एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२८ मे २०२३

"माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता"

 "माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता"


        "एक होती सारा" अर्थात सारा शगुफ्ता एक पाकिस्तानी कवयित्री अमृता प्रीतम यांच्यामुळे सर्वांना माहीत झाली.बाई म्हणून,कवयित्री म्हणून तिचा जो पाकिस्तान मध्ये छळ होत होता.त्याबद्दल सारा शगुफ्ता अमृता प्रीतम यांना पत्र पाठवते. त्या पत्रां मधून त्यातल्या मजकूरांमधून, कवितांमधून अमृता प्रीतम त्या पत्रांच्या कवितांच्या तुकड्या-तुकड्या मधून साराच्या कवितेची ताकद,तिचे दुःख समजून घेते.तिला जगण्याची उमेद देतात आणि त्या दोघी एकमेकींच्या सख्या होऊन जातात.दोघींना एकमेकीं बद्दल पत्राच्या माध्यमातून संवाद साधल्या शिवाय चैन पडत नाही.
'आशयघन'अंकाच्या स्त्री विश्व विशेषांकाचे संपादन  करताना संपादक तथा कवयित्री संजीवनी तडेगावकर यांना
"मोर आपले पाय बघून रडतो,
मी माझी माणसं बघून रडते"

     ह्या सारा शगुफ्ताच्या ओळी वाचायला मिळतात.तिच्या बद्दल अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेने संजीवनी तडेगावकर सारा बद्दल अधिक माहिती मिळवतात आणि त्यातूनच मराठी वाचकांसाठी 'एक थी सारा' हे   सारा शगुफ्ताचे अमृता प्रीतम यांनी लिहिलेले जीवन चरित्र आपल्याला मराठीत अनुवादित रूपात 'एक होती सारा' वाचायला मिळत आहे.
      मोर आपले पाय बघून रडतो असे  लिहिणारी सारा हे ठिक आहे,पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्या बद्दल जाणून घेताना.साराचे दुःख काय आहे हे खरोखर तिचे 'एक होती सारा'मुळातून वाचल्याशिवाय समजणार नाही. एक स्त्री म्हणून स्त्रीवर माणूस किती बंधने टाकत असतो, तिला एक वस्तू म्हणून तिचा वापर करतो. तिच्या मनाचा,मताचा कसलाही विचार न करता.तिला फक्त स्वतःसाठी राबवून घेणे एवढेच माणसाला माहीत असते. गपगुमान राबवून घेणारा नवरा,घराच्या बाहेर पडायचे बंधन, लिहायचे,वाचायचे बंधन, बाप मेल्यावर बापाच्या अंत्ययात्रेला जायचं बंधन,नव-याच्या वाईट वागण्यामुळे सारा घटस्फोट घेते. न्यायालयातून पोटगी मिळवते आणि मुलांना स्वत:कडे ठेवण्यासाठी न्यायालयात उभे राहून नव-याचे सर्व खोटे आरोप काळजावर दगड ठेवून,मान्य करत तिला म्हणावं लागतं "जज साहेब,हा माणूस एकदम खरं बोलतो आहे,मी स्वैराचारी आणि चारित्र्यहीन आहे.त्यामुळे मी हे कबूल करते की,ही मुलं या माणसाची नाहीत त्या मुलांचा बाप दुसराच कोणी तरी आहे. न्यायालयाने मला परवानगी द्यावी, की मी त्या मुलांना त्यांच्या खऱ्या वडीलाकडे पोहोचू शकेल."मुलांना स्वतःजवळ ठेवण्यासाठी असं मार्मिक बोलणा-या साराच्या मनाला झालेल्या वेदना कोण समजून घेणार आहेत.             
     पालकत्वाची जबाबदारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार साराकडे असताना मुलांचा बाप मुलांना भेटायला आल्यावर. नवऱ्याचा अनादर न करता.मुलांना भेटायला परवानगी देते,पाहुणचार करते. नवरा कुराणवर हात  ठेवून काही दिवसांसाठी मुलं मला दे! काही दिवसांनी मी ते परत आणून सोडील म्हणतो किंवा कायदेशीर कागदपत्र करायचे असतील तर ते पण करून घे असं नवरा म्हणतो. तेव्हा सारा म्हणते "जर तू कुराण हातात घेऊन एवढं सांगतोस तर कायदेशीर कागदपत्रांची काही गरज नाही,माझा कुराणवर विश्वास आहे."
 पण साराचा नवरा पुन्हा साराला कधीच मुलांना भेटू देत नाही.उलट सारा त्याच्या घरी मुलांना भेटायला गेली तर तिच्यावर नोकराकरवी गोळीबार करून तिला त्रास देतो.
सारा पुढे कुटुंबनियोजन विभागात नोकरीला असणाऱ्या मित्रासोबत लग्न करते. सातव्या महिन्यातच तिला बाळ होतं आणि ते काही क्षणातच जगाचा निरोप घेते.त्याही परिस्थितीत नवऱ्याची साथ नसते.दवाखान्यात ती एकटीच असते. तो त्याच्या स्वतःच्या व मित्राच्याच नादात असतो. वरवर नमाज पठण करत जा म्हणणारे,वरवर चांगले वागणारे आणि मनात कोतेपणा असणारे माणसं साराला खूप खुजी वाटायला लागतात.सारा म्हणते "मला भुकेपेक्षा जास्त माणुसकीचा शोध आहे." तिला सक्तीचे सहजीवन मान्य नव्हते.सारा पंजाबी  आणि उर्दू भाषेतून कविता लिहायची पाकिस्तान मध्ये तिचा कवितासंग्रह प्रकाशित होत नव्हता.
खोटेपणा,ढोंग,नाटक, फसवणूक या सगळ्यांशी
सारा चांगलीच परिचित झाली होती, म्हणून तिला कोणाशीच नातं जोडाव वाटायचं नाही.आयुष्यात जे पुरुष आले त्यांचे रूप तिने चांगलेच अनुभवले होते.तिला घरच्यांनी आणि समाजाने वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवलं होतं. इलेक्ट्रिक शॉक दिले. तरीही ती कविता लिहित रहायची.तिचं सुख-दुःख समजून घेणारी तिची मैत्रीण अमृताला पत्र लिहायची.तिने चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,पण मृत्यु आला नाही.तेव्हा सारा म्हणते, "जेव्हा वाचवणारा देव असतो,तेव्हा विषाचे देखील अमृत होते."
तरूण असलेल्या साराला
आई म्हणायची पुन्हा लग्न कर , लग्न हाच तुझ्या दुखण्यावर इलाज आहे, असे डाॅक्टर सांगत आहेत म्हणून तू लग्न कर असे  अम्मा साराला म्हणते  "माझं ऐक बांगड्याच्या गोंगाटात सामावून जा,तू तरुण आहेस. मोहल्ल्यातील लोक नाही नाही ते बोलतात-"
सारा अम्माच्या इच्छेखातर पुन्हा कमी शिकलेल्या,कुरूप   मुलासोबत लग्न करायला तयार होते.तेव्हा सारा पूर्वानुभवानुसार म्हणते, "आम्मी पण माहितीय का,बांगड्या कधीच गोंगाट केल्याशिवाय राहत नाहीत"
तेव्हा अम्मी म्हणते  हारशील म्हणून भीती वाटते काय? तेव्हा सारा जे उत्तर देते त्यावरून आपल्याला सारा किती संवेदनशील आहे हे  समजून येते. ती म्हणते "नाही अम्मी! जर तुझ्या जिंकण्यात माझी हार असेल तर मी आयुष्यभर हरणे पसंत करीन" दुसऱ्याच्या आनंदासाठी अपार संकटं,यातना सहन करणारी सारा आयुष्यभर पराभव पसंत करते.आणि हे लग्नही अवघे पंचवीस दिवस टिकते.त्यानंतर सारा पुन्हा एकटी राहते. सारा तिच्या एका कवितेत म्हणते.
"कुणाची काही वस्तू हरवली,तर मी शोधू लागणाऱ्या मध्ये सहभागी आहे"
  अशी हळव्या मनाची सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारी  माणसातल्या हरवलेल्या माणुसकीला शोधू लागणारी सारा आपल्याला समजून घ्यायची असेल तर तडेगावकर अनुवादित "एक होती सारा" मुळातून वाचायला लागेल.तरच सारा काय होती,कशी होते आपल्याला समजू शकेल.अवघ्या तीस वर्षाच्या आयुष्यात संघर्ष, अपार दु:ख याशिवाय तिच्या वाट्याला काहीच आले नाही.तरीही त्या संघर्षातही ती कशा पद्धतीने जीवनाकडे सकारात्मकपणे पहाते,किती अडचणींचा सामना करत लेखन करते.हे मुळातून समजून   घ्यायला "एक होती सारा " हे वाचावेच लागेल. 
वेडं ठरवून वेड्यांच्या दवाखान्यात ठेवल्यानंतर सारा दवाखान्यात राहून तिथल्या बायांच्या व्यथा वेदना जाणून घेते.त्या आपल्या लेखनातून जगासमोर मांडते, तेव्हा माणसाचं मन अस्वस्थ  झाल्याशिवाय राहात नाही स्वतःच्या स्वार्थासाठी शहाण्या बायांना वेडं ठरवणारे दवाखान्याच्या बाहेर राहणारे कसे खरे वेडे आहेत, हे आपल्याला समजायला लागतं.
   कुटुंबाने,जगाने वेडं  ठरवलेल्या साराला ओळखणारा,निस्वार्थ प्रेम काय असतं ते ज्याच्याकडून शिकायला मिळतं असा सईद अहमद आपल्याला 'एक होती सारा' यामध्ये साराचा मित्र म्हणून भेटतो.जो की त्याच्या मित्राला भेटायला दवाखान्यात जातो आणि तिथे लिहित बसलेली सारा त्याला दिसते.
सारा आणि सईदचे दवाखान्यात थोडे बोलणे होते,परंतु माणसांपासून  दूर राहू इच्छिणारी सारा.सारा या नावाने बदनाम झालेली सारा.त्याला ओळख सांगताना रुबी हे तिचं खोटं नाव सांगते,पण सईद अहमद मात्र आपलं खरं नाव,खरा टेलीफोन नंबर तिला देतो.रूबी अर्थात साराने सईदला वचन दिले होते,की मी फोन करीन,पण तिचे वचन तिच्या रुबी या नावासारखेच खोटे होते तिला कोणावरही प्रेम करायचे नव्हते.तिला फक्त कविता लिहायची होती तिच्या स्वतःच्या दुधाच्या शपथेसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत,परंतु सईद अहमद सारासाठी सतत दोन वर्ष तिच्या फोनची वाट पहात असतो. जेव्हा सईद अहमद काही कामानिमित्ताने बाहेर जायचे,तेव्हा विश्वासू नोकराला फोन जवळ बसून ठेवायचा.सतत दोन वर्ष ती वर्तमानपत्रात काम करते म्हणून सर्व वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून चकरा मारत राहिले.पुन्हा पुन्हा दवाखान्याच्या रस्त्यावरून येत-जात राहिले आणि शेवटी सईद अहमद यांना सारा त्याच  हॉस्पिटलमध्ये त्याच जागेवर भेटते.जीवनातील अतीव 
 दुःखद घटना नंतर दोघांची भेट होते.तेव्हा सारा सईदला म्हणते. "माझे डोळे विझून गेले तरी,मी तुझी वाट पाहत असेन! मी झोपी गेले तरी माझं मन नेहमी तुझ्यासाठी जागं राहीन.हे जागं रहाणं मी तुझ्याकडूनच शिकले आहे आणि तूही मोठ्या कर्तव्यभावनेने मला ते शिकवलेस."
साराने एका पत्रात सईदला म्हटलय एक गोष्ट सांगू,एक होती सारा,एक होता सईद! ते दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करत होते,की "इतकं" हा शब्द कमी पडत होता.टागोरांचं एक गाणं आठवतंय
"तूच माझा समुद्र आहेस, तूच माझा ईश्वर,
मी एक होडी आहे, 
काठाला लाव असं तुला का म्हणू!
बुडून जरी गेले तरी तुझ्यातच बुडेन कारण, तूच माझा समुद्र आहेस आणि तूच माझा ईश्वर"
      अशी ही माणसाने लिहिलेले माणूसकीचे कुराण शोधणारी,माणसातली माणुसकी शोधणा-या   सारा शगुफ्ताची कहाणी वाचताना हा अनुवाद नसून आपल्याच भाषेतील आपल्याच हळव्या साराचे जीवन चरित्र ,कविता,पत्र,पत्रातले संवाद यारूपात वाचतांना आपणही साराच्या कधी प्रेमात पडतो हे कळत नाही. आपण "एक होती सारा"  नक्की वाचावं तिच्याकडून लिहिण्याची प्रेरणा घ्यावी,यासाठी हा लेखन प्रपंच.

पुस्तक- एक होती सारा
मुळ लेखिका- अमृता प्रीतम
अनुवाद-संजीवनी तडेगावकर 

प्रकाशक-सुनिताराजे पवार,संस्कृती प्रकाशन,पुणे
पृष्ठ- १७६
मूल्य-२५० ₹

  शरद ठाकर 
सेलू जि परभणी 
८२७५३३६६७५

२५ मे २०२३

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता

 

माणूस असण्याच्या नोंदी : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता 



‘माणूस असण्याच्या नोंदी’ या शीर्षकावरूनच आपण या कवितासंग्रहात नेमक्या कशा स्वरूपाच्या कविता असतील याचा अंदाज बांधू शकतो. माणूस म्हणून जगत असताना आपण साध्या साध्या गोष्टीच्या नोंदी घेत नसतो. एखादी घटना, घडामोड अशी असते की, त्या घटनेची नोंद आपण घेतलेली असते. एखाद्या वेळी जाणूनबुजून एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष करायचे असेल तर त्या गोष्टीची कोणीही नोंद घेत नाही.

कोणत्या जातीत-धर्मात जन्मणार हे आपल्या हाती नसते. समाज त्या बालकाला ते ज्या कुटुंबात जन्मले, त्या कुटुंबाचा धर्म चिकटवतो. पुढे मूल शाळेत गेलं की, शाळेत नाव दाखल करताना त्याची जात विचारली जाते. निरागस लेकरांना जेव्हा शाळेत धर्मावरून आणि जातीवरून विविध सेवा सुविधा मिळतात, तेव्हा त्या मुलाच्या मनात मी अमुक जातीचा आहे याची जाणीव होते. एखाद्याला एखादी सुविधा का दिली जाते आणि एखाद्याला का नाकारली जाते, यावरून तो कोणत्या जातीचा आहे, हे त्या मुलाला समजते. मूल थोडे मोठे झाले की, त्याला मुलगा-मुलगी हा भेद सांगितला जातो. जर एखादी व्यक्ती जात-धर्म विसरून स्वतःची प्रगती करत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून दिली जाते‌. 

हे सगळं पाहिल्यानंतर कवीला प्रश्न पडतो- 


‘‘माझ्या चक्रावून गेलेल्या डोक्यात प्रश्न उगवला- 

मी माणूस असल्याची नोंद 

कुणीच कशी केली नाही?’’

(पृ.१८) 


असा प्रश्न जेव्हा कवी मेघराज मेश्राम यांना पडतो, तेव्हा त्या प्रश्नाची कविता होते. ती कविता म्हणजे खरी माणूस असण्याची नोंद आहे. माणूस आहे म्हणून तो बोलू शकतो. या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो. म्हणून या कवितासंग्रहातील कविता म्हणजेच खऱ्‍या अर्थानं माणूस असण्याच्या नोंदी आहेत.

‘बेवारस’ या कवितेतून एखाद्या माणसाची माणूस म्हणून ओळख न पाहता लगेच त्याला कोणत्या जातीचा, धर्माचा वा वर्णाचा आहे हे कसे पाहिले जाते, हे सांगताना कवी मेघराज म्हणतात-


‘तो माणूस आहे कोणीच कसे बोलत नाही’

  (पृ.१५) 


ज्या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे, बोलण्याची आवश्यकता आहे, त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. अनावश्यक गोष्टींवर लोक बोलत सुटतात. जणू नको त्या गोष्टीवर बोलायची चढाओढ लागलेली आहे. म्हणून मेघराज मेश्राम म्हणतात-


‘काळ सरकत आहे भयंकराच्या शेवाळी वाटेवरून 

चढाओढ लागलीय दगडांची उंची वाढवण्याची 

आणि माणसांचा केला जात आहे बोन्साय’ 

(पृ.१६) 


विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर भविष्यात कदाचित माणूस चंद्रावर वसाहत करू शकेल. सूर्याला आपल्या बोटांवर नाचवू शकेल एवढे सामर्थ्य माणसात येईल. पण, आजचा जो माणूस आहे, त्याला सुखानं कसं जगता येईल यासाठी कोणी काही करणार आहे की नाही? दगडी पुतळ्याची उंची वाढवण्याच्या स्पर्धेपेक्षा जो जिवंत माणूस आहे, त्याचे जे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भाने कोणीतरी बोलले पाहिजे. पण, त्या मुद्द्याला बाजूला सारले जाते. म्हणून कवीला प्रश्न पडतो की, या माणसांचे काय? कवी मेघराज मेश्राम थेट विठ्ठलालाच ‘तू असे कमरेवर हात ठेवून कुठपर्यंत उभा राहणार आहेस’ असे विचारतात.


‘हात कमरेवर ठेवून 

तू कुठवर नुसता बघत राहशील माझ्या यातनांची गाथा 

शिलगवतोय मी माझ्या दुःखमाखल्या भाषेची वात 

गाभारा सोडून येणार आहेस की नाही ते सांग’

      (पृ.५४)


हल्ली इथे फक्त माणसंच स्वार्थीपणाने विचार करत आहेत असे नाही. तर ज्या आईच्या नात्याला आपण पवित्र समजतो, ती आईही आज आपल्या वरवरचे सौंदर्य जपण्यासाठी आपल्या चिमुकल्याला स्तनपान करत नाही. म्हणून मेघराज आपल्या आईला प्रश्न करतात-


‘हल्ली फिगर मेन्टेन करण्यासाठी 

स्तनपान टाळतात आया 

माय, तू काय मेन्टेन करत होतीस’ 

      (पृ.४३) 


बाह्य सौंदर्यापेक्षा नातं जपणारी आई म्हणूनच महत्त्वाची वाटते. या संग्रहातील अशा आईच्या आणि बाईच्या कविता मनाचा ठाव घेत, विचार करायला भाग पाडतात. बाई गं (पृ. ४२), सावित्रीची लेक (पृ. ४४), बाया (पृ. ४५), तुळसाबाई (पृ. ४७), इमलाबाई ( पृ. ४८), शूर्पणखा (पृ. ४९), आसिफा (पृ. ५३) या कवितांतून बायांच्या व्यथा-वेदना आणि प्रेम समजून घेता येते.

‘वाकळ’ ही कविता आईच्या अपार प्रेमाचं प्रतीक. तिचं वाकळ तयार करणे, गोधडीला सोयीने टाके घालणे म्हणजे आईच्या नात्याची घट्ट वीण, आपुलकी टिकवण्यासाठी मायेची गोधडी बनवणे.

अवतीभवतीचे भयाण वास्तव पाहिल्यानंतर कवीच्या मनाची तगमग होत असते. तो त्याच्या कवितेच्या माध्यमातून ती तगमग मांडण्याचे आणि समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या अडचणींची दखल घेण्याचे काम करत असतो. म्हणून कवी नेहमीच विरोधी पक्षातला असल्यासारखा असतो. म्हणून कवी-लेखकाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा संशयाचा असतो. कवीनं जरी कधी हातात शस्त्र घेतलेले नसले किंवा कुठे कोणता गुन्हा केलेला नसला, तरीही त्याच्याकडे संशयाच्याच नजरेने पाहिले जाते. म्हणून कवी मेघराज मेश्राम कवीकडे संशयाच्या नजरेने पाहणारांना प्रश्न करतात-


‘मी फक्त

कवी आहे

तुम्ही माझ्याकडे

संशयाने का पाहता’

          (पृ.२९)

‘कविता अन् मृत्यू’ आणि ‘कवींना नोटीस’ या दोन कवितांतून कवी काय आहे आणि तो काय करू शकतो, हे सांगितलेले आहे. पण, आजच्या काळात मुक्तपणे लिहिण्याचे, बोलण्याचेही बंधन आहे. पण, कवी त्याच्यावर कितीही बंधनं आली तरीही विचारांची पेरणी करतच राहतो. त्याला अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनात कुठेतरी उजेड पेरायचा असतो. म्हणूनच ‘माणूस असण्याच्या नोंदी’ या कवितासंग्रहात अनेक कवितांमधून उजेड, प्रकाश, महासूर्य हे शब्द वैचारिक उजेड आणण्याच्या दृष्टीने योजलेले दिसून येतात. फुटवे (पृ. २५), कवींना नोटीस (पृ. ३३), कवितेतील पाणी (पृ. ३८).      

सर्वसामान्यांची मुस्कटदाबी होत असणाऱ्या दिवसातही कवी सामान्यांच्या मनात उजेडाची पेरणी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला हिमतीनं जगण्याचं बळ देताना कवी म्हणतो-


‘असा कच खाऊ नकोस भाऊ 

ऊठ, काळोख नांगरून काढू 

उजेडाची पेरणी करू’ 

            (पृ. २४)

कवितासंग्रहाला राजू बाविस्कर यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि रेखाटन असून प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांची पाठराखण आहे. प्रफुल्ल शिलेदार मेघराज मेश्राम यांच्या कवितेबद्दल म्हणतात- ‘‘मेघराज मेश्राम यांची कविता कुठलाही अभिनिवेश नसलेला प्रामाणिक उद्गार आहे. झगमगत्या जगातील आपल्या कळाहीन आयुष्याबाबत बोलताना ती नकळतपणे समाजाच्या परिघाबाहेरील वर्गाचा विश्वसनीय आवाज होते. जगण्यातील भयाणपणामुळे येणारी, जीवनेच्छेच्या मुळांना नख लावणारी, पराकोटीची अस्वस्थता त्यांच्या कवितेत जागोजागी दिसून येते.


कवितासंग्रह : माणूस असण्याच्या नोंदी  

कवी : मेघराज मेश्राम

प्रकाशन : लोकवाङ्मय गृह, मुंबई 

पृष्ठ : ७२

मूल्य : १५० 

...


शरद ठाकर

सेलू, जि. परभणी

मो. ८२७५३३६६७५