"उपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवणारी नदीष्ट"
मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या j'अक्षर भेट' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांची लेखनामागील भूमिका आणि साहित्यकृतीवर चर्चा घडवून आणल्या जाते. त्या कार्यक्रमात नदीष्ट ह्या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्वतः मनोज बोरगावकर उलगडून दाखवणार होते.
कोरोना काळात अनेक ऑनलाईन कार्यक्रम ऐकले परंतु नदीष्ट विषयी मनोज बोरगावकर बोलत असताना नित्यनेमाने नदीच्या परिसरात घडणाऱ्या अनेक घटना,घडामोडी स्वतः जगणारा उपेक्षित जीवन जगणाऱ्यांना आपलस करून बोलत करणारा हा माणूस अफलातूनच वाटला.निर्मितीप्रक्रिया सांगताना ते स्वतः जगलेल सांगत होते म्हणून तो आभासी संवादही जिवंत वाटत होता आणि म्हणून मला नदीष्ट मूळातून वाचण्याचीmm उbत्सुकता लागून राहिली होती.मी नदीष्ट मागवली आणि झपाटून गेल्यासारखी वाचून काढली.
ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली नदीष्टची ही तिसरी आवृत्ती असून नयन बाराहाते यांनी नदीष्टला साजेसे मुखपृष्ठ आणि मधे मधे सुंदर रेखाटनं केलेली आहेत.
नदी जशी कुठलीही अपेक्षा न ठेवता वाहत राहते.तशाच पद्धतीने नदीष्ट मध्ये आपल्याला समाजाने उपेक्षित ठरवलेले, उपेक्षित जीवन जगणारे बामनवाडा,सकिनाबी, कालू भैय्या,सगुणा,मालाडी, दादाराव,भिकाजी ही माणसं भेटत राहतात.उपेक्षित असूनही माणसाने माणसांशी कस माणसासारखं वागल पाहिजे.हेच त्यांच्या वागण्या-बोलण्यातून शिकवून जातात.
सकीना भिकारीन असूनही नदीवर झालेल्या जुजबी भेटीमुळे रेल्वे स्टेशनवर ओळखीशी इमान राखून लेखकाला चोरांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा भिकारीन असूनही तिच्यातल्या माणुसकीच्या दर्शनाने ती खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरते.
नदीकिनारी चिंचेच्या झाडाखाली हरणाच्या कळपाला माकडे फांद्या हलवून चिंच आणि पाला खाऊ घालत होते.अर्थात त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच करत होते आणि ही परोपकाराची ही भावना त्यांच्याकडूनच आपल्यात वाहत आली असावी असे म्हणत असतानाच. माणूस किती स्वार्थी वृत्तीने वागतो आहे हे सांगताना ते म्हणतात.
" दाटून येणाऱ्या अंधारातही माकडांनी हरणावर केलेल्या परोपकाराच्या उजेडाचा तुकडा सोबत घेऊन मी अंधार तुडवत मंदिराकडे निघालो घाटावरच्या ट्यूबच्या तीव्र प्रकाशात तो खालून आणलेला उजेडाचा तुकडा केव्हा हरवून गेला हे कळलेच नाही."अशा प्रकारे परोपकाराची वृती माणसाने सहज हरवून टाकलेली आहे.
नदीवर मासे पकडून कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा पुरभाजी बामनवाड त्याच्यासमोर नदीवर टवाळखोर पोर जेव्हा आंघोळ करणाऱ्या बाईवर अत्याचार करतात.तेव्हा तो काही करू शकत नाही.प्रतिकार करावा तर त्याचा जीव घेणारी पोर पाहून गप्प बसणारा बामनवाड दोन महिने नदीकडे फिरकला सुद्धा नाही. त्या बाईची अवस्था पाहून तो म्हणतो, "त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पान्या परीस,नदीचं पाणी मला कमजोर वाटलं" स्वत:च्या जीवाला खाणा-या बामनवाडने
दोन महिने त्याचे कुटुंब कसे चालवले असेल तर असो, पण बाईला मन मोकळं करण्यासाठी असं कोणतंच हक्काचं ठिकाण भेटत नाही.जिथ हक्काने विश्वासाने आपल्या मनातलं दुःख ती सांगू शकेल,असे हक्काचे विश्वासाचे खांदे तयार व्हावेत.असे लेखकाला वाटते आणि ते होणे आवश्यक आहे.
नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान पाहून कालू भैय्या नदीला उद्देशून म्हणतो,"आपने माँ ये नाम को बट्टा लगाया उसने!" तेव्हा दादाराव कालु भैय्याला सांगतो ते जसं काही नदीच्या मनातल्या भावना तो बोलून दाखवतो.नदीचा महापूर म्हणजे तिची भडास आहे असं सांगतो माणसाला जसं कोणासमोर तरी हक्काच्या ठिकाणी मन मोकळ करायच असत तसच नदी महापुराच्या रूपाने आपलं मन मोकळं करत असते.अगदी आडदांड मुलाच्या कानफटात मारतानाही त्याला इजा होण्यापेक्षा तो सुधारावा अशी भावना असते, अगदी तशीच भावना महापूरातल्या नदीची असते.तिला जीवन उद्ध्वस्त करायचे नसते तर पुनरुज्जीवन करायचे असते. नदी वाहती राहिली तरच सर्व जीवन वाहते राहील,नदी स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही तर माणसाच्या अस्तित्वासाठी झगडत आहे.हे ध्यानात आणून देणारा दादाराव पुराने सर्वस्व धुवून नेल असल तरी आपल्या जवळ असलेल नाण नदीत टाकून कृतज्ञ होणारा दादाराव.जगाला सकारात्मक पद्धतीने नदीकडे पाहण्याची दृष्टी देणारा दादाराव महत्त्वाचा वाटतो.वृक्षतोड,वाळू,
मातीचा उपसा याद्वारे नदीची लूट करणाऱ्या मतलबी माणसाला दादाराव नदीकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला भाग पाडतो.
नदीष्ट मध्ये आणखी एक व्यक्ती आपल्या मनाचा ठाव घेते आणि विचार करायला भाग पाडते.ती म्हणजे भिकाजी. मांजरा बद्दल मनात प्रचंड राग असलेल्या भिकाजी कडून अनावधानाने दारूच्या नशेत मांजर समजून स्वतःच्या मुलीलाच फेकून भिंतीवर मारल्यामुळे भिका-याच जीवन जगावे लागत असलेला भिकाजी.नक्कीच स्वतःची मुलगी मारण्या एवढा क्रुर नाही,परंतु नकळतपणे घडलेल्या त्या क्रुर घटनेमुळे तो भोगत असलेल दुःख हे जगाला सांगू शकत नाही;परंतु लेखक नदीचा तळ
शोधण्यात जसे पारंगत आहेत त्याच पद्धतीने भिकार्याच जीवन जगणार्या भिकाजीच्या मनाचा ठाव घेण निश्चितच एवढं सोपं नाही.त्यासाठी लेखक स्वतः भिकाजीच्या डब्यातील पदार्थ खातात आणि स्वतःचा डबा भिकाजीला देतात अशा एक ना अनेक प्रसंगातून लेखकाच वंचित समजल्या जाणाऱ्या माणसांना आपलस करण त्या अबोल लोकांना मन मोकळं करायला हक्काची जागा देऊन.वंचितां मध्ये असलेल संवेदनशील मन दाखवून दिलेले आहे. वंचितांच्या मनातला संवेदनशीलपणा, चांगुलपणा, प्रेम प्रदर्शित करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
भिकाजीचाच विचार केला तर वरडोळे माशांना रोज लंगर मधील भाकरी कुसकरून टाकणं. स्वतः भीक मागून जमवलेले पैसेही जुजबी ओळख असलेल्या गब्दुल्या कॉन्ट्रॅक्टरला 275 पैकी फक्त पाच रुपये ठेवून 270 रुपये देणे. किडनी फेल झालेल्या मुलाच्या बापाने किडनी द्यायची विचारणा केली की लगेच किडनीही द्यायला तयार होणं,
दारूचा वास येईल म्हणून मुलीचा पापा न घेणारा माणूस कसा असंवेदनशील असू शकतो हे वाचकालाही पटायला लागतं.
नदीष्ट वाचत असताना सगुणा हे तृतीयपंथी पात्र मेंदूला झिणझिण्या आणणारा प्रश्न करत.
"नजरे चुरानेवाले तुम..और हिजडे हम.. वारे व्वा.. सच्ची बता,आँख मे आँख डालके देखनेवाला हिजडा की नजर चुरानेवाला हिजडा? आँख चुरानेवाला हिजडा हुआ नारे !"
नदीष्ट वाचत राहताना हा प्रश्न मनातून काही जात नाही.तो आपल्याला निरूत्तर करतो,परंतु सगुणा तृतीयपंथी जरी असली तरी मनाने कशी संवेदनशील आहे.तिच्या वाट्याला हे कशा पद्धतीने आलं.हे नदीष्ट वाचत राहताना आपल्याला तृतीयपंथीयांच जीवन उलगडत रहात.आपण जगत असलेल्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का न लागू देता सगुणा कशी वागते.याच वाचकाला अप्रूप वाटायला लागत.
