शेतकऱ्यांच्या जगण्याकडे सकारात्मकपणे पहायला शिकवणारी दीर्घ कविता: 'आयुष्य नांगरताना'
'आयुष्य नांगरताना' हा हेमंतकुमार कांबळे यांचा दीर्घ काव्यसंग्रह आहे.या काव्यसंग्रहातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्याची होणारी फरपट प्रत्ययकारी पद्धतीने शब्दबध्द केलेली आहे . या दीर्घ काव्यातील शेतकरी नायकाला त्याचं शेत नांगरायचं नाही कारण शेत नांगरून तर काहीच फरक पडत नाही.म्हणून शेतकऱ्याला शेत नांगरताना भला मोठा लोखंडी नांगराचा फाळ जमिनीत खुपसून, जमिनीला फाडून जमिनीवरची माती खालीवर करायचे काम हा नांगर करत असतो त्याच पद्धतीने शेतकऱ्याला त्याचे जगणे नांगरून काढायचे आहे.शेतकऱ्याचे जगणे नांगरून काढल्यावर तरी काही फरक पडेल अशी आशा या शेतकऱ्याला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे,शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याचे कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. शेतकरी मोठ्या कष्टाने त्याच्या शेतातून पीक पिकविण्याचे, त्याच्या विक्रीतून नवे काही खरेदीचे किंवा मुलीचे लग्न करण्याचे स्वप्न शेतकरी पाहत असतो, पण कायम शेतकऱ्याचे स्वप्न हे स्वप्नच राहताना आपल्याला दिसून येते.पण शेतकऱ्याचे कष्ट काही पाठ सोडत नाहीत. कधी ओला दुष्काळ,कधी कोरडा दुष्काळ तर कधी अवकाळी,दुबार पेरणी असे एक ना अनेक संकटे झेलत शेतकरी शेती करतो आणि कसेबसे पीक पाणी व्यवस्थित झाले तर शेतकऱ्याच्या पिकाला शासन हमीभाव देत नाही.व्यापारी शेतकऱ्यांना कच्च खाण्याचा प्रयत्न करतात आणि वरून शेतकऱ्याला शेतकरी राजा,बळीराजा म्हणतात तेव्हा शेतकऱ्याला अक्षरशः ते राजा म्हणणं म्हणजे त्यांना शिवी दिल्यासारखे वाटते. म्हणून कवी म्हणतो
'जिथं पेरणीच्या एका प्रश्नाने
होते जगणे एक सजा
तरी ऐकतो शिवी
शेतकरी म्हणे राजा'
(पृ.१७)
कितीही काबाड कष्ट करून शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच कष्ट करून ही दुःखाचेच दिवस येतात,म्हणून शेतकरी त्याच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देण्यासाठी तयार झालेला असतो.कारण शेतकऱ्याला आता शिक्षणाचे महत्त्व समजलेले असते शिक्षण हे कशा पद्धतीने गरिबांच्या घरातही सुख-समृद्धी आणू शकते हे कवी हेमंत कुमार कांबळे यांच्या कवितेतील शेतकऱ्याला माहित असल्याने त्यांचा शेतकरी म्हणतो
'निदान या लेकरांनी तरी शिकावी शाळा,
नकोत त्यांच्या वाट्याला
ह्या शेतकीच्या मरणकळा'
(पृ.२०)
या मरणकळातून शेतकऱ्याची मुक्ती व्हावी असे कोणालाच वाटत नाही.विधिमंडळातून विरोधी बाकावर असणारे शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळवून देण्यासाठी पोटतिडकीने बोलताना दिसून येतात आणि जेव्हा तेच सत्तेत खूर्चीवर बसतात.तेव्हा त्यांनीच केलेल्या मागण्या ते विसरून जातात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही नाही त्या पोकळ घोषणांची,योजनांची जाहिरात सत्ताधारी करतात.ह्या फसव्या जाहिराती पाहून शेतकरी हरखून जातो. जेव्हा योजनेचा लाभ घेता घेता शेतकरी हवालदिल होऊन जातो. त्याला शासकीय योजनांचा लाभ घेताना त्याचे चालू काम-धंदा सोडून शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागतात.टेबलाच्या खालून-वरून पैसे द्यावे लागतात.तेव्हा कुठे एखाद्या योजनेचा लाभ शेतकऱ्याला घेता येतो. या शासकीय योजनेच्या संदर्भात कवी म्हणतात
'कागदाच्या जुळवणीने
वैतागला जीव
इंजिनियरच्या 'ॲडजस्टमेंट'ने
नाही केली कीव'
(पृ.४०)
बर हे जे शेतकऱ्यांचे शोषण करणारे असतात.तेही कधी काळी शेतकऱ्यांचीच लेकरं असतात,परंतु शिकून थोडे शहाणे झाले,की ते आपल्या जन्मदात्या माय बापाला विसरून शहरी संस्कृतीत वेगळेपणाने जगायला लागतात. आपल्या श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन घडवण्यात त्यांना मोठेपणा वाटायला लागतो,पण ते विचार करत नाहीत की शेतकरी ही शेवटी माणूसच आहे.त्यालाही आपल्याला जशा सुखाच्या अपेक्षा आहेत तशा त्यालाही काही सुखाचे क्षण मिळाले पाहिजे याचा विचार कोणी करताना दिसून येत नाही,उलट शेतकऱ्यांना लुटण्यातच त्यांना धन्यता वाटते.जगाचा पोशिंदा शेतकरीच जर सुखी नसेल तर भविष्यात ह्या शेतीकडे,शेती व्यवसायाकडे कोणी वाळायचे आणि काय खायचे शेतकऱ्यांच्या आत्महत्ये नंतर त्याची मुलं पुढील पद्धतीने विद्रोहाची भाषा करू लागतात.
'जगाच्या कोणत्या न्यायालयात
चालवू म्हणाले खटला
बापाच्या मृत्युचा
अन्
कोणा कोणावर लादू
कलम तीनशे दोनचे'
(पृ.४९)
शेतकऱ्यांच्या मुलांचा हा विद्रोह व्यापारी ,शासनकर्ते यांनी लक्षात घेतला पाहिजे.नाही तर एक दिवस शेतकऱ्यांची पोरे व्यवस्थेचा विरोधात नक्कीच विद्रोह करतील तेव्हा त्यांना कोणतीच शक्ती रोकू शकणार नाही.
कवी,समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांनी पाठराखण केलेली आहे यामध्ये या कवितेत बद्दल ते म्हणतात 'ह्रदयशून्य संस्कृतीची भेदक समीक्षा करणाऱ्या या महाकवितेने इथल्या तकलादू नैतिकतेचे मुखवटे बेमूर्वतखोर पध्दतीने फाडलेला आहे'
एकंदरीतच शेतकऱ्यांच्या जगण्याकडे सर्वांनाच सकारात्मकपणे पाहायला शिकवणारा आणि भविष्यातील संकटांची जाणीव करून देणारी ही दीर्घ कविता आहे.शोषण कर्ते स्वतःही एक ना एक दिवस त्यांना नाही,पण त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या खाजगीकरण, उदारीकरणाच्या चरख्यात अडकावे लागेल ही जाणीव शोषण कर्त्यांना कवी करून देतात.तेव्हा आपल्या देशाची जी कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे.ती तशीच राहू द्यायची असेल तर शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना थांबवून समूह शेती,शेतीचे व्यवस्थापन करून पुन्हा एकदा शेती व्यवसायाला चांगले दिवस आणावेत तरच शेती,शेतकरी आणि सर्वच मानव जात टिकू शकेल असे कवीला वाटते.
कवितासंग्रह -
आयुष्य नांगरताना
कवी -
हेमंतकुमार एकनाथ कांबळे
पृष्ठ - ५२
₹ - ८०
प्रकाशन -श्रावस्ती प्रकाशन,यवतमाळ
शरद ठाकर
सेलू जि परभणी
८२७५३३६६७५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा