्य करत तिला म्हणावं लागतं "जज साहेब,हा माणूस एकदम खरं बोलतो आहे,मी स्वैराचारी आणि चारित्र्यहीन आहे.त्यामुळे मी हे कबूल करते की,ही मुलं या माणसाची नाहीत त्या मुलांचा बाप दुसराच कोणी तरी आहे. न्यायालयाने मला परवानगी द्यावी, की मी त्या मुलांना त्यांच्या खऱ्या वडीलाकडे पोहोचू शकेल."मुलांना स्वतःजवळ ठेवण्यासाठी असं मार्मिक बोलणा-या साराच्या मनाला झालेल्या वेदना कोण समजून घेणार आहेत.             
     पालकत्वाची जबाबदारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार साराकडे असताना मुलांचा बाप मुलांना भेटायला आल्यावर. नवऱ्याचा अनादर न करता.मुलांना भेटायला परवानगी देते,पाहुणचार करते. नवरा कुराणवर हात  ठेवून काही दिवसांसाठी मुलं मला दे! काही दिवसांनी मी ते परत आणून सोडील म्हणतो किंवा कायदेशीर कागदपत्र करायचे असतील तर ते पण करून घे असं नवरा म्हणतो. तेव्हा सारा म्हणते "जर तू कुराण हातात घेऊन एवढं सांगतोस तर कायदेशीर कागदपत्रांची काही गरज नाही,माझा कुराणवर विश्वास आहे."
 पण साराचा नवरा पुन्हा साराला कधीच मुलांना भेटू देत नाही.उलट सारा त्याच्या घरी मुलांना भेटायला गेली तर तिच्यावर नोकराकरवी गोळीबार करून तिला त्रास देतो.
सारा पुढे कुटुंबनियोजन विभागात नोकरीला असणाऱ्या मित्रासोबत लग्न करते. सातव्या महिन्यातच तिला बाळ होतं आणि ते काही क्षणातच जगाचा निरोप घेते.त्याही परिस्थितीत नवऱ्याची साथ नसते.दवाखान्यात ती एकटीच असते. तो त्याच्या स्वतःच्या व मित्राच्याच नादात असतो. वरवर नमाज पठण करत जा म्हणणारे,वरवर चांगले वागणारे आणि मनात कोतेपणा असणारे माणसं साराला खूप खुजी वाटायला लागतात.सारा म्हणते "मला भुकेपेक्षा जास्त माणुसकीचा शोध आहे." तिला सक्तीचे सहजीवन मान्य नव्हते.सारा पंजाबी  आणि उर्दू भाषेतून कविता लिहायची पाकिस्तान मध्ये तिचा कवितासंग्रह प्रकाशित होत नव्हता.
खोटेपणा,ढोंग,नाटक, फसवणूक या सगळ्यांशी
सारा चांगलीच परिचित झाली होती, म्हणून तिला कोणाशीच नातं जोडाव वाटायचं नाही.आयुष्यात जे पुरुष आले त्यांचे रूप तिने चांगलेच अनुभवले होते.तिला घरच्यांनी आणि समाजाने वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवलं होतं. इलेक्ट्रिक शॉक दिले. तरीही ती कविता लिहित रहायची.तिचं सुख-दुःख समजून घेणारी तिची मैत्रीण अमृताला पत्र लिहायची.तिने चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,पण मृत्यु आला नाही.तेव्हा सारा म्हणते, "जेव्हा वाचवणारा देव असतो,तेव्हा विषाचे देखील अमृत होते."
तरूण असलेल्या साराला
आई म्हणायची पुन्हा लग्न कर , लग्न हाच तुझ्या दुखण्यावर इलाज आहे, असे डाॅक्टर सांगत आहेत म्हणून तू लग्न कर असे  अम्मा साराला म्हणते  "माझं ऐक बांगड्याच्या गोंगाटात सामावून जा,तू तरुण आहेस. मोहल्ल्यातील लोक नाही नाही ते बोलतात-"
सारा अम्माच्या इच्छेखातर पुन्हा कमी शिकलेल्या,कुरूप   मुलासोबत लग्न करायला तयार होते.तेव्हा सारा पूर्वानुभवानुसार म्हणते, "आम्मी पण माहितीय का,बांगड्या कधीच गोंगाट केल्याशिवाय राहत नाहीत"
तेव्हा अम्मी म्हणते  हारशील म्हणून भीती वाटते काय? तेव्हा सारा जे उत्तर देते त्यावरून आपल्याला सारा किती संवेदनशील आहे हे  समजून येते. ती म्हणते "नाही अम्मी! जर तुझ्या जिंकण्यात माझी हार असेल तर मी आयुष्यभर हरणे पसंत करीन" दुसऱ्याच्या आनंदासाठी अपार संकटं,यातना सहन करणारी सारा आयुष्यभर पराभव पसंत करते.आणि हे लग्नही अवघे पंचवीस दिवस टिकते.त्यानंतर सारा पुन्हा एकटी राहते. सारा तिच्या एका कवितेत म्हणते.
"कुणाची काही वस्तू हरवली,तर मी शोधू लागणाऱ्या मध्ये सहभागी आहे"
  अशी हळव्या मनाची सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारी  माणसातल्या हरवलेल्या माणुसकीला शोधू लागणारी सारा आपल्याला समजून घ्यायची असेल तर तडेगावकर अनुवादित "एक होती सारा" मुळातून वाचायला लागेल.तरच सारा काय होती,कशी होते आपल्याला समजू शकेल.अवघ्या तीस वर्षाच्या आयुष्यात संघर्ष, अपार दु:ख याशिवाय तिच्या वाट्याला काहीच आले नाही.तरीही त्या संघर्षातही ती कशा पद्धतीने जीवनाकडे सकारात्मकपणे पहाते,किती अडचणींचा सामना करत लेखन करते.हे मुळातून समजून   घ्यायला "एक होती सारा " हे वाचावेच लागेल. 
वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवल्यानंतर सारा दवाखान्यात राहून तिथल्या बायांच्या व्यथा वेदना जाणून घेते.त्या आपल्या लेखनातून जगासमोर मांडते, तेव्हा माणसाचं मन अस्वस्थ  झाल्याशिवाय राहात नाही स्वतःच्या स्वार्थासाठी शहाण्या बायांना वेडं ठरवणारे दवाखान्याच्या बाहेर राहणारे कसे खरे वेडे आहेत, हे आपल्याला समजायला लागतं.
   कुटुंबाने,जगाने वेडं  ठरवलेल्या साराला ओळखणारा,निस्वार्थ प्रेम काय असतं ते ज्याच्याकडून शिकायला मिळतं असा सईद अहमद आपल्याला 'एक होती सारा' यामध्ये साराचा मित्र म्हणून भेटतो.जो की त्याच्या मित्राला भेटायला दवाखान्यात जातो आणि तिथे लिहित बसलेली सारा त्याला दिसते.
सारा आणि सईदचे दवाखान्यात थोडे बोलणे होते,परंतु माणसांपासून  दूर राहू इच्छिणारी सारा.सारा या नावाने बदनाम झालेली सारा.त्याला ओळख सांगताना रुबी हे तिचं खोटं नाव सांगते,पण सईद अहमद मात्र आपलं खरं नाव,खरा टेलीफोन नंबर तिला देतो.रूबी अर्थात साराने सईदला वचन दिले होते,की मी फोन करीन,पण तिचे वचन तिच्या रुबी या नावासारखेच खोटे होते तिला कोणावरही प्रेम करायचे नव्हते.तिला फक्त कविता लिहायची होती तिच्या स्वतःच्या दुधाच्या शपथेसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत,परंतु सईद अहमद सारासाठी सतत दोन वर्ष तिच्या फोनची वाट पहात असतो. जेव्हा सईद अहमद काही कामानिमित्ताने बाहेर जायचे,तेव्हा विश्वासू नोकराला फोन जवळ बसून ठेवायचा.सतत दोन वर्ष ती वर्तमानपत्रात काम करते म्हणून सर्व वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून चकरा मारत राहिले.पुन्हा पुन्हा दवाखान्याच्या रस्त्यावरून येत-जात राहिले आणि शेवटी सईद अहमद यांना सारा त्याच  हॉस्पिटलमध्ये त्याच जागेवर भेटते.जीवनातील अतीव 
 दुःखद घटना नंतर दोघांची भेट होते.तेव्हा सारा सईदला म्हणते. "माझे डोळे विझून गेले तरी,मी तुझी वाट पाहत असेन! मी झोपी गेले तरी माझं मन नेहमी तुझ्यासाठी जागं राहीन.हे जागं रहाणं मी तुझ्याकडूनच शिकले आहे आणि तूही मोठ्या कर्तव्यभावनेने मला ते शिकवलेस."
साराने एका पत्रात सईदला म्हटलय एक गोष्ट सांगू,एक होती सारा,एक होता सईद! ते दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करत होते,की "इतकं" हा शब्द कमी पडत होता.टागोरांचं एक गाणं आठवतंय
"तूच माझा समुद्र आहेस, तूच माझा ईश्वर,
मी एक होडी आहे, 
काठाला लाव असं तुला का म्हणू!
बुडून जरी गेले तरी तुझ्यातच बुडेन कारण, तूच माझा समुद्र आहेस आणि तूच माझा ईश्वर"
      अशी ही माणसाने लिहिलेले माणूसकीचे कुराण शोधणारी,माणसातली माणुसकी शोधणा-या   सारा शगुफ्ताची कहाणी वाचताना हा अनुवाद नसून आपल्याच भाषेतील आपल्याच हळव्या साराचे जीवन चरित्र ,कविता,पत्र,पत्रातले संवाद यारूपात वाचतांना आपणही साराच्या कधी प्रेमात पडतो हे कळत नाही. आपण "एक होती सारा"  नक्की वाचावं तिच्याकडून लिहिण्याची प्रेरणा घ्यावी,यासाठी हा लेखन प्रपंच.

पुस्तक- एक होती सारा
मुळ लेखिका- अमृता प्रीतम
अनुवाद-संजीवनी तडेगावकर 

प्रकाशक-सुनिताराजे पवार,संस्कृती प्रकाशन,पुणे
पृष्ठ- १७६
मूल्य-२५० ₹

  शरद ठाकर 
सेलू जि परभणी 
८२७५३३६६७५

२५ मे २०२३

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता

 

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता 



‘माणूस असण्याच्या नोंदी’ या शीर्षकावरूनच आपण या कवितासंग्रहात नेमक्या कशा स्वरूपाच्या कविता असतील याचा अंदाज बांधू शकतो. माणूस म्हणून जगत असताना आपण साध्या साध्या गोष्टीच्या नोंदी घेत नसतो. एखादी घटना, घडामोड अशी असते की, त्या घटनेची नोंद आपण घेतलेली असते. एखाद्या वेळी जाणूनबुजून एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्या गोष्टीची कोणीही नोंद घेत नाही.

कोणत्या जातीत-धर्मात जन्मणार हे आपल्या हाती नसते. समाज त्या बालकाला ते ज्या कुटुंबात जन्मले, त्या कुटुंबाचा धर्म चिकटवतो. पुढे मूल शाळेत गेलं की, शाळेत नाव दाखल करताना त्याची जात विचारली जाते. निरागस लेकरांना जेव्हा शाळेत धर्मावरून आणि जातीवरून विविध सेवा सुविधा मिळतात, तेव्हा त्या मुलाच्या मनात मी अमुक जातीचा आहे याची जाणीव होते. एखाद्याला एखादी सुविधा का दिली जाते आणि एखाद्याला का नाकारली जाते, यावरून तो कोणत्या जातीचा आहे, हे त्या मुलाला समजते. मूल थोडे मोठे झाले की, त्याला मुलगा-मुलगी हा भेद सांगितला जातो. जर एखादी व्यक्ती जात-धर्म विसरून स्वतःची प्रगती करत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून दिली जाते‌. 

हे सगळं पाहिल्यानंतर कवीला प्रश्न पडतो- 


‘‘माझ्या चक्रावून गेलेल्या डोक्यात प्रश्न उगवला- 

मी माणूस असल्याची नोंद 

कुणीच कशी केली नाही?’’

(पृ.१८) 


असा प्रश्न जेव्हा कवी मेघराज मेश्राम यांना पडतो, तेव्हा त्या प्रश्नाची कविता होते. ती कविता म्हणजे खरी माणूस असण्याची नोंद आहे. माणूस आहे म्हणून तो बोलू शकतो. या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो. म्हणून या कवितासंग्रहातील कविता म्हणजेच खऱ्‍या अर्थानं माणूस असण्याच्या नोंदी आहेत.

‘बेवारस’ या कवितेतून एखाद्या माणसाची माणूस म्हणून ओळख न पाहता लगेच त्याला कोणत्या जातीचा, धर्माचा वा वर्णाचा आहे हे कसे पाहिले जाते, हे सांगताना कवी मेघराज म्हणतात-


‘तो माणूस आहे कोणीच कसे बोलत नाही’

  (पृ.१५) 


ज्या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे, बोलण्याची आवश्यकता आहे, त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. अनावश्यक गोष्टींवर लोक बोलत सुटतात. जणू नको त्या गोष्टीवर बोलायची चढाओढ लागलेली आहे. म्हणून मेघराज मेश्राम म्हणतात-


‘काळ सरकत आहे भयंकराच्या शेवाळी वाटेवरून 

चढाओढ लागलीय दगडांची उंची वाढवण्याची 

आणि माणसांचा केला जात आहे बोन्साय’ 

(पृ.१६) 


विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर भविष्यात कदाचित माणूस चंद्रावर वसाहत करू शकेल. सूर्याला आपल्या बोटांवर नाचवू शकेल एवढे सामर्थ्य माणसात येईल. पण, आजचा जो माणूस आहे, त्याला सुखानं कसं जगता येईल यासाठी कोणी काही करणार आहे की नाही? दगडी पुतळ्याची उंची वाढवण्याच्या स्पर्धेपेक्षा जो जिवंत माणूस आहे, त्याचे जे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भाने कोणीतरी बोलले पाहिजे. पण, त्या मुद्द्याला बाजूला सारले जाते. म्हणून कवीला प्रश्न पडतो की, या माणसांचे काय? कवी मेघराज मेश्राम थेट विठ्ठलालाच ‘तू असे कमरेवर हात ठेवून कुठपर्यंत उभा राहणार आहेस’ असे विचारतात.


‘हात कमरेवर ठेवून 

तू कुठवर नुसता बघत राहशील माझ्या यातनांची गाथा 

शिलगवतोय मी माझ्या दुःखमाखल्या भाषेची वात 

गाभारा सोडून येणार आहेस की नाही ते सांग’

      (पृ.५४)


हल्ली इथे फक्त माणसंच स्वार्थीपणाने विचार करत आहेत असे नाही. तर ज्या आईच्या नात्याला आपण पवित्र समजतो, ती आईही आज आपल्या वरवरचे सौंदर्य जपण्यासाठी आपल्या चिमुकल्याला स्तनपान करत नाही. म्हणून मेघराज आपल्या आईला प्रश्न करतात-


‘हल्ली फिगर मेन्टेन करण्यासाठी 

स्तनपान टाळतात आया 

माय, तू काय मेन्टेन करत होतीस’ 

      (पृ.४३) 


बाह्य सौंदर्यापेक्षा नातं जपणारी आई म्हणूनच महत्त्वाची वाटते. या संग्रहातील अशा आईच्या आणि बाईच्या कविता मनाचा ठाव घेत, विचार करायला भाग पाडतात. बाई गं (पृ. ४२), सावित्रीची लेक (पृ. ४४), बाया (पृ. ४५), तुळसाबाई (पृ. ४७), इमलाबाई ( पृ. ४८), शूर्पणखा (पृ. ४९), आसिफा (पृ. ५३) या कवितांतून बायांच्या व्यथा-वेदना आणि प्रेम समजून घेता येते.

‘वाकळ’ ही कविता आईच्या अपार प्रेमाचं प्रतीक. तिचं वाकळ तयार करणे, गोधडीला सोयीने टाके घालणे म्हणजे आईच्या नात्याची घट्ट वीण, आपुलकी टिकवण्यासाठी मायेची गोधडी बनवणे.

अवतीभवतीचे भयाण वास्तव पाहिल्यानंतर कवीच्या मनाची तगमग होत असते. तो त्याच्या कवितेच्या माध्यमातून ती तगमग मांडण्याचे आणि समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या अडचणींची दखल घेण्याचे काम करत असतो. म्हणून कवी नेहमीच विरोधी पक्षातला असल्यासारखा असतो. म्हणून कवी-लेखकाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा संशयाचा असतो. कवीनं जरी कधी हातात शस्त्र घेतलेले नसले किंवा कुठे कोणता गुन्हा केलेला नसला, तरीही त्याच्याकडे संशयाच्याच नजरेने पाहिले जाते. म्हणून कवी मेघराज मेश्राम कवीकडे संशयाच्या नजरेने पाहणारांना प्रश्न करतात-


‘मी फक्त

कवी आहे

तुम्ही माझ्याकडे

संशयाने का पाहता’

          (पृ.२९)

‘कविता अन् मृत्यू’ आणि ‘कवींना नोटीस’ या दोन कवितांतून कवी काय आहे आणि तो काय करू शकतो, हे सांगितलेले आहे. पण, आजच्या काळात मुक्तपणे लिहिण्याचे, बोलण्याचेही बंधन आहे. पण, कवी त्याच्यावर कितीही बंधनं आली तरीही विचारांची पेरणी करतच राहतो. त्याला अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनात कुठेतरी उजेड पेरायचा असतो. म्हणूनच ‘माणूस असण्याच्या नोंदी’ या कवितासंग्रहात अनेक कवितांमधून उजेड, प्रकाश, महासूर्य हे शब्द वैचारिक उजेड आणण्याच्या दृष्टीने योजलेले दिसून येतात. फुटवे (पृ. २५), कवींना नोटीस (पृ. ३३), कवितेतील पाणी (पृ. ३८).      

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होत असणाऱ्या दिवसातही कवी सामान्यांच्या मनात उजेडाची पेरणी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला हिमतीनं जगण्याचं बळ देताना कवी म्हणतो-


‘असा कच खाऊ नकोस भाऊ 

ऊठ, काळोख नांगरून काढू 

उजेडाची पेरणी करू’ 

            (पृ. २४)

कवितासंग्रहाला राजू बाविस्कर यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि रेखाटन असून प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांची पाठराखण आहे. प्रफुल्ल शिलेदार मेघराज मेश्राम यांच्या कवितेबद्दल म्हणतात- ‘‘मेघराज मेश्राम यांची कविता कुठलाही अभिनिवेश नसलेला प्रामाणिक उद्गार आहे. झगमगत्या जगातील आपल्या कळाहीन आयुष्याबाबत बोलताना ती नकळतपणे समाजाच्या परिघाबाहेरील वर्गाचा विश्वसनीय आवाज होते. जगण्यातील भयाणपणामुळे येणारी, जीवनेच्छेच्या मुळांना नख लावणारी, पराकोटीची अस्वस्थता त्यांच्या कवितेत जागोजागी दिसून येते.


कवितासंग्रह : माणूस असण्याच्या नोंदी  

कवी : मेघराज मेश्राम

प्रकाशन : लोकवाङ्मय गृह, मुंबई 

पृष्ठ : ७२

मूल्य : १५० 

...


शरद ठाकर

सेलू, जि. परभणी

मो. ८२७५३३६६७५