लेखकाला नदीच एवढ आकर्षण का आहे.हे सांगता येत नाही पण त्यांचे एक तत्वज्ञान आहे. ते म्हणजे जन्माच्या आधी आपण आईच्या गर्भात पाण्यातच होतो ना!आईच्या गर्भाशी नदीला जोडणारे मनोज बोरगावकर पुढे म्हणतात "आपल्याला असलेल्या नदीच्या अनादी आकर्षणाचे कारण आईच्या गर्भाशी तर निगडीत नसेल ना? नदी म्हणजे विस्तारत गेलेले गर्भाशय" काळ,वेळ प्रसंग याचे कुठलेही भान नसलेले मनोज बोरगावकर यांना कालू भैय्या जेव्हा जपून पोहायला सांगतो. तेव्हा ते म्हणतात."ये नदी की कितनी आदत हो गई है ना,माँ की गोद की तरह, बोलो तुम्हीच कालू भैय्या, माँ की गोद मे कुछ धोका हो सकता है क्या?" एवढ नदीशी एकरूप झालेले मनोज बोरगावकर नदीष्ट कसे आहेत हे आपल्याला समजायला लागत.
नदीष्ट मधील पात्र ही कुठल्यातरी दुःखाने भरून वाहणारी आहेत.त्यांच्या दुखऱ्या आयुष्याकडे कोणीही निकोपदृष्टीने पाहत नाही परंतु लेखक या वंचित माणसाकडे निकोपदृष्टीने पाहून त्यांना आपलंसं करून त्यांच्यातलाच तो जिवाभावाचा होतो म्हणून,एखादी जखम जशी भळभळा वहायला लागते. त्या पद्धतीने ही वंचित माणसं लेखका जवळ आपल दुःख भडभडा बोलून मोकळे होतात.लेखक त्यांना व्यक्त होण्यासाठी हवी असणारी हक्काची जागा निर्माण करून देतो.त्यांना आपला जवळचा वाटतो म्हणून ह्या कादंबरीतील दुखरी,वंचित माणसं मोकळेपणाने बोलायला लागतात.
एखाद्या माणसाला कशाचा नाद,छंद असल्यास आपण जसे नादीष्ट माणूस आहे म्हणतो, तसे मनोज बोरगावकर हे नदीष्ट माणूस आहेत.एखाद्या जखमेतील दु:ख जोपर्यंत बाहेर पडत नाही. तोपर्यंत ती जशी ठसठसत रहाते,ती ठसठस,तो त्रास मनोज बोरगावकर यांना नदी किनारी भेटणा-या दु:खी माणसाला बोलतं करे पर्यंत त्यांना चैन पडत नाही.त्यांना बोलत करे पर्यंत ते बेचैन असतात.जेव्हा त्या दु:खी माणसाला आपलस करून त्यांचे दु:खाने ठसठसणारे मन हळुवारपणे बोलत करून त्याला दु:ख मुक्त करतात.तेव्हाच मनोज बोरगावकर यांना चैन पडते.हे नादीष्टपण आणि नदीष्टपण त्यांच्यात कायम रहावो.ते तुमच्यात माझ्यात येवो आणि ही माणुसकीची नदी अखंड अशीच वहाती रहावो.
नदी किनार्याने अनेक संस्कृतीचा विकास झाला.अनेक नगर,नागरी वस्ती, वसाहती नदीच्या प्रदेशात वाढत राहिल्या नदी अनादि काळापासून अखंड स्वतः दुःख भोगत आपल्याला समृद्ध करत वाहत आहे.अनेक बाया माणस अशी आहेत ज्यांना दुःख हलकं करण्यासाठी नदी आपली वाटते आणि अगदी तसेच मनोज बोरगावकर यांनी स्वतःनदी होऊन नदीष्ट मधील काळजी घेणारा कालू भैय्या,बामनवाड,दादाराव,पुजारी, प्रसाद,सकिनाबी, मालाडी,मीनासाब,सगुणा,भिकाजी या वंचित माणसांना बोलतं करण्यासाठी समाजाचा विचार न करता मन मोकळं करायला हक्काची जागा उपलब्ध करून दिली.नदीष्ट मध्ये ख-या अर्थाने अपेक्षितांच्या अंतर्मनाचा तळ शोधत माणसाला माणूसपण शिकवण्याच काम नदीष्टच्या माध्यमातून केलेलं आहे.नदी जशी वाहत राहिली की, तिच पाणी शुद्ध होत जात तशाच पद्धतीने माणसांनी आपल्यातले राग,लोभ, अहंकार,मत्सर विसरून अहंकाराच ओझ डोक्यावरून उतरवल तर नक्कीच आनंद वाटणारी आनंदाची ही नदी वहाती राहील यासाठी आपणही नदीष्ट होवू या.
नामवंत अनुवादक चंद्रकांत पोकळे यांनी
नदीष्टचा कन्नड भाषेत अनुवाद केला आहे.नदीष्ट अशीच अनेक भाषांमधून जगभर वाहत राहो याच शुभेच्छा.
कादंबरी- नदीष्ट
लेखक- मनोज बोरगावकर
प्रकाशन - ग्रंथाली, मुंबई
मूल्य- दोनशे रुपये
शरद ठाकर
सेलू जि.परभणी
८२७५३३६६७५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा