अंधारलेल्या भोवतालात उगवतीची दिशा दाखवणारी कविता 'जळताना भुई पायतळी'
अलीकडेच मराठी साहित्यात गावाकडून, शेता- शिवरातून आलेले अनेक तरुण कवी, जागतिकीकरणानंतर बदलेल्या ग्रामीण जीवनाचे आणि कृषीक्षेत्राचे वास्तववादी चित्रण करणारी समकालीन कविता लिहीत आहेत.
तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांची 'जळताना भुई पायतळी' या कविता संग्रहातील कविताही ह्याच प्रकारची आहे.
'जळताना भुई पायतळी' ह्या तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या कविता संग्रहातील कविता चार भागात विभागलेल्या आहेत. पायाखालची सरकणारी जमीन, ही कोणती वावटळ आली?,घामाची बारमाही नदी, निरूत्तर झाली माती असे चार भाग पाडून त्यात त्या त्या विषयाच्या अनुषंगाने कवितांची मांडणी केलेली आहे. त्यामुळे कविता वाचत असताना तो विषय आणखी खोल खोल आपल्या मनात उतरत जातो. एकंदरीतच ही कविता शेतीमाती, ग्रामीण जीवनातील नातेसंबंध व जागतिकीकरणामुळे झालेले जगण्यातील आणि कृषी जीवन संस्कृतीतील बदल.त्या बदलामुळे बदलत गेलेला माणूस.संपत चाललेला नात्यातील ओलावा आणि त्यामुळे माणसाच्या मनात आलेली तुटलेपणाची जाणीव करून देणारी, माणसाला जगण्याचे, वागण्याचे नवे भान देणारी ही कविता तान्हाजी बोऱ्हाडे यांनी लिहिलेली आहे.
नव्या पिढीतल्या कोणत्याच तरुणाला आता गाव खेड्यात राहून शेतीत काम करावे असे वाटत नाही.आपल्या शेतात मालक म्हणून काम करायची लाज वाटते,पण तोच तरुण शहरात जाऊन दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लाजत नाही.ही चुकीची मानसिकता तरुणांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे थोडेफार शिक्षण झाले,की प्रत्येक तरुण आपला गाव सोडून शहराकडे धाव घेत आहे.त्यामुळे आपली हक्काची शेती पडीक राहत आहे. भविष्यात गावाकडे राहून शेती कोण करणार ? आणि जगाला अन्नधान्य कोण पुरवणार ? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तरुणांच्या या शहरांकडे धावणाऱ्या लोंढ्यां बद्दल ते म्हणतात.
'पुढल्या पिढीला | शेतीचा उपास शहरांची कास | भाळणारी'
(पृ.५२)
आजचा तरुण शहरी झगमगटाला तेव्हाच भाळतो आणि गावापासून आपल्या माणसा पासून तो नकळतपणे दूर दूर जातो.शेतकरी राजा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे दुःख काय आहे ? हे कवी तान्हाजी बोराडे यांनी त्यांच्या अनेक कवितांमधून विषद केले आहे. 'अकरावी ओळ' या कवितेत ते म्हणतात. 'शाळेतल्या परीक्षेत प्रश्न आलेला
दहा ओळी निबंध लिहा
विषय शेतकऱ्याचे मनोगत '
(पृ.३९)
शेतकऱ्याचे मनोगत, त्याचे दुःख खरच त्या दहा ओळीत बसणारे आहे काय? तर नक्कीच नाही. शेतकऱ्याच्या आयुष्याची झालेली ही परवड अतिशय प्रत्ययकारी शब्दात कवीने मांडली आहे.शहरात राहणाऱ्या भावाने गावाकडे अवकाळी पाऊस झाला,म्हणून किंवा पाऊस पडला नाही म्हणून फोनवर बोलून नुसतीच हळहळ व्यक्त करून काहीच उपयोग होत नाही.हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झालेल्या शेतकऱ्याचे सांत्वन हे कोरडे शब्द करू शकत नाहीत. याबद्दल ते म्हणतात.
'टीव्हीवरल्या बातम्या पाहताना चहाच्या कपात विरघळणारी वांझोटी हळहळ ठरू शकत नाहीये बुडत्या माणसांना काडीचा आधार'
(पृ.३३)
शेतकऱ्याचे दुःख फार मोठे आहे. शेतकरी जगाच्या भरण पोषणासाठी बेभरोसी निसर्गावर विश्वास ठेवून शेतकरी काळ्या आईची कर्ज काढून विश्वासाने ओटी भरतो हिंमतीने आलेल्या परिस्थितीला सामोरा जातो,परंतु त्याला हे दुःख जेव्हा पेलणेच शक्य होत नाही. तेव्हा त्याच्या मनाची तगमग होते.त्याला स्वाभिमानीपणाने जगणे अवघड होते. तेव्हा तो आत्महत्येसारखी नको ती कृती करतो. शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कवीने समर्पक शब्दात भाष्य केले आहे. शेतकरी आत्महत्येची चौकशी करणाऱ्या प्रशासनाला शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचे दुःख सांगताना म्हणतो तुम्ही फक्त पंचनामा आणि पोस्टमार्टम करून त्याला आज मृत घोषित केले. 'माझा बाप तर याआधीच मेलेला होता फक्त आजवर त्यांनी आपला मृत्यू जाहीर केला नव्हता'
(पृ.२२)
शेतकरी कशाकशाने मरत जातो याबद्दल ते म्हणतात.
'दुष्काळान होरपळून अवकाळीने झोडपून कर्जाच्या डोंगराखाली जीव गुदमरून
दलालाच्या लूटमारीत कंगाल होऊन कोसळणाऱ्या बाजारभावात भुईसपाट होऊन वरीलपैकी कशानेही अथवा यापैकी प्रत्येक कारणाने तो मरत जातो हळूहळू आटत चाललेल्या झाऱ्या सारखा'
(पृ.८३)
शेतकरी आनंदाने जीवन जगत असल्याचे तो आनंदात सुखी असल्याचे नाटक शेतकऱ्याला करावे लागते कारण शेतकरी आनंदात, सुखात राहावा यासाठी कधीच कोणी प्रयत्न करत नाही.याउलट शेतकऱ्याचे जिथे तिथे शोषण कशा प्रकारे करता येईल. याचाच विचार जो तो करत असतो. निसर्ग, शासन,प्रशासन , व्यापारी, दलाल असे अनेक जण शेतकऱ्यांचे शोषण करायला टपलेलेच असतात या सर्वांच्या कचाट्यातून कसाबसा सुटलाच तर शेतकऱ्याला कसेबसे जीवन जगता येते. आपण दुःखी राहिलो तरी चालेल पण आपल्यामुळे आपले घर दुखी राहू नये म्हणून शेतकरी आपल्या घरच्यांसमोर दुःखात असला तरी सुखात असल्याचे नाटक करून जगत असतो याबद्दल हे वास्तव कवितेतून मांडताना कवी तान्हाजी बोऱ्हाडे म्हणतात. 'उपाशी पोटांनेच करतो आहे तो पोटभर जेवल्याचा अस्सल अभिनय आपल्या तोंडाकडे पाहत जेवणाऱ्या पोरांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून'
( पृ.६६)
अशाप्रकारे शेतकरी बाप स्वतः दुःख भोगून दुसऱ्याला नेहमी सुख देण्याचे काम करत असतो. शेतात काम करायच्या उमेदीच्या वयात तरुणांना राजकीय फडात सामील करून घेतले जाते आणि ती मुलंही हातात कुदळ, फावडं घेऊन शेतात कष्ट करायचे सोडून नको त्याचे रंगीबेरंगी झेंडे घेऊन मिरवतात.कोणत्या रंगाचा,कोणत्या तत्त्वाचा झेंडा आपण हातात घेतला पाहिजे हे त्यांना काही कळत नाही.कार्यकर्तेच काय जेव्हा नेतेच जर सकाळी एका तर संध्याकाळी दुसऱ्या झेंड्या खाली जात असतील,तर या तरुण पोरांचे काय भविष्य असणार आहे?, पण त्यांचे राहणीमान,गाड्या, भाषणबाजी हे सगळं पाहून हुरळून जाऊन, त्या झगमगाटामागे लागलेल्या पोरांना आणि माणसांनाही समजत नाही की, राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आपला वापर करून फेकत आहेत.त्यांच्या बोलण्यावर वांझोट्या घोषणावर विश्वास ठेवून निष्ठेने नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे तरुण कार्यकर्तेच जेव्हा फसले जातात.आणि ते फसले गेल्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा ते म्हणतात.
'आम्ही भाळत आलो आजवर त्यांच्या मोठमोठ्या भाषणांवर आणि विश्वास ठेवला त्यांनी दिलेल्या घोषणांवर'
(पृ.८५)
आजवर कोणत्याच राज्यकर्त्यांनी शेतकरी सुखी व्हावा म्हणून त्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव दिला नाही, की शेतकऱ्याची लूट करणाऱ्यांना वठणीवर आणले नाही. शेतकऱ्यांच्या मनात वाहणाऱ्या चिरंतन दुःखाच्या नदीवर आज पर्यंत कोणालाच धरण बांधता आले नाही आणि कोणी बांधणारही नाही याबद्दल ते म्हणतात 'दुःखाची चिरंतन नदी वाहतेच आहे आमच्या पापण्याआडून अजून तरी कोणत्याच व्यवस्थेला त्या नदीवर बांधता आले नाही धरण' (पृ.९८)
असे असले तरी याही परिस्थितीत शेतकरी जगासाठी अन्न पिकवतो,ताटातल्या घासासाठी मातीत बियाणे पेरतो,मातीत कष्ट करून वरूण राजाला विनवणी करतो. प्रत्येक जीवासाठी शेतकरी निसर्गाकडे दान मागतो,पण त्यातला काही भाग स्वतःचा वाटा म्हणून काढून घ्यायचेही तो विसरतो एवढी मोठी दातृत्वशीलता त्या शेतकऱ्याच्या मध्ये असते ही दातृत्वशीलता ते पुढील शब्दात मांडतात.
'मागणीचा आणि देणगीचा नाही कधी अभिमान माझ्यासाठी राखण्याचेही मी विसरतो भान'
(पृ.६३)
निसर्ग चित्र (पृ.२८) व सावली (पृ.३०) या दोन्ही कवितेतून कवी पर्यावरण ऱ्हासाबद्दल बोलतात.निसर्ग चित्र काढा म्हटले,की कोणीही सहजपणे डोंगर,नदी, चार दोन झाडं,झोपडी,होडी असे चित्र काढतो,परंतु प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे भविष्यात मुलांना हे सगळं बघायलाच मिळाले नाही,तर मग मुलं कुठली आणि कसली निसर्ग चित्र काढतील ?हा प्रश्न त्यांना पडतो.
कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांनी काही कवितांमधून आजच्या काळाचे चित्र आणि पूर्वीच्या काळाचे चित्र तुलनात्मक दृष्टीने आपल्या कवितेमधून प्रभावीपणे रेखाटलेले आहे. ज्यातून पूर्वीच्या काळाची परिस्थिती त्या परिस्थितीत त्या व्यक्तीचे वर्तन आणि आजच्या काळातील आजच्या माणसाचे वर्तन अधोरेखित केलेले आहे.भिंत कवितेमध्ये आई तिच्या अपराजित हातांनी भिंत सारवते तर मुलगा मोबाईलच्या दुकानात स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी उभा आहे. तर लोड शेडिंग (पृ.२०) कवितेत, शेतीच्या पिक पाण्याच्या प्रश्नामुळे झोप न लागलेला बाप भल्या पहाटे लाईट जाण्यापूर्वी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जातो,तर मुलगा झोपेतून उठून मोबाईलचा चार्जर शोधतोय,
चिमण्या (पृ.४३) या कवितेतून कवी खूप छान पद्धतीने माणसाला पर्यावरण संवर्धनासह लेक वाचवण्याचा, वाढवण्याचा संदेश देतो. त्या कवितेत पूर्वीच्या काळी आई धान्य पाखडत असताना,चिमण्या तिच्या जवळ यायच्या आणि चिव चिव करत त्यांचा वाटा घेऊन जायच्या,
परंतु आता आधुनिक काळात बायको ही चिमण्यांना दाणे टाकायचे काम करते,पण चिमण्या दाणे खायला येत नाहीत,कारण अनेक प्रकारचे तणनाशके आली त्यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.त्या चिमण्या जशा कमी झाल्या त्याच पद्धतीने स्त्रीभ्रूणहत्येमुळे मुलीचे प्रमाण खूप कमी झाले आहे हे सांगताना ते म्हणतात
'कोणता आधुनिक आजार झाला आहे पटापट मारताहेत चिमण्या आणि माणूस ही जन्माला घालत नाहीये चिमण्या'
( पृ.४३)
अशाच काहीशा आशयाच्या कविता महापूर ( पृ.२३), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५,२६),पाऊस (पृ.३२)माणसा माणसा दार उघड (पृ.३४),पायवाट ( पृ४८)
या कवितासंग्रहात आलेल्या आहेत.त्यासोबतच माय,बाप,आजी, आजोबा,बहिण अशा विविध नात्यातील कविता आलेल्या आहेत. भिंत (पृ.१९), पायाखालची सरकणारी जमीन (पृ.२५),लोड शेडिंग (पृ.२०),हरळी (पृ.५८),आभाळातल्या थेंबा संगे (पृ ५९ ),एकनाथ (पृ.३७ ) ,पुसूनही टाकता येत नाहीत (पृ.६४,६५),एकपात्री नाटक (पृ. ६६), भीती (पृ.७३),जखम (पृ.९०),रुक्ष भूमी (पृ.९२) या कवितांमधून कष्टकरी मायबापाच्या जीवनानुभवांची मांडणी कवीने केली आहे.
नोंदी (पृ.२१), महापूर (पृ.२३), पायवाट (पृ.४८), जखम (पृ.८९) या कवितेमधून आजोबांचा काळ आणि आजचा बदललेला काळ खूप प्रभावी पद्धतीने मांडलेला आहे.
संग्रहाच्या सुरुवातीलाच कवी निसर्गाला प्रार्थना करतो,की
'चकोराच्या वाट्याचे चांदणे
त्याचे त्याला लाभो चातकाच्या व्याकुळ कंठासाठी
जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस'
(पृ.१४)
तर पुढे एका कवितेत
'रिकाम्या ओंजळीत दोन घास ठेवणारी माणसं शिल्लक आहेत अजून गावात त्यांची ओळ वाढो दिवसें दिवस
झाडांना पाणी घालणारी दोन मुलं दिसतायेत शाळेच्या प्रांगणात
त्या मुकल्या हातांना अनेकांची साथ लाभो
(पृ.३६)
अशी प्रार्थना ते निसर्गाकडे करतात.
या संग्रहात मोबाईल,लोड शेडिंग,चार्जर,बॅटरी, लाईट, स्क्रीन गार्ड, टाईम टेबल,इमेजेस, डिलीट,स्मायली, फ्लॅट अशा इंग्रजी शब्दांचा उल्लेख आलेला आहे. अलीकडच्या काळातील भाषेतील ही समिश्रता तितक्याच सहजपणे कवितेत आलेली दिसते.
उगवतीची दिशा (पृ.१०२) या कवितेतून कवी तान्हाजी बोऱ्हाडे
यांच्या बापाने त्यांना उगवतीच्या दिशेने चालायला सांगितले आहे.
'बापानं हातात नांगर देण्याऐवजी पाटी पुस्तक दिलं आणि म्हणाला उगवतीच्या दिशेनं चालत जा...'( पृष्ठ १०२)
हे सांगणे फक्त त्यांच्या एकट्या पुरते न राहता समस्त मानवजातीने आणि विशेषत: शेतकऱ्याच्या मुलांनी उगवतीच्या दिशेने चालत जायला ही कविता सांगते आहे. उगवतीची दिशा म्हणजे सुशिक्षित होण्याची,शिकण्याची, आत्मभान जागृत करण्याची दिशा आहे. म्हणून कुणब्याच्या पोराने उगवतीच्या दिशेने जावे असे प्रत्येक शेतकरी बापाला वाटते. कारण शेतकऱ्याचा शेवट काय आणि कसा होतो.हे प्रत्येक शेतकरी जवळून पाहतो.आपला मुलगा उगवतीच्या दिशेने गेला तरच त्याची प्रगती होईल,नाहीतर काय होते? हे ते पुढील शब्दात सांगतात.
'हातात नांगर असलेला
कुणबी कुठंही गेला तरी मावळतीच्या डोहाजवळच पोहोचतात त्याची अभागी पावलं'
(पृ.१०२)
दर्शन मांजरे यांनी कुणब्याचा श्वास असलेली भुई, शेतकऱ्याला हिंमतीने जगायला शिकवणारी,त्याची साथ करणारी औताची बैलजोडी.यांची समर्पक मांडणी करुन आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे. समीक्षक दा.गो. काळे यांच्यासारख्या जेष्ठ समीक्षकांची पाठराखण या संग्रहाला लाभलेली आहे.
जास्त काही सांगण्यापेक्षा ज्याचे जळते त्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळते, कळत असते. जसे ज्या बोटाचे दुःख त्या बोटाला भोगावे लागते.तशी ज्या शेतकरी बांधवांना प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करावे लागतात. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना काय काय दुःख भोगावे लागते हे त्यांनाच ठाऊक असते. कवी तान्हाजी बोऱ्हाडे हे स्वतः एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले शेतकऱ्यांचे दुःखद वास्तव अतीशय प्रभावी शब्दात चित्रित केले आहे .शहरात राहून कधीही शेती न पाहिलेल्या फक्त नावावर शेती आहे, म्हणून शेतकऱ्याची लेकर म्हणवणाऱ्या उपऱ्या शेतकऱ्यांना अन् त्या उपऱ्या पोरांना शेतकरी बापाची होणारी ही व्यथा काय समजणार ? ते दुःख जो भोगतो त्या शेतकरी माय-बापालाच आणि त्यांच्या च्या मुलाबाळांनाच माहीत 'जळताना भुई पायतळी' काय होते ? ते...
कवी - तान्हाजी रामदास बोऱ्हाडे
कवितासंग्रह : 'जळताना भुई पायतळी'
प्रकाशन -
काव्यग्रह प्रकाशन, वाशिम
मूल्य १५० रुपये
पृष्ठ १०४
शरद ठाकर
सेलू जि. परभणी
८२७५३३६६७५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा