एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

२८ जून २०२४

भुईचा लळा लावणाऱ्या कविता - भूईचे लळासे

॥ भुईचा लळा लावणाऱ्या कविता - भूईचे लळासे ॥



ग्रामीण कवितेतील महत्त्वाचे कवी इंद्रजित भालेराव यांनी शेती,माती,शेतकरी यांची कविता लिहिली आहे. त्यांचा 'भुईचे लळासे' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून इंद्रजित भालेराव यांची कविता वाचत असताना आपल्याला त्यांचा भूमीविषयी असलेला लळा त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतो. त्यांच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकांवरूनही हे आपल्या सहज लक्षात येते. १९८९ ला प्रकाशित झालेला त्यांचा पहिला कवितासंग्रह 'पीकपाणी' ज्यामधून शेतीमातीच्या संदर्भात कविता आलेली आहे, म्हणजे भूमी आलीच, 'आम्ही काबाडाचे धनी' या संग्रहातून शेतकरी फक्त काबाडाचा म्हणजेच कष्टाचाच मालक आहे आणि हे कष्ट भूमितच करायचे असतात, म्हणजेच पुन्हा भूमीचा  संदर्भ आलाच. 'कुळंबीची कहाणी' कुळंबीन म्हणजे शेती करणारी, शेतात राबणारी स्त्री म्हणजे पुन्हा जमीन, भूमी आलीच, 'भूमीचे मार्दव', 'भूमी निष्ठांची मांदियाळी', 'सारे रान', 'सुगी भरल्या शेतातून' या शीर्षकातून त्यांचा भूमीविषयी असलेला लळा, जिव्हाळा अधोरेखित होतो.     'भुईचे लळासे' या शीर्षकाचा विचार केला तर भुई म्हणजे भूमी, जमीन, शेती आणि लळा म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आपलेपणा,पण या कवितासंग्रहाचे शीर्षक त्यांनी 'भुईचा लळा' असे न ठेवता 'भुईचे लळासे' असे ठेवलेले आहे.या ठिकाणी लळासे या नवीन शब्दाची निर्मिती त्यांनी केलेली दिसते. जसे एखाद्या झाडाला नव्याने फुटलेल्या फांदीला आपण धुमारा फुटला म्हणतो,पण जेव्हा त्याच झाडाला अनेक फांद्या फुटतात. तेव्हा त्याला आपण धुमारे फुटले म्हणतो. अगदी त्याच पद्धतीने लळा म्हणजे प्रेम, जिव्हाळा,आपलेपणा, आपुलकी पण लळा या शब्दाचे तसे अनेक वचन होत नाही किंवा प्रेम, जिव्हाळा हा काही मोजता येत नाही. त्यामुळे त्याचे अनेक वचन होणार नाही,पण प्रेमाची जी भावना आहे. तिला अनेक धुमारे असू शकतात.ते दर्शवण्यासाठी इंद्रजित भालेराव यांनी मराठी साहित्याला लळा या शब्दाच्या अनेकवचनासाठी 'लळासे' हा नवा शब्द दिला आहे.ज्यामधून प्रेमाच्या,जिव्हाळ्याच्या मोजता न येणाऱ्या सुप्त भावनांच्या अनेक छटा दिसून येतात.        भुईचे लळासे या कवितासंग्रहातून शेतकऱ्याच्या भुईच्या लळ्या बद्दलच्या अनेक स्वरूपाच्या कविता आलेल्या आहेत. त्यामध्ये भूमिनिष्ठ शेतकरी,शेतकरी आंदोलनकर्ते यांच्या कविता वाचायला मिळतात.शेतकरी शेतात अपार कष्ट करतो,परंतु शेतकरी संघटित होत नाही,होऊ शकत नाही. हा विश्वास असल्याने शेतकऱ्याचे पुरेपूर शोषण करायचे काम इथले व्यापारी आणि व्यवस्था करते. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना एकत्रित करून काही शेतकरी संघटना आक्रमकपणे काम करतात. शेतकऱ्यांना अन्यायाची जाणीव करून देऊन, आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शेतकऱ्यांची जाणीव जागृती करून एकत्रित येतात.तेव्हा त्या संघटनेसाठी जे काही करता येईल ते सर्व काही करायची तयारी शेतकऱ्यांची असते. शेतकरी जशी निष्ठेने शेती करतो किंवा ज्या निष्ठेने आषाढी-कार्तिकीची वारी करतो,वारीची वाट पाहतो,त्याच पद्धतीने निष्ठावान कार्यकर्ता मोर्चा,आंदोलनाची वाट पाहतो.मोर्चा,आंदोलन, सभा म्हटले, की त्या शेतकऱ्याच्या अंगात दहा हत्तीचे बळ येते. स्वतःचे काम बाजूला ठेवून,वैयक्तिक नफ्यातोट्याचा विचार न करता.शेतकरी चळवळीसाठी झटत असतो.हे काम करताना त्याला अभिमान वाटतो. अशावेळी शेतकऱ्याची छाती कशी फुगून येते हे सांगताना ते म्हणतात,'आरक्त पार्श्वभूमीवर विरक्त अक्षरांचा बिल्ला त्याच्या चवड्या छातीला आणखी चवडं करायचा' (पृ.२३)    अशा पद्धतीने कधीतरी आपले शेतकऱ्यांचे राज्य येईल,शेतकऱ्यांचा विचार करणारे शासन येईल,असे शेतकऱ्याला वाटल्याने काही शेतकरी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, चळवळीलाच सर्वस्व समजून निष्ठेने काम करतात.पण चळवळीतही कधीतरी राजकारण येते आणि तिथे शेतकरीहितापेक्षा त्या चळवळीचा नेता त्या चळवळीचे सर्व श्रेय घेऊन स्वतःचा फायदा करून घेण्याचा विचार करतो.तेव्हा त्या संदर्भात इंद्रजित भालेराव म्हणतात.'कितीही धावला घोडातरी श्रेयाचा धनी स्वारच असतो'     (पृ.२५)सत्तेच्या मोहापायी चळवळ जेव्हा एखाद्याच्या स्वार्थासाठी अशी भरकटते तेव्हा त्यांची भाषाही बदलू लागते.व्यवस्थेच्या विरोधात बोलणारे त्यांचा स्वार्थ साधला की व्यवस्थेच्या बरोबर जाऊन त्यांचीच भाषा बोलू लागतात.तेव्हा खांद्याला खांदा लावून नेटाने लढणारे, भांडणारे,चळवळ पुढे घेऊन जाणारे जेव्हा शेपूट खाली घालून वागतात.तेव्हा ही चळवळ निर्माण करणाऱ्या,त्यामध्ये निष्ठेने सहभागी होणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला ही चळवळ पुढे घेऊन जाणारे चांगले लोक आपण निर्माण करू शकलो नाहीत,की ही व्यवस्थाच त्यांना पळवण्यात यशस्वी झाली याबद्दल बोलताना ते म्हणतात‌‌,'खांदे घडवण्यात आपण अपयशी झालोकी आयते खांदे पळवण्यात ते यशस्वी झाले' (  पृ.२८)शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात शेतकरी हुतात्म्यासाठी (पृ.१५), फोटो (पृ.१६), श्रेय (पृ.१८), दादा (पृ.१९), निष्ठावान (पृ.२०), अवलिया (पृ.२१), फाटणारा उर (पृ.२२), बिल्ला (पृ.२३), उलट (पृ.२४), लांडगे (पृ.२५), टाळ्या ( पृ.२६), बी (पृ.२७), खांदा (पृ.२८), नायक खलनायक (पृ.२९) या कवितांमधून शेतकरी आंदोलन, कार्यकर्ते आणि या आंदोलनाच्या संदर्भाने चळवळीतील नेते आणि त्यांची बदलत जाणारी भाषा हे सगळे या कवितांमधून आलेले आहे.    बदलता निसर्ग, जागतिकीकरण, बदलते नैसर्गिक संदर्भ, त्यामुळे माणसं पूर्वी जशी वागायची, बोलायची, दिलेला शब्द पाळायची, पण आता माणसं पूर्वीसारखी राहिली नाहीत‌,ती बदलली आहेत.त्या माणसांचे नाना प्रकारचे संदर्भ असलेल्या माझे शब्द (पृ.१३ ), दृश्य (पृ.१७), ती (पृ.३२), घूस (पृ.३९,४०), रहना नही देश विराना है (पृ.४८), जान्याची वाट पहाव( पृ.७४) या कविता या संग्रहात आहेत.    माणसं बदलली, इतर परिस्थिती बदलली,भौतिक सुविधा निर्माण झाल्या,जग जरी बदलले असले,तरी शेतकऱ्याची स्थिती काही अजूनही बदललेली नाही.त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या कशी काय करू शकतो ? त्याच्या गुराढोरांची काळजी घेणारा,छोट्या छोट्या गोष्टीला घाबरणारा, जपून काम करणारा माणूस एकदम मरणाला कसे काय जवळ करू शकतो ? कारण त्याला मरणापेक्षाही शेतकऱ्याची परिस्थिती कठीण वाटते याबद्दल ते म्हणतात,'मरणाला इतका घाबरणारा आज स्वतःहून मरणाला कसा काय सामोरा गेला असेल ?परिस्थिती त्याला मरणापेक्षाही जास्त भयावह वाटली असेल'  (पृ.४८)आत्महत्येच्या संदर्भातील सोंग (पृ.५४) ही दीर्घ कविता ज्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे भयानक वास्तव चित्र रेखाटलेले आहे. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न कुठलीही शासन व्यवस्था आली तरी ती शेतकऱ्याचे प्रश्न न सोडवता शेतकऱ्याची पिळवणूकच करण्यात धन्यता मानणारी दिसून येते.शेतकऱ्यांनी संप केला काय,मोर्चे काढले काय,शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या काय व्यवस्थेवर याचा काहीही परिणाम होत नाही. व्यवस्था हातात येईपर्यंत फक्त यांना शेतकरीहित जपायचे असते. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाटक करायचे असते,म्हणून इथले नेते सहानुभूतीचं नाटक करतात आणि सत्ता हातात आली,की त्यांचीही भाषा ते बदलतात.सहानुभूतीचे हे दुष्टचक्र असेच चालू राहते,परंतु शेतकऱ्याचे दुःख काही कोणी कमी करू शकत नाही.मग हे दुष्टचक्र कुठपर्यंत चालेल  हे सांगताना इंद्रजित भालेराव म्हणतात.'जोपर्यंत तू फसत रहाशील तोपर्यंत यांचं हे बदली नाटक चालत राहील तू बदललास तरच हे नाटक बंद पडेल नाहीतर तुला जन्मजन्मांतरीही पुरून उरेल ( पृ.६३)या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्याला जागृत करण्याचे कार्य ते करतात.या कवितामधून शेतकरी प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती कुठेतरी बदलायला सुरुवात होईल.शेतकऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी इंद्रजित भालेराव त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांना काळ कितीही कठीण आला तरी तो काही घर बांधून राहत नाही, आलेला क्षण कधी ना कधी जाणारच असतो, फक्त त्या कठीण काळात आपण टिकून स्थिर राहिले पाहिजे हे सांगतात.अनेक अस्मानी सुलतानी संकटे सहन करत शेतकरी पुढे चालत असतो,त्यामुळे ते शेतकऱ्याला म्हणतात.'आत्महत्येचा अंगावर कोसळणारा पहाड तोलून धर निकराने कदाचित पुढच्या पिढीसाठी मोकळ्या होतील वाटा यातूनच सोस बापा सोसएवढंच म्हणू शकतो तुझ्यासाठी' (पृ.४७)अशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊन शेतकऱ्यांना फक्त निकराने लढत राहण्याचा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात. माणसाने कसे जगले पाहिजे आणि कसे वागले पाहिजे.हे ते 'जाण्याची वाट पाहतो' (पृ.७२ ते ७७) या कवितेतून शेतकऱ्याला सांगताना ते शेतकऱ्याला मोठेपणात वाहवत न जाता परिस्थिती पाहून आपण आपल्या कुटुंबाचा विचार करून राहिले पाहिजे,डोक्यात नको त्या गोष्टीचा राग मनात ठेवला नाही पाहिजे,नाहीतर रागाच्या भरात माणूस नको ते चुकीचे पाऊल उचलतो,त्यामुळे ते शेतकऱ्याला सनकीपणा, हटखोरपणा सोडून देण्याचा सल्ला शेतकऱ्याला देतात. हटखोरपणाच्या पायी कशी अनेकांची राख रांगोळी झाली,त्यामुळे माणसाने लव्हाळ्या सारखे वाकून,टिकून राहिले पाहिजे हे सांगतानाच माणसाच्या मनात काही दुःख असेल तर ते मोकळेपणाने आपल्या आप्ताजवळ सांगितले पाहिजे,त्यांना सांगायची लाज वाटत असेल,तर आपल्या बैलाच्या गळ्यात पडून  दुःख सांगावे,पण आपले मन मोकळे करावे. प्रसंगी रडू येत असेल तर  बैलाच्या गळ्यात पडून रडून मन मोकळे करण्याचा सल्ला ते शेतकऱ्याला देतात. कारण मनातलं दुःख कोणाला तरी सांगितल्याने हलके होते. कितीही कठीण काळ असला तरी तो जाणारच असतो हे सांगताना ते म्हणतात.'माणसानं हमेशा जगण्याचाच विचार करावा कोणतेच दिस राहायला येत नसतात किती वाईट दिस आले तरी ते जातास्तातच आपण त्याह्यच्या जाण्याची वाट पाहाव' (पृ.७७)अशाच पद्धतीचा आशय आशावाद,दहीहंडी फोडीन (पृ‌.६८ ते ७१) या कवितेतूनही ते शेतकऱ्याला देतात. शेतकऱ्याचे मन आनंदी असेल तरच त्याच्या शेतात त्याचा जीव रमतो, म्हणून शेतकऱ्याला घरात आनंदाने राहता आले पाहिजे,त्याला समाधान भेटेल पाहिजे.या कविता संग्रहात आई,आजी, मुलगी,मावशी,बायको, बाप यांच्याविषयीच्या कविता आलेल्या आहेत. त्यामध्ये लेकरावर संस्कार करणारी आई, आपल्या पायाखाली मुंगीही विधवा होऊ नये एवढा विचार करून कृतीतून भूतदयेचे संस्कार देणारी आई, दुःख सहन करत नेटाने आलेल्या प्रसंगाला अंगावर घेऊन रडत न बसता हिंमतीने जगणारी मावशी अशा स्त्रिया येतात.पत्नीला त्रास देणाऱ्या व्यसनी पतीला नांदायला जाऊन पहावं (पृ.१२८) या कवितेतून ते व्यसनी माणसाला समजवतात की, बायकोवर हात उचलण्यापूर्वी स्वतःची माय,बहीण आठवून  पहावी.स्त्री सर्व घरादाराला,माय, बापाला विसरून आपल्या पतीच्या विश्वासावर पतीसाठी सगळं काही सोडून आलेली असते.म्हणून नांदायला आलेली स्त्री म्हणजे उपटून आणलेले झाड असते.त्या झाडाच्या मुळ्यांना सांभाळले,वाढवले तर स्त्री नावाचे हे झाड भविष्यात आपल्यालाच सावली,फळफुल देणार आहे,म्हणून स्त्रीचा सन्मान करून तिला प्रेमाने जगवले पाहिजे हे सांगताना ते म्हणतात,'तिच्या झाडा भवताल आळं करावंत्याला रोज पाणी घालाव एक बार रुजून लखाटलं झाड की मग आपनालाच मिळतात पाड' (पृ.१३०)    या कवितासंग्रहात आदर्श (पृ.१६८) या कवितेतून कवितेच्या प्रेरणे बद्दल तर माझ्या कविते (पृ.१४१), प्रसूती (पृ.१४६), चिंधी (पृ.१४५), शब्द (पृ.१४८), उपऱ्या हालचाली (पृ.१४९), अट (पृ.१५०),पाप (पृ.१५२,१५३), कवीविषयी (पृ.१५६ ते१६०), पर्यटकांनो (पृ. १६१), मांजर (पृ.१६२ व १६३) या कवितांमधून कविता कशी असावी, कशी नसावी, कविता कशी सुचते, सुचताना काय होते,उपऱ्या पद्धतीने लेखनाचा उसना आव आणून कवी म्हणून पुरस्कारामागे फिरणाऱ्या कवीचे काय होते,त्या संदर्भाच्या कविता वाचायला मिळतात‌.भुईचे लळासे मधील अनेक कवितांमधून कवी इंद्रजित भालेराव यांनी म्हणी व वाक्प्रचारांचा सहजपणे विपुल प्रमाणात वापर केलेला दिसून येतो.जसे की, इडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो (पृ.१९), भीक नको,पण कुत्रा आवर,काढता पाय घेणे (पृ.२५), झारीतील शुक्राचार्य (पृ.३३), तुला न मला,घाल कुत्र्याला (पृ.५७), लाथ मारीन तिथे पाणी काढीन (पृ.७०),चारी मुंड्या चित करणे (पृ.७१), नवं तव्हरक सवं,उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तोंड पोरीच अन् भोक मोरीचं,उबडी उताणी अन् कानी कतानी (पृ.७५), खाऊन माजाव,पण टाकून माजू नये;पाठीवर माराव,पण पोटावर मारू नये; घासातला घास देणे, ज्याच खावं मीठ त्याच कराव नीट;खाल्ल्या घराचे वासे कधी मोजूने (पृ.८१) गव्हा सोबत किडे रगडणे ( पृ.९३), उकिरड्याचेही पांग फिटतात, दराची माती दराला पुरत नाही (पृ.१०१), अडकित्त्यात सुपारी (पृ.१०७), शिवळावर पडणे (पृ.१०९), भांड्याला भांडे लागणे, काचाचे भांडे (पृ.१२९), तेल बी गेले तुप बी गेले, हात पसरी हात्तारी न देयना ते भिकारी (पृ.१३२), मला पहा फुलं वहा (पृ.१३३), नदीचे मूळ कधी शोधू नये (पृ.१४०), नरडीचा घोट घेणे, गळा घोटणे (पृ.१४६), बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी (पृ.१४७ ), उखळ पांढरे होणे (पृ.१६५) या म्हणी व वाक्प्रचारांना कवी इंद्रजीत भालेराव यांनी त्यांच्या कवितेत सहजतेने वापर केलेला आहे.मुखपृष्ठ आणि आतील सुंदर समर्पक रेखाटने चित्रकार सरदार जाधव यांची आहेत.तर ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ यांची प्रस्तावना या कवितासंग्रहस लाभलेली आहे.भुईचे लळासे मधील कविता भुईचा लळा असणाऱ्यांना भुईचा लळा वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासोबतच शेतकऱ्याचे शोषण करणाऱ्या शासन,प्रशासनातील लोक,व्यापारी यांच्याही मनात भुईचा लळा लागेल,त्यांना लळा लावावा वाटेल अशा पद्धतीच्या कविता भुईचे लळासेमध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांनाही भुईचा लळा लागेल आणि शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस येतील अशी आशा वाटते.

कवितासंग्रह - भुईचे लळासे 
कवी - इंद्रजित भालेराव
पृष्ठ - १७१, मूल्य - २५० 
प्रकाशक - विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर- 

   शरद ठाकर
 सेलू जि.परभणी, 
दूर - ८२७५३३६६७५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा