एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

१९ जानेवारी २०२६

अंतर्मुख करणारी कविता: मनातल्या मनात वाचायच्या कविता

अंतर्मुख करणारी कविता: मनातल्या मनात वाचायच्या कविता 

मनातल्या मनात वाचायच्या कविता हे शीर्षक वाचून कोणत्याही वाचकाला वाटू शकते की या कविता मनातल्या मनात वाचायच्या कविता आहेत म्हणजे त्या नेमक्या कशा कविता, कोणत्या विषयावरील कविता असतील त्यात नेमके काय असेल त्यामुळे या कविता मनातल्या मनात वाचायच्या आहेत
      जीवन जगणारा प्रत्येक जण हा कवीच असतो फरक एवढाच कोणी लेखणीच्या माध्यमातून कविता लिहून व्यक्त होतो तर कोणी न लिहिता एखादी कविता जगत असतो कवी विवेक ओवर मोगले आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा मुक्त आविष्कार स्वतःशीच कवितेच्या रूपात मनातल्या मनात पडताळून पाहतात. 
   त्यांच्या ह्या मनातल्या मनात पडताळून पाहण्यालाच ती मनातल्या मनात वाचायच्या कविता म्हणतात त्याबद्दल ते म्हणतात. 
"भावनांचा हा मुक्त आविष्कार 
 पडताळत राहणं स्वतःशीच 
यालाच मी म्हणतो 
मनातल्या मनात वाचायच्या कविता"( पृ.५)
त्यांच्या म्हणण्यामुळे या कवितासंग्रहाच्या शीर्षकाबद्दल असणारा बाशकाच्या मनातील संभ्रम नाहीसा होतो. 
कवी कविता लिहितो म्हणजे तो त्याच्या भोवतालच्या चांगल्या वाईट घटना घडामोडींबद्दल त्याला काय वाटते ते आपल्या कवितेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे मांडत असतो एवढंच नाही तर त्याच्या लेखनामागे काहीतरी भूमिका असते कविता कोणीतरी प्रेरणास्त्रोत असतो तो त्याला लिहिण्यासाठी प्रेरित करत असतो.
           आपल्याला वरवर कवी शांत निवांत दिसत असतो पण साहित्यिक कधीही कुठल्याही गोष्टीवर समाधानी राहत नाहीत त्यांना समाजात कुठे काय होणे दिसते तेथे कवी पाहण्याचे त्यावर बोलण्याचे काम कधी करत असतो कवींना मी नेहमी ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने म्हणजेच सत्याच्या बाजूने तो असतो त्याबद्दल ते म्हणतात. 
 "वरवर मी दिसत असलो शांत तरी 
धुमसत असतो आत,सृजनाचा जाळ"
                                  (पृ.५७)
कवीच्या मनात नेहमी हा सृजनाचा जाळ सारखा दुमसत असतो त्याला आपल्या सभोवतीचे वातावरण ही कारणीभूत असते पण कवीला आता कोरा कागद दिसला की एखाद्या ज्वलंत विषयावर मोकळीपणा ने लिहिता येत नाही कवीला लिहिण्यापूर्वी लिहिताना आणि लिहून झाल्यावर कामालीची अस्वस्थता जाणवत राहतील व्यवस्थेच्या विरोधात लिहिली तर त्याचे काय परिणाम होतील या विचाराने कवी व्यक्त होत नाहीत त्यामुळे एखाद्या खऱ्या गोष्टीबद्दल ही काही लिहावं की नाही बोलावं की नाही ही अस्वस्थता कवीच्या मनात असते लिहून झाल्यावर ही कविता मनात हीच अस्वस्थता असते. 
खरंतर कवीने परिणामांचा विचार न करता खरं ते मांडण्यासाठी कायम अस्वस्थ राहिला पाहिजे पण असे होताना हल्ली दिसत नाही जो तो स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
कवी साहित्य खूप विविध प्रकारचे वाचन करत असतो लिहीत असतो वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगत असतो त्याला खरं खोटं न्याय अन्याय हे सगळं समजत असते पण वाचनाने तयार झालेला मन मातीच्या ढेकळावर पावसाचा थेंब पडल्यावर जशी मातीचा ढेकूण विरघळतो आणि त्याच पद्धतीने संयमी विचारी असणाऱ्या कवीच्या मनाचाही बांध फुटतो त्याबद्दल ते म्हणतात. 
"एखाद्या मातीच्या ढेकळाणं
जोरकस पावसात जावं 
वावरात संपूर्ण विरघळून तसं 
फुटत वाहवत वाहवत जातं 
माझ्यातल्या बुद्धाचं मौन" (पृ.१२१)
   माणसाला खरी श्रीमंती भौतिक वस्तू देखावा या गोष्टीत वाटते पण खरी श्रीमंती हे निसर्ग झाडाविली घरातली चांगली पुस्तकं यामध्ये आहे हे सांगताना कवी विवेक ओगर मुरली म्हणतात. 
" आता तुम्ही सांगा 
घराच्या संदर्भाने आलेली 
झाडां वेलीची नजाकत आणि 
भारी म्हणावी अशी पुस्तकं
या दोन गोष्टी जगण्याला 
चिकार आनंद देत असतील तर 
आमचे हे घर 
श्रीमंतच म्हणायचे की नाही"
                   (पृ.७०)
आजच्या माणसांना झाडे झुडप लावावे वाटत नाहीत शहरीकरणात घर बांधल्यानंतर अंगणासाठी मोकळी जागाच उपलब्ध होत नाही तर माणूस झाडझोडतो कुठे लावणार म्हणून भिंतीवर झाडाझुडपांच्या स्टाईल्स लावून आजचा माणूस समाधान मानत आहे त्याला निसर्ग पर्यावरण याचे काही देणे घेणे नाही जगण्यातली खरीसमंती खरंतर निसर्गात आहे पण आजचा माणूस वरचेवर निसर्गापासून दूर जात आहे. 
कविता काय असते कशी असते कशी आहे कोणता लेखनाचा कविता लेखनाचा आनंद हे आणि कवितेच्या संदर्भाने भांगीतली तुळस (पृ.६१,६२), याच अर्थाने (पृ.७१), वास्तव (पृ.७३), कविता लिहून झाल्यावर (पृ.७५), लेकी (पृ.८५) या कविता आहेत.कवी वाचनालाच आपला धर्म मानतात.
लिहिणाऱ्या प्रत्येक कवीला आपल्या साहित्याला पुरस्कार मिळावा ते कुठल्यातरी अभ्यासक्रमात लागावे समीक्षकांनी त्यावर लिहावे पुलावे चर्चा करावी असे वाटत असते त्यासाठी कोण काय काय करतात ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो कवी विवेक ओगर मोघले मात्र ह्या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून कविता लेखन करून बाजूला होतात खरंतर प्रत्येक कवीने आपली कविता लिहून मोकळे व्हायला पाहिजे आणि आपल्या साहित्याकडे तटस्थपणे राहून त्या साहित्याच काय होत आहे ते पाहिले पाहिजे याबद्दल ते म्हणतात 
" त्यापुढे काय त्यापुढे काय होतं,तर 
मी आणि माझी कविता
 छान स्थितप्रज्ञ होऊन 
बसतो सेम 
ध्यानस्थ बुद्धासारखा" (पृ.७६)

अशाप्रकारे कवी विवेक उगलमुगले यांची कविता स्वतःच्या कवितेकडे तटस्थपणे पाहायला शिकवणारी कविता आहे.
 या कविता मनातल्या मनात वाचायच्या असल्या तरी त्या वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.

 
 कवितासंग्रह - मनातल्या मनात वाचायच्या कविता 
कवी - विवेक उगलमुगले 

प्रकाशक - सुभाषित प्रकाशन, नाशिक 

मूल्य -१५० 

पृष्ठ -१५२

             शरद ठाकर 
         सेलू जि परभणी 

०६ जानेवारी २०२६

माणूसपणाच्या संवेदनांची कविता : शाबूत राहो हे लव्हाळे

 माणूसपणाच्या संवेदनांची कविता : शाबूत राहो हे लव्हाळे 


"शाबूत राहो हे लव्हाळे" या शीर्षकाचा विचार केला,तर शाबूत राहो हे लव्हाळे असे कवयित्रीने का ? म्हटले असेल असे वाटते.लव्हाळं ही एक तृणवर्गीय बारमाही वाढणारी वनस्पती असून,ती पाणथळ आणि ओलसर जागेवर वाढते. लव्हाळ्यालाच 'नागर मोथा' असेही म्हटले जाते. लाव्हाळ्याची मूळं घट्ट रोवलेली असल्याने नदीला कितीही पूर आला तरीही लव्हाळे वाहून जात नाही.तृणवर्गीय असल्याने पाण्याच्या प्रखर प्रवाहातही लव्हाळे सहज झुकते आणि त्यावरून पाण्याचा कितीही मोठा पूर गेला तरी लव्हाळे पूर गेल्यानंतर पुन्हा जोमाने उभे राहते.तसे पाहिले तर लव्हाळे हे एक तण देखील आहे.उसाच्या पिकात ते जास्त होते.इथे तण या अर्थाने निश्चितच त्याचा वापर केलेला नाही.संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलेले आहे "महापुरे येती, तेथे लव्हाळे राहतील"

वरवर विचार केला तर महापूर आला,की नदीच्या भोवताली असलेले मोठमोठे झाडं त्यांच्यातील गर्वाने ताठ उभे राहतात आणि पुराच्या पाण्यात तुटतात,वाहून जातात तर लव्हाळे त्याच्या नम्रता, लवचिकपणा या गुणामुळे टिकून राहते. 

न झुकणारे मोठे झाड म्हणजे अशी माणस जी अहंकार,गर्व,कठोरपणाने वागतात,जी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत; तर लव्हाळे म्हणजे ज्यांच्याकडे नम्रता आहे,लवचिकपणा आहे ,साधेपणा आहे आणि ज्यांना प्राप्त परिस्थितीनुसार लवता,झुकता येते. त्यामुळे अशी माणसं आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही आणि कितीही मोठ्या संकटात,अडचणीत सहजपणे मात करून पुढे जातात. 

       झुकणे हे कोणाला लाचारपणाचे लक्षण वाटेल,पण आपण कधी,कुठे,कशासाठी आणि का ? झुकत आहेत हे लक्षात घेऊन.आपला स्वाभिमान,आपली तत्त्व जिवंत ठेवून वेळ प्रसंग पाहून कधी कधी झुकणेही महत्त्वाचे असते. कारण न झुकता मोडून पडण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेत दोन हात करणे महत्त्वाचे असते. 

        आजच्या काळाचा जर आपण विचार केला, तर सर्वसामान्य माणसाचा या काळात निभाव लागणे शक्य वाटत नाही.प्रत्येक माणसाच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचे दडपड या अस्थिर,संभ्रम निर्माण करणाऱ्या काळात आहे. 

       सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,स्त्रियांचे प्रश्न,पर्यावरण आणि ढासळत चाललेली मूल्य, हा जो सर्वार्थाने अस्वस्थतेचा महापूर आहे.या महापुरात हे लव्हाळ शाबूत राहिले पाहिजे असे कवयित्रीला वाटते.शीर्षकातील हे म्हणजे कोणते लव्हाळे याचे उत्तर अंजली कुलकर्णी यांच्या मनोगतातून आपल्याला मिळते.त्या म्हणतात

"सर्वत्र प्रलयासारखा महापूर उसळलाय आणि रोरावणाऱ्या पाण्यातून महावृक्षा सकट जगण्याचं सारं काही वाहून जाताना.स्वतःला बचावून ठेवण्याची वेळ इथल्या दुर्बल लव्हाळ्यावर आली आहे.या अक्राळ विक्राळ महापुरातील लव्हाळं शाबूत राहिले पाहिजे याच एका ध्यासाची ही कविता आहे."

        लव्हाळं तर महापुरातही जगणारे टिकणारे आहे,मग ते दुर्बळ कसं असू शकेल.निश्चितच ते दुर्बळ नाही.हे लव्हाळे म्हणजे इथल्या व्यवस्थेमुळे पिचलेला,कोंडीत अडकलेला,दुर्बल झालेला माणूस आहे. हा दुर्बल झालेला माणूस जिवंत राहिला पाहिजे.त्याच्या मनात जी लव्हाळ्याच्या अंगात असलेली नम्रतेचे,रुजूतेची, माणुसकीची भावना आहे.ती भावना कठीण काळात राहून-राहून कठोर होऊन न जाता माणसाच्या मनातली माणुसकीची भावना जिवंत राहावी.या ध्यासाने कवयित्री कविता लिहिते असे वाटते.

       सध्या सगळीकडे विनाशाची साथ पसरलेली आहे की काय ? असे कवयित्रीला वाटते,कारण जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अविचारी विषाणूंचा प्रसार झाल्यामुळे द्वेष, हिंसा,धर्मांधता, वादविवाद,जाती जातीत,धर्माधर्मात तेढ निर्माण झालेली आहे. 

      'घराणेशाही' या कवितेतून त्या मेन होल मधला मैला काढण्याचे काम करणाऱ्या कामगारांची घराणेशाही उलथून टाका असे उपरोधितपणे म्हणतात ,कारण देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष होऊन गेली.तरीही विशिष्ट समाजाला मैला साफ करण्याचे,डोक्यावरून वाहून नेण्याचे काम करावे लागणे आणखी थांबलेले नाही.

      गाव खेड्यात माणसाच्या हाताला काम नाही आणि शेती करावी तर शेतमालाला भाव नाही, म्हणून खेड्यातून माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरात येतात. शहरात येऊन कुठेतरी कसेतरी राहतात.ते धड गावाचेही नाही आणि शहराचेही नाही अशा पद्धतीने कायमचे विस्थापित होतात.काहीतरी स्वप्न उराशी बांधून गाव खेड्यातून शहरी संस्कृतीच्या झगमटात,शहरात आल्यानंतर त्यांची स्वप्न काही पूर्ण होत नाहीत,त्यांच्या त्या मृत स्वप्नांच्या लगद्याचा चेहरा बनवला, तर तो कसा असेल, कसा दिसेल हे सांगताना त्या म्हणतात.

 " 'आपल्या लोकशाही प्रजासत्ताकात 

सर्वांना समान न्याय सर्वांना समान संधी' 

देणाऱ्या संविधानासारखा 

मानवी दिसेल ?

की 'सबका साथ, सबका विकास'च्या 

पताका मिरवणाऱ्या कुण्या ओसाड 

नगरासारखा दिसेल?" (पृ.४२)

     माणूस वास्तव काय आहे.याचा विचार न करता वास्तवात जगायचे सोडून. सोशल मीडियाच्या दुनियेत आपले सर्वस्व विसरून जीवन जगत आहे. त्या सोशल मीडियाच्या अवास्तव प्रदर्शन करण्याच्या नादात वास्तव जगणे,त्या जगण्याचा,खाण्याचा,पाहण्याचा आनंद न घेता.जिथे तिथे फोटो घेणे,सेल्फी काढून विविध समाज माध्यमावर पाठवणे आणि त्या माध्यमाला चिकटून राहून आनंद घ्यायचा सोडून किती लोकांनी लाईक आणि कमेंट केले.हेच पाहत बसण्यात धन्यता म्हणणारे माणसं आज आपल्याला आपल्या अवतीभवती दिसून येतात. हे वास्तव त्यांनी विंडोतलं आकाश (पृ.३३,३४),सेल्फी (पृ.३५),सोशल मीडिया (३६),

या कवितांमधून मांडले आहे.सोशल मीडियाच्या जमान्यात माणूस सोशल व्हायच्या ऐवजी एकलकोंडा,संकुचित,आत्ममग्न,आत्मप्रौढी मिरवणारा झाला आहे.माणसातली माणुसकी वरच्यावर हरवत चाललेले आहे,त्यामुळे त्या 'हे काय आहे ?' या कवितेत म्हणतात.

"हे जगणे आहे की 

किड्या मुंग्यांचा बेहाल आक्रोश ?

कुठे हरवलाय माणसांचा 

 होश? जोश?" (पृ.४३)

        माणूस म्हणून आपण काय केले पाहिजे आणि काय करत आहोत याचे भान माणसाला राहिले नाही.

     विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती झाली आहे.जग मुठीत आले आहे.खिडकीतून हाक मारता मारता सातासमुद्रा पलीकडे ऑनलाईन विंडो उघडून हाक मारता येत आहे.घरात बसून खरेदी करता येत आहे.लिफ्टने कितव्याही मजल्यावर सहज जाता-येता येत आहे.एवढेच नाही तर माणसाचे आयुर्मानही वाढले आहे;पण आपलीच मुलं आपल्या जवळ न राहता कुठेतरी दूरदेशी राहत असतील,माणसात माणूस राहत नसेल,तर अनेक वर्ष जगण्याचे माणसाचे प्रयोजन काय आहे ? हे विचारताना त्या म्हणतात. 

"कळत नाहीये ते एवढंच 

रिप्लेस केलेले गुडघे,हार्ट,लिव्हर 

नि किडन्या सांभाळत 

या झगमग एकाकी उजेडात 

दीडशे वर्ष जगण्याचं 

प्रयोजन तरी काय आहे ?"

                (पृ.३९)

      हा काळच कसा वेगळा आला आहे असे कवयित्रीला वाटते.प्रत्येकाच्या हातात पैसा आलेला आहे.शहरा शहरातून पैशाचा महापूर वाहतोय,पण संस्काराचा झरा मात्र अटत चाललेला आहे.राजकारण,समाजकारण आता म्हणायलाच राहिले आहे.कवितेच्या माध्यमातून कोणावर काही परिणाम होईल हे शक्य वाटत नाही.प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ साधायचा आहे, त्यामुळे कविता आता फक्त कवी पुरतीच मर्यातीत झालेली आहे असे कवयित्री अंजली कुलकर्णी यांना वाटते;म्हणून त्या म्हणतात 

"माणसापर्यंत पोहोचतच नाहीये कविता 

अख्खा समाज झाला आहे बहिरा नि मुका"

                                   (पृ.२०)

      स्त्री आणि नदी यांच्या संदर्भात पराभवांची सुंदर फुले (पृ.७०),समजल्यावर (पृ.७१), सातत्याच्या नदीतून (पृ.७२),जिम्मेदार (पृ.७३),वाहते ती नदी (पृ.७४), जंजाळ जाळात (पृ.७५) या कवितांमधून त्यांनी स्त्रीचा संघर्षशील इतिहास स्त्री कशी विसरत चालली आहे.हे सांगताना स्त्रीने टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवावी तसेच स्वतःला अवहेलना झेलत,नकार पचवत कसे कणखर,खंबीर बनवले हे सांगितले आहे व तिला जाणीवपूर्वक जन्मापासून स्त्री म्हणून कसे घडवल्या जाते व स्त्री ही एक व्यक्ती आहे,माणूस आहे.हे समाज समजून घेत नाही.तेव्हा इथल्या स्त्रीने जी सामाजिक विषमतेची चौकट आहे.ती कुठेतरी मोडली पाहिजे असे वाटते.स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान पद्धतीने पुढे गेले पाहिजे, पण तसे होत नाही.तेव्हा काय होते हे त्या पुढील शब्द सांगतात 

"एकट्यानेच उंच वाढणारा वृक्ष 

नेहमीच वाटला करंटा 

भोवतालाची ओळख होताच 

हरळीसारखी पसरत गेले" (पृ.७१)

    नदी जशी माणसांचे सगळे अपराध पोटात घालत माणसाच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत पुढे चालत राहते.दगडधोंडे, हार,फुल, निर्माल्य,प्लास्टिक,कचरा प्रेतांचे अवशेष घेऊन नदी पुढे जाते. तसेच स्त्रीही अपमान,अवहेलना, विटंबना या गोष्टींना सहन करत पुढे जाते.खरं तर नदीने स्त्रीचे आणि स्त्रीने नदीचे परंपरेने चालत आलेले प्रतीक आता नाकारले पाहिजे,नाहीतर काळ सोकावेल आणि असे अन्याय सहन करत राहावे लागतील,म्हणून त्या म्हणतात. 

"माणसांचे कचरा भरले अपराध 

 दोघींनीही घालू नये पोटात 

नि पाहू नये उघड्या डोळ्यांनी 

स्वतःची मुस्कटदाबी मुकाट 

त्यापेक्षा द्यावी त्याला वेळेवर 

शहाणीवेने एक जोरदार चपराक"

                            (पृ.७३)

पुरुष,स्त्री व तृतीयपंथी या तो,ती,ते या लिंग भेदा पलीकडे जाऊन सर्वांनी माणूस म्हणून जीवन जगणे आवश्यक आहे,पण स्त्री वा पुरूषाचा तृतीय पंथीथ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही बदलत नाही.तो बदलावा अशी कवयित्रीची अपेक्षा आहे.माणसाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही काही बदलत नाही.स्त्री-पुरुष भेद विसरून एक मित्र म्हणून स्त्रीला पुरूष हवा असतो .जो स्त्रीच्या रूपावर वा स्त्रीपणावर नजर न ठेवता तिला केवळ एक माणूस म्हणून समजून घेणारा हा असतो,पण असे होत नाही त्याबद्दल त्या म्हणतात 

"पण हे पुरुष.. पुरुषच राहतात अखेर पर्यंत 

जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत 

मनाचं कधीच नाही कळत त्यांना 

शेवटी शरीरावरच त्यांची सारी भिस्त" 

                                (पृ.८०)


स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी वस्तू म्हणून पाहिलं जातं सोशिकता,धर्मभोळी म्हणून भावनिक गुंत्यात गुंतवून उपवास,देवदेव करणाऱ्या स्त्रीला कळत नाही.ती किती नको त्या बंधनात स्वतःहून अडकून गेली आहे. बाया काही सुधारायचे नाव घेत नाहीत म्हणून त्या म्हणतात. "या बायकांचे काय करू" खरंतर माणसाला भीती वाटते.ती हुशार होईल या गोष्टीचे, म्हणून तिला शिकू दिल्या जात नाही, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ दिला जात नाहीत.तिच्या कर्तृत्वाला कमी ठरवण्यासाठी तिला देवी बनवल्या जाते, तिचा छळ केल्या जातो,तिला वस्तू म्हणून वापरलं जातं कारण 

"तिची धार, तिची शक्ती, तिची क्षमता 

त्याला ठाऊक असते 

म्हणून त्याला सारखी भीती वाटते 

सारखी भीती वाटते"(पृ.९२)

      'जन्म दे' (पृ.९३) या कवितेत कवयित्री माणसाच्या न्याय बुद्धीला जन्म दे,स्त्री पुरुष समानतेलाही जन्म दे म्हणतात,कारण जोपर्यंत माणसाचे मन निर्मळ होणार नाही,तोपर्यंत ही सृष्टी नितळ,निर्मळ होणार नाही. 

   कथुआ,कलम ३७०,शरबत गुल या कवितांमधून माणसाची हिंसक वृत्ती त्यांनी अधोरेखित केली आहे. शेवटी कितीही संकटे असली तरी माणूस आपले जीवन त्या संकटाचा सामना करत करत पुढे जगण्याचा प्रयत्न करतो आणि खरे तर रोजच्या आपापल्या कामातच खरा जगण्याचा आनंद मानतो.माणसाची ही जी जगण्याची इच्छा आहे.तिला अंजली कुलकर्णी यांनी 'सिसिफस' या कवितेतून अधोरेखित केलेले आहे.सिसिफस हे ग्रीक पौराणिक कथेतील मिथक आहे.ज्यात करिंथचा राजा सिसिफस याला देवांनी मृत्यूची फसवणूक केल्याबद्दल शिक्षा म्हणून एका डोंगरावर दगड ढकलण्याची शिक्षा दिलेली असते.दगड शिखरावर पोहोचताच पुन्हा तो खाली घसरतो आणि हेच काम त्याला पुन्हा पुन्हा करावे लागते म्हणजे कितीही काळ हे काम केले तरी ते पूर्ण होणार नाही.हे मिथक जीवनातील निष्फळ आणि निरर्थक कामाचे प्रतिक आहे.अल्बर्ट कामू या विचारवंताने अशा कामातूनच जीवनाचा अर्थ शोधण्याचे सांगितले आहे.संघर्षातच माणूस आनंद शोधत असतो. 

      'शाबूत राहो हे लव्हाळे' मध्ये संवेदना ही प्रतिमा खूप वेळा वापरलेली आहे.स्युडो संवेदना (पृ.२०), संवेदना मुक्त माणूस (पृ.३०),संवेदनाचा अस्वस्थ झरा (पृ.५९),संवेदनेचे साम्राज्य (पृ.६१) ,संवेदनांचे सुंदर मोती (पृ.८८), संवेदनाचा सोबती (पृ.१०४),संवेदनाचा पहारेकरी(१०९),संवेदना कोरल्या (पृ.११३),गतकाळातील संवेदना (पृ.११७),चेहऱ्यावरची संवेदना(पृ.११८), संवेदनांचा प्रवास (पृ.१२१)

एकंदरीतच माणूसपणाच्या संवेदनांनी ही कविता समृद्ध झालेली आहे. 

    त्यांच्या कविता लेखना मागची भूमिका त्यांनी मी लिहिते तेव्हा (पृ.१११),संवेदना(पृ.११३), कवितांनो (पृ.११४), समजेचा क्षण (पृ.११५), जुन्या कविता चाळताना (पृ.११६,११७),न लिहीता आलेली कविता (पृ.११८),कोवळे कवित्व (पृ.११९), या कविताच (पृ.१२१),कवी (१२३), अशी एखादी कविता (पृ.१२४),ढकलले जातोय (पृ.१२५),कवी लिहीत होता कविता (पृ.१२६) या कवितांमधून मांडलेली आहे.

कविता लिहीत असताना कवी मनाची होणारी अवस्था काय होते हे सांगताना त्या म्हणतात. 

"मी लिहिते तेव्हा 

उसळतात लाटांवर लाटा 

समुद्राला भरती येते 

पूर्ण चंद्र बनून कविता 

आसमंत उजळून घेते"

          (पृ.१११)

कवीला कविता लिहिताना बऱ्याचदा आपलीच कविता आवडत नाही.ती लिहून व्यवस्थित पूर्ण झाली असे वाटत नाही.जेव्हा ती आपल्या मनासारखी लिहून होते.तेव्हाच कुठे कवीला समाधान होत असते आणि त्यामुळे अनेक कवितांच्या ओळी लिहून फेकून द्याव्या लागतात. त्यांना पुस्तकात न घेता आल्याचेही दुःख कवयित्रीला वाटते.कवीची कविताच खरे तर कविचे आत्मचरित्र असते.पुन्हा वेगळे आत्मचरित्र लिहिण्याची गरजच कवीला पडत नाही या कविता त्यांचा कणा आहेत त्या म्हणतात. 

"मी सोडून दिला आहे स्वतःला 

संवेदनांच्या वाहत्या पाण्यात 

आता तरेन किंवा बुडेन 

हे कविताच ठरवणार आहे" (पृ.११५)

      कवीने कविता लिहून मोकळे व्हायचे असते. ती कशी आहे ? ,काय आहे ? याचा विचार वाचणारे करतील.त्या पद्धतीने कविता लिहून त्या मोकळ्या झाल्या आहेत;पण निश्चितच त्यांच्या कवितेत माणुसकी जिव्हाळा सर्व प्राणीमात्राबद्दलची आपलेपणा,आपुलकीची आणि संवेदनशीलतेची भावना असल्याने कितीही मोठ्या प्रवाहात हे लव्हाळ निश्चितच अखंड तगून राहणार आहे हा विश्वास आहे.अंजली कुलकर्णी 'लव्हाळे' या कवितेत म्हणतात ते कोणते पाणी आहे.ज्याने त्यांना कवितेच्या सरोवरात वरचेवर धरले आहे,तर हे कवितेच्या प्रेमाचे,जिव्हाळयाचे पाणी आहे आणि त्या पाण्यात त्यांनी कवितेच्या अंतस्फूर्तीची बीज भर पावसात खोल खोल रोवलेली आहेत,त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे.हे लव्हाळे शाबूत राहणार आहे,म्हणून त्या म्हणतात. 

"कदाचित त्या पुरानेच 

मला आपले म्हटले 

महावृक्ष वाहून जाताना 

हे हरवलेले लव्हाळे शाबूत ठेवले"

(पृ.१२०)



कवितासंग्रह - शाबूत राहो हे लव्हाळे 

कवयित्री - अंजली कुलकर्णी 

प्रकाशन - सृजन संवाद प्रकाशन 

प्रकाशक - सृजनसंवाद

 प्रकाशन,ठाणे

पृष्ठ -१२८

मूल्य - २५०


     डॉ.शरद ठाकर 

    सेलू जि परभणी 

    ८२७५३३६६७५